मोहन शिक्षणासाठी ह्या शहरी नुकताच आला होता...आज जरा मोकळा वेळ मिळाला आणि तो शहराच्या अशा एका भागात आला जिथे मोठे बंगले, विस्तृत बगीचे आणि एकूणच सधन परिसराच्या खुणा होत्या..
शहराचा प्रसिद्ध मोठा तलाव ह्याच ठिकाणी होता. रस्त्यावर जांभळ्या फुलांचा सडा पडलेला मोठा मोहक दिसत होता..हिरवी वनश्री चहूबाजूला पसरली होती..
तो एक पत्ता शोधत होता.. त्याच्या योग गुरूंनी त्याला ह्या पत्त्यावर जाऊन एक पार्सल द्यायला सांगितलं होतं.
आडवळणाच्या त्या ठिकाणी त्याला पत्ता शोधणं जरा कठीणच होतं.
मोहन तलाव सोडून परतीच्या मार्गावर आला आणि त्याच्या कानावर अतिशय मधुर असे बासरीचे सूर आले...
संध्याकाळचा पुरिया धनश्री रागाचे सूर त्याने चटकन ओळखले...
एका प्रशस्त बंगल्यामधून तो आवाज येत होता..
त्याला बंगला दिसला नाही पण तिथे जाण्याच्या चार पाय-या आणि एक पाऊलवाट मात्र दिसली..
तो जरा जवळ गेला... मोठं औदुंबराचं झाड ही खूण त्याला सांगितली होती...
इतक्यात काही पोपट एका वृक्षावरुन पश्चिमेच्या दिशेला उडून गेले...
तो औदुंबरच होता..
अशा सान्निध्यात मधुर असे बासरीचे सूर स्वर्गीय आनंद देत होते.
एक शुभ्र दाढी असलेले जटाधारी वृद्ध गृहस्थ ती मधुर अशी बासरी वाजवत औदूंबराखाली बसल्याचे त्याला दिसले...
नम्रतेनं तो पुढे वंदन करत आला..
पण डोळ्याच्या कडांतून त्याने जे पाहिलं ते पाहून तो अवाक झाला ..
जिची ओळख करून घ्यावी असे कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून त्याला खूप वाटायचे ती प्रत्यक्ष तिथे पडद्यातून डोकावीत होती.. !!
हिमानी.. हो, हीच ती..
वर्गातली सगळ्यात हुशार पण अतिशय खट्याळ मुलगी जी वर्गात अधून मधून त्याच्याकडे कटाक्ष टाकायची..
अन..तोच कटाक्ष आत्ता इथे त्याने अनुभवाला.....
का बरं आपण ओढले जातो या नजरेच्या जाळ्यात... ती वर्गातल्या इतर मुलींपेक्षा वेगळी उठून दिसण्यामागे नेमके काय होते.... फक्त सौंदर्य ?
नाही त्यापेक्षा अजून काहीतरी निश्चित होते.
मनात उठलेल्या प्रश्नांना अावर घालत त्याने पावले त्या घराकडे वळवली. पत्ता विचारायच्या निमित्याने आज हिच्याशी ओळख करु असे मनात ठरवत...
बेल वाजवून प्रतिक्षेत.... दार तीच उघडेल ना? ...दुसरे कुणी उघडले तर?....
कान बारीक आवाजही टिपत होते... जिन्यावरुन कोणीतरी लहान मूल धाडधाड आवाज करत काहीतरी गुणगुणत येत होते... आवाज जवळ जवळ येत अचानक दार उघडले. समोर तीच..
" मोहन..! ये ना आत. चालेल ना अरे तुरे केले तर?" तोच कटाक्ष... ओळखीचा... काहीतरी सांगू पहाणारा.... खट्याळ पण आपलासा करणारा..
"हॅलो कुठे हरवला. नको का एकेरी?"
" नाही नाही तसे नाही. चालेल. पण माझे नाव...?"
" त्यात काय मोठे... आपण दोघे एकाच तर वर्गात आहोत. माहित नाही का पण तुला बघितले ना पहिल्यांदा तेव्हा आपण एकमेकांना ओळखतो असे वाटले. विचारावेसे पण वाटले पण तशी संधीच नाही मिळाली. आणि आज अचानक तू घरीच आलास म्हणजे येणार होतास..."
" येणार होतो? म्हणजे तुला माहित होत?"
" हो... ते पार्सल माझंच आहे. तुझे योग गुरु माझे काका आहेत. त्यांनी फोन करुन सांगितले होते की तू येणार आहे म्हणजे नाव, कॉलेज सांगितले, तेव्हाच मला तू येणार हे लक्षात आले... खूप बडबड करते ना मी... साधं पाणी पण नाही विचारलं... थांब घेऊन येते."
हिमानी आत गेल्यावर काहीसा थांबलेला श्वास घेत मोहन विचारात पडला. काय बिनधास्त आहे ही. अरे तुरेनीच सुरुवात. तिलाही आपण ओळखीचे वाटतो...?
का...? कोणत्या जन्मीची आहे ही ओळख? याच की पूर्वजन्माची?
" घे आणि जरा कमी विचार कर.. बघावं तेव्हा कुठेतरी हरवलेलाच असतोस.... आणि माझे पार्सल दे ना." सरबत पुढे करत तीने त्याला भानावर आणले.
त्याने पार्सल दिले आणि तीने आणलेले सरबत पीत तिला निरखू लागला.
एखाद्या लहान मुलाप्रमाणे अतिशय उत्सुकतेने तीने पार्सल उघडले.....
त्यातून पुस्तकांचा एक गठ्ठा बाहेर काढला... त्यातले एक त्याच्यासमोर धरले.. एक स्वतः घेऊन अधीरतेने बघू लागली... एकामागून एक पान उलटताना समाधानाने चेहरा उजळत होता.
त्याने मुखपृष्ठ बघितले आणि कुठेतरी खोल मनाच्या डोहात हलल्यासरखे झाले.....
हा वृक्ष..... जांभळी फुले..... त्याचा जांभळा सडा....
कुठे बरं पाहिले आहे आपण? त्याने पुस्तकाचे नाव पाहिले..
जांभळी परी....लेखिका हिमानी मीरा निलेश जोशी.
जांभळी परी... हेही आधी ऐकल्यासारखे वाटले.
पुस्तक उघडले... लेखिकेचे मनोगत..
हिमानी... कोण? कुठली?जांभळी परी कोण?... प्रवास... सारे काही...हिमानीच्याच शब्दात तेही फक्त तिच्या लाडक्या आई बाबासाठी....
इतके छोटे मनोगत... डोळ्यांनी पुढच्या पानाकडे धाव घेतली.
खूप मोठं नसलं तरी पुरेस मोठं पुस्तक होत.... थोड्या थोडक्या नाही तर १२-१३ वर्षांच्या सोनेरी आठवणी होत्या त्या...
पण पहिल्या दोन पानातच त्याला तिची ओळख पटली...
मनाने गावाकडे धाव घेतली. एकेक आठवण गर्दी करु लागली.
सानेआजींचा संस्कार वर्ग.... तिथे बागडणारी चिल्लीपिल्ली... नावाला संस्कारवर्ग सगळे मिळून दंगामस्ती, खेळ चालायचे..अगदी सानेआजी आजोबाही त्यात असायचे....
तसा मोहन आठ वर्षाचा पण घरात एकटं करमायचे नाही आणि आजूबाजूला खेळायला कोणी नव्हते म्हणून घरापासून थोडं लांब पण टप्यातल्या सानेआजींकडे आवडीने जायचा.
तिथल्या दोन गोष्टी त्याला खूप वर्ष समजल्या नव्हत्या एक म्हणजे त्यांच्या घरी इतकी लहान मुले राहतात कशी? त्यांचे आईबाबा कोण? मधूनच त्यातली काही जातात कुठे?
थोडं मोठं झाल्यावर त्याला त्याची उत्तर मिळाली.
आजी आजोबांची मुलगा मुलगी परदेशात असतात. येतात अधून मधून. यांना तिकडे करमत नाही म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी हे घरकुल चालू केले. अनेक जीवांना मायेची ऊब मिळाली.
ज्यांना शक्य असेल त्यांना नव्याने अजून एक हक्काचे घर मिळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात नाहीच तर हे आहेच.
या मुलांना समाजाने सहज स्वीकारावे म्हणून आजी संस्कारवर्ग, शिबीर, भिशी असे काहीना काही करत असतात. हे वेगळे नाहीत हे त्यांना आणि इतरांनाही नकळत सांगत असतात.
त्या सगळ्यात जिच्याशी याची घट्ट मैत्री जमली होती ती म्हणजे कनक त्याच्याच वयाची पण खूप मोकळी, गप्पीष्ट, भन्नाट कल्पना करणारी.
खेळात त्याची ठरलेली जोडी. अनेकदा वर्ग संपल्यावरही गप्पा रंगायच्या.
आजींच्या बागेत एक खूप मोठं, थंडगार सावली देणारं झाड.... त्याच्याखाली बसायला एक पसरट दगड.... त्यावर दोघांची मैफल जमायची.... त्या झाडाला वेगळीच, कधी कुठे न बघितलेली जांभळी फुलं यायची.... सुकलेली फुलं गळून खाली सडा पडला की सारा आवार जांभळट शाल पांघरायचा.... ते बघून ती म्हणायची...
" तुला माहितीये आजी म्हणते या झाडावर जांभळी परी रहाते.. ती आमच्या आई बाबांना शोधते... मग ते येतात आणि घेऊन जातात... माझे पण आई बाबा येतील लवकरच..."
" कुठे असतात तुझे आई बाबा?"
" बुध्दु ते माहित असतं तर मीच नाही का सांगणार आजीला... मी इथे येऊन खूप वर्ष झाली असं म्हणतात आजीआजोबा... तीन-चार वर्षाची होते... कोणत्या तरी जत्रेत हरवले ... सगळ्यांनी खूप शोधलं आईबाबांना पण नाही सापडले... मग पोलीसकाकांनी इकडे पाठवलं असं सांगतात..."
"मग आता..?"
"आता काही नाही जांभळी परी शोधते आहे आई बाबा... ती येईल घेऊन जायला...."
त्यांच्या या गप्पा मोहन घरीही सांगायचा.... खूप प्रश्न विचारायचा पण काय उत्तर मिळायची ते त्याला फार आठवले नाही.....
कनकची इच्छा मात्र पूर्ण झाली जांभळी परीने आई बाबा पाठवले ... ती नव्या घरी गेली... मोहनचा अभ्यास वाढला तसे आजींकडे जाणे जमेनासे झाले... पुढे बाबांची बदली झाली इकडे पुण्याला मग तर सगळंच आठवणीत गेले....
पण आज मुखपृष्ठावरचे जांभळ्या फुलांचे झाड, त्याच्या फुलांची जमिनीवरची शाल, त्याचे नाव जांभळी परी आणि पहिल्या दोन पानामधल्या सानेआजी आजोबांच्या आठवणी याने सारे सारे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले.....
त्याने नकळत हाक मारली, "कनक..."
हिमानीने चमकून त्याच्याकडे पाहिले... या नावाचा तर कुठेच उल्लेख नाही मग?
" नाही ओळखलं ना ? कसं ओळखणार.... तुला मोहन नाही मुन्ना माहिती आहे..."
मुन्ना नावासरशी तिलाही अनेक गोष्टी स्मरल्या... त्यातल्या ठळक पुस्तकातही होत्या....
" मुन्ना... तुला कसं विसरेन...!!! मी आजीकडे आले की तुला शोधायचा प्रयत्न करायचे पण भेटच नाही व्हायची. नंतर तुम्ही दुसरीकडे गेला अस कळलं... जाऊ दे... असे परत भेटणार होतो... मगाशी म्हणलं नाही का तुला... तू खूप ओळखीचा वाटतोस..!!!"
" हो मलाही असं खूपदा वाटलं पण विचारायची भिती वाटायची.."
" भित्रा... अबोलच आहे तू अगदी आधीपासून..."
" असू दे....आणि होतो, आता अगदीच काही तसा नाही. आणि हो मला ही जांभळी परीची गोष्ट वाचायची नाही ऐकायची आहे तुझ्याकडून... तेही आजींच्या त्याच झाडाखाली ऐकायला मिळाली तर काय मज्जा येईल नाही."
" चालेल की.. मी जाणार आहे पुढच्या आठवड्यात तिकडे त्या दोघांनाही द्यायचे आहे मला हे पुस्तक. या सगळ्यात त्यांचेच तर आशीर्वाद आहेत. थकलेत आता खूप पण आनंद होईल त्यांना. येशील ना?"
" का नाही माझी बडबडी बालमैत्रिण परत मिळाली याचा आनंद साजरा करायला आवडेल मला... आई बाबांही भेटायला आवडेल आणि जांभळ्या परीचे आभारही मानता येतील..."
त्याला इतकं बोलताना बघून तिला गंमत वाटत होती आणि तिच्या डोळ्यातली चमक बघून जुनी मैत्री नव्याने फुलणार म्हणून तो सुखावला होता.
बासरीचे मंद सूर आता नवी उमेद देत भैरवीत विसावले होते.
**************************

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome