Monday, May 03, 2021

गर्विष्ठ सिंह

गर्विष्ठ सिंहाला घडली अद्दल..!



चंपकवनात सगळे आनंदाने आणि मजेने रहात होते . पण गेले काही दिवस सगळे प्राणी खूप कंटाळले होते , कारण जीतू नावाचा एक खूप शक्तिमान सिंह सगळ्यांना त्रास देत होता .

"मी सगळ्यात शक्तिशाली आहे , मी म्हणेल तसं करायलाच हवं .माझे काका या जंगलाचे राजे आहेत .तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी एकेकाला खाऊन टाकेन" असं म्हणून तो सगळ्या प्राण्यांना घाबरवायचा .


त्याचे काका जंगलाचे सिंहमहाराज त्याला खूप समजावून सांगायचे , ओरडायचे पण तो मुळी ऐकायचाच नाही .त्याला त्याच्या शक्तीचा खूप गर्व झाला होता . त्याला काहीतरी अद्दल घडवावी असे सगळ्यांना वाटत होते पण काय ते सुचतच नव्हते .

एकदा जीतूला वाटले आज गाण्याचा कार्यक्रम करावा . त्याने सगळ्या प्राण्यांना आपल्या गुहेत यायला सांगितले .




बिचारे सारे प्राणी निमूटपणे गुहेत जमा झाले फक्त गजू हत्ती मात्र आला नाही.त्याने ठरवले होते आता काही झालं तरी जीतूचे ऐकायचे नाही.


कार्यक्रमाची सुरुवात कोकिळेने गोड गाण्याने केली . मग इच्छा नसतानाही चिऊताई , ससेभाऊ , हरीणदादा यांनीही गाणी म्हणली . जीतू म्हणाला ,"आता मी म्हणतो ."


खरंतर त्याचा आवाज खूप भसाडा आणि मोठा होता, पण त्याला नको कोण म्हणणार. जीतूचे गाणे सुरु झाले तसे सगळ्या प्राण्यांनी हळूच कानात बोटे घातली. त्याचा मोठ्या आवाजामुळे गुहा हादरु लागली . 

प्राणी घाबरले आणि उठले तसे जीतू ओरडला, "कोणी कुठेही जाणार नाही , काही एक झालेले नाही , गुहेला माझं गाणं आवडलं म्हणून ती डोलते आहे . सगळे गुपचूप बसून ऐका माझं गाणं ."


बिचारे प्राणी घाबरून बसून राहिले. जीतूने पुन्हा जोराने गाणं म्हणायला सुरुवात केली . त्याच्या कर्कश्य आवाजामुळे गुहेचा डोंगर हादरु लागला व त्यावरचे दगडही हलू लागले. मोठा आवाज करत एक भला मोठा दगड गडगडत गुहेच्या दारापाशी येऊन पडला आणि गुहा बंद झाली .



आवाजाने सगळे प्राणी घाबरुन गेले . आपण गुहेत अडकलो हे समजल्यावर तर आता काय करायचे तेच कुणाला समजेना . दगड हलवायचा सगळ्यांनी प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही

जीतूनेही आपली सगळी शक्ती लावून बघितली पण काही उपयोग झाला नाही .




मग एक चिऊताई काहीतरी आठवून छोटया फटीतून गुहेबाहेर पडली आणि उडत गजूहत्तीकडे गेली .त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि मदतीला बोलावले .


गजू :- त्या जीतूला गर्व आहे ना त्याच्या शक्तीचा मग हलव आता 

दगड.  मी नाही येणार काही झालं तरी .





चिऊ :- गजूदादा ही भांडायची वेळ नाही .जीतू बरोबर बाकी सगळे प्राणीपक्षीपण आत अडकले आहेत . त्याच्यासाठी चल .


मग मात्र गजू तयार झाला आणि चिऊताई बरोबर मदतीला गेला .



गुहेजवळ गेल्यावर आधी नीट पहाणी केली . मग एक मोठा लाकडाचा ओंडका घेतला फटीतून आत घालून हळूहळू दगड हलवला व थोड्या वेळातच गुहेचे दार मोकळे झाले .


सगळे प्राणीपक्षी आनंदाने ओरडून गजूचा जयजयकार करु लागले .

जीतू बाहेर आला आणि म्हणाला ,

 " गजू आज तुझ्यामुळे आम्ही सगळे वाचलो तूच खरा शक्तिशाली आहेस ."

गजू :- अरे जीतू नुसती शक्ती काय कामाची त्याबरोबर थोडी बुद्धी युक्तीही हवी .

आणि सगळ्यात महत्वाचे शक्तीचा उपयोग इतरांना व्हायला हवा त्रास नाही .


जीतू :- बरोबर आहे तुझं . आजच संकट ही माझ्यामुळेच आलं होत . पण आता मला माझी चूक समजली. मी वचन देतो की यापुढे कुणालाही त्रास देणार नाही .


तेव्हापासून जीतू शहाणा झाला व त्याने त्रास देणे बंद केले . चंपकवनात आधीसारखा आनंदीआनंद झाला.

***********************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome