Monday, May 03, 2021

उपाय

                     

जंगलात एक डेरेदार झाड होते. त्या झाडावर खूप सारे चिमणी, कावळा,कबुतर,साळुंखी,मैना असे पक्षी आणि खार,माकड, गोगलगाय असे प्राणी रहायचे. कुणी राहायचे घरटी बांधून, कुणी ढोलीत, कुणी फांदीवर तर कुणी पानाच्या आड. सगळेजण दिवसभर खाऊ आणायला जायचे. ज्यांची पिल्ले होती ती झाडावर खेळायची , दंगा करायची.

त्या झाडावर राघू पोपट एक फांदीवर घरटे बांधून  तर एका  ढोलीत चंचला खारुताई रहायची. दोघेही जंगलात फिरुन छान छान फळ,शेंगा जमा करायची. 

आता पावसाळा येणार म्हणून दोघांची जास्तीत जास्त खाऊ जमा करण्यासाठी धावपळ चालू होती. इकडे झाडावरची हुप्या माकडाचे उद्योगी पिल्लू आणि त्याचे मित्र मात्र त्यांनी जमा केलेला खाऊ पळवून न्यायचे. हुप्या रागवला की सॉरी म्हणून पण म्हणायचे, पण त्यामुळे राघू आणि चंचलाचा पावसाळ्यासाठी खाऊ जमा होत नव्हता.

नुसतीच धावपळ करण्याचा चंचला खारुताईला खूप कंटाळा आला होता. पावसाळ्यात काय करणार? खाऊ कसा जमा होणार? या काळजीने तिला रडू येऊ लागले. तिने हे झाड सोडून दुसरीकडे जायचे ठरवले आणि सामानाची बांधाबांध केली. 

तिला असे जाताना बघून राघू पोपटाने विचारले, "काय गं चंचला काय झालं? कुठे निघालीस ?"

"काय सांगू राघूदादा मी रोज लांब लांब जाऊन छान छान फळं गोळा करुन आणते. आता पाऊस सुरु झाला की बाहेर जाता येणार नाही फळ पण मिळणार नाहीत म्हणून सारखी धावपळ करते पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. हुप्या माकडाचे पिलू आणि त्याचे मित्र मिळून सगळा खाऊ पळवून नेतात. रागवल्यावर सॉरी म्हणतात. लहानच ती सगळी काय करणार? पण आता मला खूप कंटाळा आला आहे. रोज तेच आणि पाऊस पण जवळ आला आहे या विचाराने रडू येत आहे."

"हो गं ते माझा पण खाऊ पळवतात. यावर काहीतरी करायलाच पाहिजे."दोघे विचार करु लागतात. राघूला एक कल्पना सुचते.

"चंचला आपण असं करु या दोघांपैकी रोज एकानेच खाऊ आणायला जाऊ या, तुझ्या ढोलीत ठेऊया आणि दुसऱ्याने इथेच थांबून लक्ष ठेऊ या. एक दिवस तू जा, एक दिवस मी जाईन. असं मिळून खाऊ जमवू या."

"छान आहे कल्पना. असच करु यामुळे भरपूर खाऊ जमा होईल. इथे थांबणारयाने पिलांना काही काम किंवा खेळात गुंतवून ठेवू  आणि आपल्यातला थोडा खाऊ पण देऊ.मग ते कुणालाच त्रास देणार नाही.
दोघांना उपाय आवडला आणि त्यांनी त्याप्रमाणे करायला सुरुवातही केली.

अशाप्रकारे एकमेकांना मदत करुन दोघांनी आपल्या प्रश्नावर उपाय शोधला.












****************************************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome