पहाटेची वेळ. आज चंपकवनात भयाण शांतता पसरली होती. सगळे जंगल नेहमीच्या सभेच्या जागी जमा झाले होते. कुणीही काहीही बोलत नव्हते. ठराविक वेळाने एक विचित्र आवाज ती शांतता भंग करत होता.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
काल रात्रीपासून या आवाजाने जंगल पुरते हादरुन गेले होते. दिवसा झोप घेऊन रात्री शिकार करण्यासाठी प्राणी एकेक करुन बाहेर येणार तो हा आवाज घुमू लागला.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
इतका विचित्र आणि मोठा आवाज या आधी कोणीही कधीही ऐकला नव्हता. त्या आवाजाने लहान पिल्ले इतकी घाबरली की रडणेही विसरुन आईबाबांना घट्ट बिलगली.
सारे प्राणीही घाबरले होते. काय करावे समजत नव्हते. हळूहळू अंदाज घेत प्राणी न बोलावताच नेहमीच्या सभेच्या जागी पोहचले.
सगळ्यांना खात्री होती की सगळे इथेच जमतील आणि नेमके काय घडते आहे यावर उपायही शोधतील. सगळे जमले तर खरे पण कोणीच काहीच बोलत नव्हते फक्त आवाजाचा माग घेत होते.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
कशाचा असेल हा आवाज?
काय दुसऱ्या जंगलातून कोणता प्राणी आला असेल?
की एखादा राक्षस ?
का एखाद्या ग्रहावरून कुणी आला असेल ?
का माणसाने काहीतरी पाठवले असेल ?
वेगवेगळे विचार मनात येऊन सगळ्यांची घाबरगुंडी उडाली होती.
“महाराज चला लवकर, घाई करु या. आपण सगळे मिळून चंपकवन सोडून जाऊ या.” चीकूससा घाबऱ्या आवाजात कुजबुजला.
“अरे चीकू, मान्य की आवाज खूपच भयंकर आहे. या आधी आपण कधी ऐकला नाही. नक्कीच एखादे संकट येणार आहे पण म्हणून असं पळून का जायचं? आणि जाणार कुठे?” गोलू अस्वल घाबरलेल्या पण ठाम आवाजात म्हणाला.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
(पुन्हा एकदा तोच आवाज.....घाबरुन प्राणी एकमेकांजवळ सरकले.)
“अगदी बरोबर आहे गोलू. प्रसंग बाका आहे पण सामना तर करायला हवा. याआधीही आपण अनेक संकटे बघितली आहेत आणि त्यावर उपायही शोधले आहेत. सगळे एकत्र आलो तर या संकटातूनही मार्ग नक्की काढू.” सिंह महाराज सगळ्यांना धीर देत म्हणाले.
महाराजांच्या बोलण्याने सगळ्या प्राण्यांना थोडे बरे वाटल्याने सर्वांनी होकारार्थी मान हलवत समर्थन दिले.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
(पुन्हा एकदा तोच आवाज....यावेळी प्राणी थोडे शांत होते.)
“चला तर मग कामाला लागू या. हा आवाज नेमका कशाचा आहे ते शोधून काढू या. कोण घेणार ही जबाबदारी?” भोलू अस्वलाने विचारायला आणि....
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
पुन्हा एकदा तोच आवाज यायला एकच गाठ पडली. यावेळी आवाज अधिक मोठा होता. खूप वेळ घुमत होता.
खर म्हणजे सगळे मनातून घाबरले होते पण उपाय तर शोधायला हवा हे पटल्यामुळे आपापसात चर्चा करु लागले.
“मी जायला तयार आहे. पानांमधून लपत छपत, आवाजाचा माग काढत मी शोधून काढते की हा नेमका कुणाचा आहे ? चंपकवनात नक्की कोणते संकट आले आहे ?” चानी खारुताई धीर करुन म्हणाली.
“शाब्बास चानी, मीही तुला मदत करेन.” सोनू घार म्हणाली.
“ छान. कुणीतरी हे करायलाच हवे. दोघीही स्वतःची काळजी घ्या. चानी तू झाडांवरून जात तर सोनू आकाशात उंच उडत आवाजाचा शोध घ्या. काय आहे हे समजले की लगेच परत या. आपण मिळून उपाय शोधू या. एकट्याच काही करायला जाऊन अजून अडचणीत येऊ नका. आम्ही सगळे तुमची इथेच वाट बघतो.” महाराज म्हणाले.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! (पुन्हा एकदा तोच आवाज....)
दोघी लगेच आवाजाच्या दिशेने निघाल्या. अधूनमधून एकमेकींच्या संपर्कात राहू आणि काही समजल्यास लगेच दुसरीला काय खूण करायची हेही ठरले होते.
दोघी तासभर शोध घेत होत्या. जशा त्या नेमक्या जागी पोहचल्या तसा आवाज अधिक मोठा आणि भितीदायक होऊ लागला.
आवाज एका गुहेतून येत होता. ही गुहा याआधी दोघींनीही बघितली नव्हती. तिच्याजवळच एका मोठा धबधबाही वाहत होता. इथून थोड्याच अंतरावर वनाची हद्द संपून दुसरे मोठे जंगल सुरु होत होते.
त्यामुळे जंगलातील प्राण्यांपैकी कुणी इथे राहत असणे शक्य नव्हते.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! पुन्हा एकदा तोच आवाज....
इतक्या जवळून येणारा आवाज थरकाप उडवणारा होता.
चानी आणि सोनू पानांमागे लपून काही दिसते आहे का याचा अंदाज घेत होत्या. गुहा खूप खोल असल्यामुळे काहीच दिसत नव्हते.
दोघींनी लगेच माघारी जाऊन सगळ्यांना सांगून अधिक मदत घेऊन यायचे ठरवले. दोघी चपळ असल्यामुळे काही मिनिटातच सभेच्या जागी पोहचल्या. आवाज कुठून येत आहे हे सांगितले. आवाज नेमका कशाचा आहे हे कळले नव्हते. शेजारच्या जंगलातून किंवा परग्रहावरुन आलेला एखादा मोठा आणि भयंकर प्राणी असण्याची शक्यता त्यांच्या सांगण्यावरुन वाटत होती.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! आवाज येतच होता.....
कोल्होबांनी सगळे बाबा प्राणी असलेली आपली सेना तयारच ठेवली होती. सिंह महाराजांच्या नेतृत्वाखाली सगळे जाणार होते. पिल्ले आणि त्यांच्या आई मात्र सभेच्या जागी थांबणार होत्या.
चानीच्या मागून सगळे गुहेकडे निघाले. ठराविक वेळाने आवाज येतच होता.
...
.....
.....
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् !
आवाज इतका मोठा होता की सगळ्यांनी कान झाकून घेतले होते.
.....
....
....
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक्.........
आवाज जवळ येत गेल्यावर आता हादरे बसत होते.
.....
......
.....
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक्.........
एकदा आवाजाने बसलेला हादरा असा होता की रानमांजर उडून फांदीवरच पोहचले.
..........
........
........
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक्.........
यावेळी हरिण असे काही हेलपाटले की पायाला मोठी जखम झाली.
.......
......
अजून काय काय होणार याची आता सर्वांनाच भिती वाटत होती. तरी पुरेशी काळजी घेत सगळे गुहेजवळ पोहचले.
“ मी मोजके चार-पाच जण घेऊन आत जातो. इशारा दिला की मग बाकीच्यांनी येऊन हल्ला करा. कितीही मोठा किंवा भयंकर प्राणी असला तरी सगळे मिळून त्याचा सामना नक्की करु शकू.” सेनापती कोल्हा.
लांडगा, तरस, चित्ता, रानडुक्कर आणि साळींदर असे बरोबर हल्ला करायला हुशार सैनिकांची तुकडी कान पूर्णपणे झाकून सेनापती कोल्ह्याबरोबर गुहेत शिरली.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! आवाज इतका भयंकर होता की कान झाकलेले असूनही थरकाप होत होता. गुहेत आडोसे शोधत सगळे आत जात राहीले.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! आता आवाज अगदी हातभर अंतरावर होता पण अंधारामुळे काही दिसत नव्हते.
सेनापतीनी सोबत असलेल्या काजव्यांना आदेश करताच काहीसा प्रकाश पडला आणि समोर दिसणारे दृश्य बघून सगळेच अचंबित झाले.
......
....
......
.....
.....
.....
....
....
....
......
....
.....
.....
....
.....
.....
......
....
......
.....
.....
.....
....
....
....
......
....
.....
.....
....
.....
.....
समोर गोलू आणि मोलू हे दोघे हत्ती झोपलेले होते. कदाचित ग्लानीत होते. ते दोघे शिंकत होते.
गुहा खोल असल्यामुळे एक विचित्र आवाज तयार होऊन सगळीकडे घुमत होता आणि त्यांना हे काही समजत आहे असे वाटत नव्हते.
सेनापतींनी पुढे होऊन त्यांना उठवण्यासाठी हात लावला तर लक्षात आले की ते दोघे खूप तापले होते.
वैद्य घुबड दादांनी त्यांना तपासून झाडपाल्याचे औषध दिले.
छीर्र्रर्र्र्रर्र्र्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽछाक् ! अजूनही दोघे शिंकतच होते, पण प्रमाण आणि आवाज हळूहळू कमी होत होता.
संध्याकाळपर्यंत बराच फरक पडला. तापही उतरला. ग्लानी कमी झाली. दोघानांही थोडी हुशारी वाटू लागली. दोघांना नेमके काय झाले विचारल्यावर कळले की परवा रात्री दोघे फिरत फिरत इथे आले नव्याने सापडलेला धबधबा बघून इतके खूष झाले की पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पाण्यात खेळत राहीले. दमले म्हणून जवळच्या गुहेत जरावेळ आरामासाठी गेले. इतकावेळ पाण्यात खेळल्यामुळे सर्दी होऊन शिंका येऊ लागल्या. मग दोघांनाही उठणेही अशक्य झाले, ताप चढला, ग्लानी आली आणि मग...
हाय राम.....पोखरला डोंगर आणि निघाला उंदीर असेच काहीसे झाले होते ना !
आवाजाचा शोध लागल्यामुळे सगळेच प्राणी निवांत झाले होते, पण रात्रीपासून येणारा आवाज आणि त्यानंतरचे सगळे आठवून सगळ्यांना हसू येत होते.
काय तो आवाज आणि काय एकेक विचार.... राक्षस काय, भयानक प्राणी काय.... आवाजाच्या जवळ येत गेल्यावर हादरे काय बसत होते....मधेच एकदा रानमांजर उडून फांदीवर काय गेले, हरिण असे काही हेलपाटले की पायला मोठी जखम झाली......
बापरे बाप...गुहेत तर पुरते प्राण कंठाशी आले होते. आवाजाने कानाला बसलेले दडे तर अजूनही निघाले नाहीत.
आता हे सगळे आठवून हसू येत असली तरी तेव्हा मात्र सगळ्यांची पुरती घाबरगुंडी उडाली होती हे मात्र नक्की.

************************








No comments:
Post a Comment
suggestions most wlcome