Showing posts with label युवाकथा. Show all posts
Showing posts with label युवाकथा. Show all posts

Tuesday, November 09, 2021

अनोखा स्पर्श

 

 

रेवती एकविसाव्या शतकातली असली तरी, उत्तम गृहिणी, प्रेमळ आई, काळजीवाहू सून-कन्या, सुशील पत्नी, कर्तबगार बॉस आणि छान प्रेयसी अशा सर्वच भूमिका लीलया सांभाळणारी असल्याने सर्वांचीच लाडकी...


तिच्या अनुपस्थित, अनेकांचीकामे ठप्प व्हायची...


प्रत्येकाला तिची सोबत, सल्ला, मदत हवीच असायची, तीही सर्व आघाड्या सहज सांभाळायची...


हे सगळं म्हणायला सहज, सोप्प वाटले तरी, प्रत्यक्षात त्यामुळे ती भरपूर थकायची, कधीतरी कंटाळा यायचा तर कधी रागसुध्दा यायचा...


पण तसे कधीच बोलायची किंवा सांगायची नाही..


चिन्मयला ती बायकोपेक्षा, प्रेयसी म्हणूनच जास्त आवडायची, तीही तसे वाटण्यासाठी अधिकाधिक गमती करत रहायची...


लग्नाला वीस वर्षे होऊनही, दोघे अगदी नवविवाहित वाटायचे...


आहार-विहार उत्तम असल्याने वय बघून लक्षात येत नसले, तरी आता चाळीशीचे बदल जाणवायला लागले होतेच...


गेला आठवडाभर सण-समारंभ, त्यामुळे पाहुण्यांचा राबता...


ऑफिसमध्ये ऑडिट, वर्षा अखेरीची कामांची धावपळ...


मुलांच्या तोंडावर आलेल्या परीक्षा...


मधेच आधी तीचे आई-बाबा मग सासू-सासरे यांचे किरकोळ आजारपण...


या सगळ्यात रेवतीला काय बघू आणि काय नको असे होऊन गेले...


पण कशातही कमी न पडता, तीने सर्व समर्थपणे पेलले, पण खूपच थकून गेली होती..


उद्याचा रविवार, खऱ्या खूप दिवसांनी मोकळा, निवांत होता...


ना कोणती कामे, ना पाहुणे, ना कार्यक्रम, ना आजारपण, ना मुलांचा अभ्यास...


चिन्मयने आईबाबा व मुलांना  आत्याकडे पाठवल्याने कोणतीच गडबड नव्हती...


खूप दिवसांनी मिया-बिबी दोघेच घरी होते..  


उद्याच्या सुटीमुळे, कसलीच गडबड नाही, या विचारांनी छान वाटून, रेवती चिन्मयला बिलगली...


टीव्हीवर रटाळ सिरीयल चालू होती, पण दोघांचेही त्यात लक्ष नव्हते..


चिन्मयने रेवतीला कुशीत घेत, तिच्या हातावरुन आपला हात फिरवला, पण त्याला विशेष प्रतिसाद जाणवला नाही, ती पेंगुळलेली वाटली..


काहीतरी ठरवून तो उठला, आणि स्वयंपाक घरात खुडबुडला...


"काय करतो रे.. काही हवं आहे...?"


"काही नाही, तू टीव्ही बंद करुन, बेडरुममध्ये जा,मी एका मिनिटात आलो.."


तीने सांगितल्याप्रमाणे केले, आत येऊन गादीवर अशी आडवी झाली, की स्वतःवर नियंत्रणच नसावे..


चिन्मय येईपर्यंत तिला डुलकी लागली होती, ते बघून त्याला वाटले झोपू द्यावे असेच निवांत..


पण, त्याने लगेच विचार बदलला..


कुशीवर झोपलेल्या तिला, नीट पालथे केले, त्या स्पर्शाने तिची झोप चाळवली..


इतक्या दिवसांनी मिळालेला एकांत, त्यामुळे त्याची मागणी अपेक्षितच होती..


तीने विरोध केला नाही, पण प्रतिसादही दिला नाही..


चिन्मयने तिच्या पाठीवर कोमट तेलाची धार धरली..


त्या पाठोपाठ झालेल्या आधी बोटांच्या, मग तळव्याच्या स्पर्शाने ती प्रचंड सुखावली..


त्याचे हात कामाने काहीसे खरबरीत असले तरी, तेलामुळे  जाणवत नव्हते..


तो अतिशय हळुवार मालीश करत, तेल जिरवत होता, त्या स्पर्शात कोणतीही मागणी वा भूक नव्हती, 


होती फक्त माया,काळजी..


बोटांचे, तळव्याचे कधी हळूहळू तर कधी रेटून फिरणे, तिची थकलेली नसं न् नस मोकळी करत होते..


तिला अगदी पिसासारखे हलके हलके वाटत होते..


पाठ, पाय, हात साऱ्या शरीराला अगदी सराईतपणे मसाज झाल्यावर, चिन्मयने तीचे केस मोकळे केले..


त्यात चाळीशीच्या चंदेरी खुणा अधून मधून डोकावत होत्या..


घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, समाज सर्वत्र उत्साहाने, आनंदाने सहभागी होऊन जबाबदारीने साऱ्या गोष्टी करण्याचा तिचा मूळ स्वभाव...


अजूनही तितकाच टिकून असला तरी, ती धावपळ, दगदग दमवायची, थकायला व्हायचे..


परिणामी कधीतरी उगाच चिडचिड, वाद व्हायचे, ज्याचे नंतर तिला वाईटही वाटायचे, हे सगळे तिला लक्षात येत नसले तरी, त्याला मात्र अचूक जाणवायचे..


या साऱ्याने तिच्यातली  गोंडस, खट्याळ मैत्रिण हरवायला लागली होती..


आणि म्हणूनच तिला थोडेसे रिलॅक्स करण्यासाठी, तो गेले कित्येक दिवस  उपाय शोधत होता..


 एकदा तणावमुक्त व्हा अशा सदरात त्याने मसाजविषयी वाचले..


आजकाल या सगळ्या गोष्टी पैसे मोजले की सहज उपलब्ध होतात,  तेही अगदी शाही थाटात पण त्या स्पर्शात यांत्रिकता असते..


आणि महत्त्वाचे म्हणजे हा उपाय म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची नवी संधी होती..


म्हणूनच चिन्मयने ठरवून, हा सारा घाट घातला होता..


हे आठवताना, त्याची बोटे केसातून अशी लीलया फिरत होती की, तिला स्वर्ग अगदी दोन बोटेच उरला..


तिला लहानपणीची, तिची आजी दर रविवारी असेच चापूनचपून तेल लावायची हे आठवत होते, खूप छान वाटतं होते..


डोक्यातले सगळे विचार, राहिलेल्या-ठरवलेल्या कामांची यादी, चिंता एकेक करुन बाजूला होत, ती अगदी मोकळी, शांत, स्वस्थ होत होती..


ग्लानी हळूहळू गाढ झोपेत बदलली..


चेहऱ्यावर होता अतीव आंनद, समाधान, अगदी एखादया लहान बाळासारखे..


चिन्मयला हेच तर हवे होते, उद्या सकाळी उठल्यावरची रेवती मनाने, विचाराने किमान तीन-चार वर्षे मागे जात तरुण होणार होती..


तो आंनद, उत्साह, ताकद तिला पुढचे सहा महिने तरी पुरणार होता..


व या साऱ्याची अशीच किंवा अधिक मस्त परतफेड पुढच्या रविवारी आपल्याला मिळणार याची अनुभवाने त्याला पक्की खात्री होती..


खुशीत येऊन त्याने तिला जवळ घेऊन हलकेच थोपटत, स्वतःलाही निद्रादेवीच्या स्वाधीन केले..


आता तोही पुरेसा, थकला होता...


नाही म्हणायला, खिडकीतून डोकावणारा चंद्र, या अनोख्या स्पर्शाचा एकमेव साक्षीदार होता, बरं का..!




Tuesday, May 04, 2021

कळी नि भुंगा




एक होती रमणीय बाग. फुलांनी भरलेल्या त्या बागेत एक सुंदर कोमल कळी वाऱ्यवर आनंदाने झुलत होती. काहीवेळाने तिथे एक भुंगा आला. रंगाने काळा पण सप्तरंगी पारदर्शक पंखांचा. त्याने साऱ्या बागेत फेरफटका मारला.

त्याची नजर त्या कोमल कळीवर गेली अन् त्याला सगळ्याचा विसर पडला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली. तो आपोआप त्या कळी भोवती गुंजराव करु लागला. अल्लड कळीही त्याला न्याहाळू लागली. त्याचा पुरुषी रांगडेपणा तिला मोहिनी घालत होता.

असे सारे स्वप्नवत असताना भुंगा विचार करु लागला," मी हा असा राकट,कृष्णवर्णी आणि ही कळी इतकी सुंदर,कोमल! कसं जमणार आमचं?" नकोच ते असं म्हणत तो माघारी जाऊ लागला.

इतक्यात " काय झालं ?" आर्त पण कोमल स्वर त्याच्या कानी पडले.वळून बघितले तर तिनेच साद घातली होती.

"नाही काही नाही.मी तुझ्या रुपावर इतका भाळलो की मला वास्तवतेचे भानच राहिले नाही."

"कसले वास्तव ? "

"अगं तू इतकी सुंदर ! मी हा असा काळा. तू किती कोमल! मी हा असा राकट.माझ्या स्पर्शानेही तुला इजा व्हायची म्हणून मोह आवरला."

तिला त्याचे बोलणे ऐकून हसू आले.हसताना ती अधिकच मोहक दिसत होती.

"यात हसण्यासारखे काय?" त्यचा प्रश्न.

"हसू नको तर काय करु.तुला जे प्रश्न वाटले नेमकं तेच मला भावले. तुझा रांगडेपणा मला मोहवून गेला.तुझ्या कृष्णवर्णाला त्या सप्तरंगी पंखांनी अधिक आकर्षक केलं आहे.आणि तुझे मधुर गुंजन तर स्वर्गसुखच."ती उत्तरली.

तिच्या बोलण्यामुळे तो सुखावला पण मनात अजूनही किंतू होताच.
तिच्यासाठी पुन्हा एकदा मधुर गुंजन करु लागला. त्या प्रेमगीताने ती फुलू लागली आणि तिचे सौंदर्य अधिकच बहरु लागले,पण तो अजूनही अंतर ठेवूनच होता.

इतक्यात एक भुकेला पक्षी त्याच्या दिशेने झेपावला. कळीने क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या कोमल दलांमधे ओढले. तो नको म्हणत असताना काही होणार नाही असे त्याला आश्वस्त करत आपले दल मिटून घेतले.

सारी रात्र सरली.त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली.त्यांच्या प्रणयाच्या खुणा तिच्या पाकळयांवर उमटल्या. ते बघून त्याला अपराधी वाटू लागले,पण तीने त्याला काहीवेळ थांबायला सांगितले. 

जरावेळाने बागेचा माळी आला आणि एकेक सुंदर फूल तोडून आपल्या परडीत भरु लागला, कळीच्या पाकळ्यांवरचे डाग बघून तिला जाणीवपूर्वक नाकारले.

ती हसत म्हणाली,"बघितलस तुझ्या खुणांनीच मला जीवदान दिले."

भुंगा आनंदाने कळी भोवती गुंजराव करु लागला आणि ती त्याच्या प्रेमाने अधिकच बहरु लागली .

सावज


एक कुटुंब अनेक वर्षे राहत असलेले घर सोडून नव्या जागी रहायला गेले. सानिका त्यांचे एकुतले एक अपत्य. ना धड लहान ना खूप मोठी त्यामुळे इतरांपेक्षा लवकर नव्या जागी रमली.

नव्याने तयार होणारी वसाहत त्यामुळे फार थोडे लोक रहायला आलेले. सानिकाच्या घरासमोर त्याचे घर. नाव मोहित. तिच्यापेक्षा वयाने चार वर्षे मोठा त्यामुळे साहजिकच दादा म्हणून ओळख झाली.

ओळख कोणत्याही नात्यात न अडकता हळूहळू मैत्रीत मुरत गेली. त्यांच्या गप्पांना ना कोणते विषय लागायचे ना कोणती वेळ. दंगामस्ती तर अशी रंगायची की पाहणाऱ्याला हेवा वाटायचा.

बघता बघता तीन-चार वर्षे सरली. शाळेत जाणारी सानिकाची पाऊले महाविद्यालयाकडे वळली. ती म्हणजे रसरसते चैतन्य. वयात आलेली पण तरीही अल्लड. अजूनही शरीराने कोणतेही साद घातली नव्हती किंवा तिला ते समजत नव्हते अशी अगदी कोवळी.

मोहितला तिच्यापेक्षा जास्त अनुभव त्यामुळे महाविद्यालयीन वातावरणाचे धडे ती त्याच्याकडे गिरवू लागली. अगदी पॉकेटमनी कसा पुरवायचा पासून ते मागे कोणी मुलगा लागला तर काय करायचे इथपर्यंत.

त्याच्याशी काहीही बोलताना, सांगताना तिला अजिबात दडपण यायचे नाही. नव्याने होणाऱ्या ओळखी, मिळणारे मित्र, घडणारे किस्से यांची वरचेवर मैफिल रंगायची.
जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्याच्याकडून तिला सावधतेचे इशारे मिळायचे.

ही मैत्री न केलेली बरी. यांच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे, जेवढ्यास तेवढे ठीक पण जास्त अडकू नकोस इत्यादी. असे असले तरी त्याने तिला कधीच परावलंबी केले नाही. तिचे प्रश्न तिला सोडवायला लावायचा. 

हा माझ्याकडे टक लावून बघतो, तो मागे येतो यावर मग बोल आणि विचार म्हणायचा पण तिथे जाऊन त्यांच्याशी मारामारी, अरेरावी त्याने कधीच केली नाही. त्यामुळे त्याच्याविषयी तिला वेगळी अशी भावना व्हायची नाही. पण त्यांचा दंगामस्ती, गप्पाष्टक हा मात्र तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग होता. या सगळ्यातून ती नव्या वातावरणात सरावत होती.

एक जिवलग मैत्रिण सोडली तर अजून फार कोणी तिला आपलेसे वाटले नव्हते.
हे सगळे इतके सहज सरळ असले तरी समाज तो समाजच. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे गाढवासोबत चाला, त्याच्यावर बसा किंवा त्याला डोक्यावर घ्या नावे ठेवणारच.

मग त्यांच्या नजरेतून सानिका आणि मोहितची मैत्री कशी सुटणार. खरं तर कुणालाही खटकावे असे काहीच नव्हते.

पण कुण्या एका सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असा तोरा मिरवणाऱ्या काकू सानिकाच्या घरी पोहचल्या. तिच्या आईशी गप्पा मारण्याचे निमित्त करुन सध्या ती मोहित बरोबर जरा जास्तच दिसते. बघा म्हणजे दोघेही नकळत्या वयात उगाच नको ते व्हायचे म्हणून मी आपलं सावध केले असे बोलून घेतले. बाकी इतरही विषय नाही म्हणायला निघाले, पण मुलीच्या आईचे मन नको ते व्हायचे या विषयात अडकून गेले.

शिकली सवरलेली आई पण समाज बोलू लागला की कावरीबावरी होते आणि चूक बरोबर ठरवायचेच विसरुन जाते.

फतवा निघाला त्याच्या घरी अजिबात जायचे नाही, बोलायचे नाही.

सानिकाला आईला मधेच काय झाले अजिबात समजेना, तिने विचारुनही पाहिले पण यावर मला चर्चा नको इथेच विषय थांबवला गेला.
 

दोन दिवस अतिशय अस्वस्थतेत गेले. तिसऱ्या दिवशी आई बाहेर गेलेली बघून तिने त्याच्या घरी धाव घेतली पण ठिणगी तिथेही पडली होती. त्याच्या मातोश्रींकडूनही हुकूम जारी झाला होता आणि त्याला त्याचे फार काही वाटले नव्हते. पुरुषी मन शेवटी सहज नवे मार्ग शोधते.

तिच्यासाठी मात्र हे सगळे भलतेच अवघड झाले होते. त्याच्याशी बोलणे, गप्पा, दंगामस्ती ही तिची त्या नाजूक वयातली भावनिक भूक होती. तिची ही तडफड तिच्या जिवलग मैत्रिणीने हेरली आणि तिला याला प्रेम म्हणतात असा सल्ला दिला.

प्रेम त्यानंतर येणारे लग्न, संसार या सगळ्याच्या खूप खूप खूप दूर असलेली ती याकडे फक्त झाली परिस्थिती बदलण्यासाठी उपाय म्हणून बघत होती. मैत्रिणीच्या सल्ल्याने तिने त्याला so called propose ही केले.

अनुभवाने चार पावसाळे जास्त बघितलेल्या त्याने मात्र तिला तू समजतेस तसं हे नाही. ही वाटच खूप वेगळी आहे. तू अजून यावर चालण्यास तयारही झालेली नाही. आणि माझ्या मनात असे कधीच नव्हते आणि नसेल असे म्हणत तिला समजावले.

थोडक्यात परिस्थिती जैसे थे राहिली. याच दरम्यान तिची ओळख झाली ते रीमाशी. तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारी पण तिच्यापेक्षा दोन वर्षे मोठी असणारी.

रीमा अशा भावनिक आंदोलनात अडकलेल्या मुलींना अचूक हेरायची. त्यांच्याशी मैत्री करायची. सुरुवात त्यांना त्यातून बाहेर काढायचे उपाय करते असे दाखवत त्यांचा विश्वास जिंकायची आणि मग......

एकटी पडलेली सानिका सहज तिच्या जाळ्यात ओढली गेली.

तिची जिवलग मैत्रिणही सुरुवतीला तिच्या सोबत होती पण काहीतरी धोका आहे हे जाणवल्यावर ती सावध झाली. तिने सानिकालाही सावध करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. एकतर तिने सुचवलेला उपाय चालला नाही त्यामुळे तिच्यावर आता सानिकाचा विश्वास उरला नव्हता आणि मोहितची जागा आता रीमाने घेतली होती.

तिच्याशी गप्पा मारताना तिला खूप मोकळं वाटायचं, तिने सुचवलेले करुन बघावेसे वाटायचे. फिरायला जाणे, कॉलेज बुडवणे, नवीन पिच्चर बघणे याने सुरु झालेली गाडी नकळत एखादा सिगरेटचा झुरका, कधीतरी एखादा पेग अशी पुढे सरकू लागली.

या सगळ्यात घरी सगळे छान छान असायला हवे याचे धडे द्यायला रीमा विसरली नव्हती. त्यामुळे याची थोडीही कल्पना कुणाला आली नाही. मधले काही दिवस शांत झालेली, अस्वस्थ असलेली लेक पुन्हा पूर्वीसारखी झालेली बघून आईला बरे वाटले.

हे सगळे मोहितला समजले असते तर सदैव तिला अचूक सल्ले देणाऱ्या त्याने तिला चांगले खडसावले असते पण ते सगळे मार्गच बंद झाल्याने तो यापासून अनभिज्ञच राहिला. आपण तिला जे सांगितले, समजावले ते तिला कळले असेल असा समज त्याने करुन घेतला.

इकडे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. सानिकाला पॉकेटमनी पुरेना. सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून रीतसर मागणी झाली, पुरवलीही गेली. पण नंतर कारणे पटेना. मग नकळत आई बाबांच्या पर्समधून रक्कम गायब होऊ लागली. त्यावरुन वादविवाद होऊ लागले पण त्याच्या खोलाशी जाणे राहून गेले.

सानिका मधेच खूप आनंदी तर मधेच खूप शांत शांत असायची. आईला असे का घडते समजायचे नाही, प्रश्न पडायचे, विचारलेही जायचे पण ती जवळीक त्या एका चुकीने ती गमवून बसली होती.

रीमाचे हे सावज पुरते जाळ्यात ओढले गेले होते. आता तिला सानिका कायमसाठी हवी होती.

स्टडी टूरचे निमित्य करुन तिने एकदा सलग तीन दिवस घरापासून दूर राहायला लावले. त्या तीन दिवसात सिगारेटने पुढचा टप्पा आणि एका पेगने बेधुंद नशा सानिकाने अनुभवला होता. नशेत अनेक गोष्टी घडल्या पण नंतरही त्याविषयी घृणा न वाटण्याएवढे ब्रेनवॉश करण्याचे काम रीमाने अचूक केले होते.

तीन दिवस बाहेर राहून आलेली सानिका पार बदलून गेली आहे हे आईच्या हृदयाला जाणवले पण नेमके काय ते समजत नव्हते की सापडत नव्हते. बरं हे सगळं विचारणार कुणाला? तिच्या मैत्रिणी कोण? त्यांचे फोन नंबर असले काहीच तिच्याजवळ नव्हते.

काळजीने आईने हा विषय बाबांशी बोलला पण अगं हे वयच असं असत. लहान लहान गोष्टीही खूप सलतात. होईल काही दिवसांनी सगळे नीट. सहलीत काहीतरी वादावादी झाली असेल हवं तर विचारुन बघ असे सुचवून विषय तिथेच थांबला.

काही दिवस वाट बघू या म्हणून आई थांबली पण आतून अस्वस्थ होती.

त्या तीन दिवसांच्या गोष्टीनी सानिका आंतरबाह्य बदलून गेली होती. आता तिला त्याच जगात कायमसाठी जायचे होते आणि हेच हवे असलेली रीमा त्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी करत होती.

पुढच्या चार दिवसातच खोलीत एक चिठ्ठी ठेऊन सानिका नाहीशी झाली.

आईबाबा,
कदाचित मी जे करते आहे ते योग्य नसेल. नाही मला माहिती आहे की अयोग्यच आहे पण मी त्यात खूप आनंदी आहे. माझे मन आता इथे रमत नाही म्हणून मी जात आहे. जिथे जाईन तिथे सुखच सुख आहे त्यामुळे मला शोधू नका.
सानिका...


सानिका घर सोडून गेली हे समजयलाही खूप तास लागले. त्यामुळे तिचा शोध घेऊनही उपयोग झाला नाही. जशी काही हवेत वाफ विरुन जावी तशीच नाहीशी झाली. आजही शोध सुरुच आहे.

आई चिठ्ठी वाचून सतत रडत राहते. हीने नेमके काय निवडले हेही समजण्याचा मार्ग तिला सापडत नाही की आपण नेमके चुकलो कुठे हेही आठवत नाही.
मोहितला आपण याला जबाबदार आहोत का अशी रुखरुख वाटते पण पुढे काय याचे मार्गच दिसत नाहीत.

ज्या समाजमनाने हा घाला घातला ते तर समाजरीत म्हणून यावरही तोंडसुख घेत आहे.
आणि समाजातच लपलेले गुन्हेगारी जगत असे रोज नवे सावज शोधत आहे.

********************************

घटस्फोट

 तुटणे नव्हे टिकवणे ?



"दो बजके उनत्तीस मिनिट पर आनेवाली बोरिवली फास्ट लोकल आज प्लॅटफॉर्म नंबर 3 के बजाय प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आयेगी."

कानावर सगळं पडत होतं निखिलच्या पण त्याची नोंद त्याचं मन मात्र घेत नव्हतं. आजूबाजूचे लोक पटापट निघून जिन्याकडे जाऊ लागले आणि भानावर आला तो आणि त्याच्या लक्षात आलं की आपण किती विचार करत बसलोय साक्षीचा, एकूणच नात्याचा. त्याने ट्रेनचा एकूणच नाद सोडून दिला. 

सरळ प्लॅटफॉर्मच्या बाहेर आला तो.

अमीर खानची ऊर्जा आणि व्यक्तिमत्व ज्याच्यापुढे फिकं पडेल असा निखिल आज विचार करून करून अगदी मलूल झाला होता. 
आज ऑफिसमध्ये सुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं त्याचं म्हणून half day टाकून निघाला होता तो. 

स्टेशनच्या बाहेर आला तर एक पुस्तकांचं दुकान दिसलं. तो आत शिरला. जवळजवळ अर्ध्या तासाने बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात पुस्तक होतं "101 ways to fix your unhappy married life."

साक्षी...... नुकतीच चाळीशी पार केलेली पण अजूनही तिशीत आहे की काय असं वाटणारी, मनाने अगदी खंबीर आणि एकदम rational thinking असणारी. आपल्या वकील मैत्रिणीच्या ऑफिसमधून बाहेर पडली. हातात divorce चे कागद घेऊन.

सोहम. अत्यंत स्मार्ट मुलगा. त्याच्या कॉलेजमधून बरं वाटत नाहीये असं कारण देऊन लवकर घरी आलेला. आजची संध्याकाळ काय घेऊन येईल याचा विचार करत आई बाबांची वाट बघत एकीकडे मोबाईलवर काहीतरी करत बेडवर पडून होता. 

त्याला नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दिवाळीची धमाल आठवत होती. सगळ्या नातेवाईकांना जमवून मस्त थाटामाटात दिवाळी साजरी झाली होती. 

नंतर तिघे आठ दिवसांची काश्मीर ट्रिप करुन आले होते. त्यात आईबाबा असे मिरवले होते की हनिमून कपल्स पण फिके पडले होते.

मग असं अचानक काय झाले? गेल्या महिन्या दीड महिन्यात यांच्यात सतत वकील-घटस्फोट असल्याच चर्चा असतात.

मागच्या महिन्यात सोहमने मिळवलेले यश बघता त्याच्याकडून कॉलेज, प्रोफेसर यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण घरात असे विचित्र घडत असल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते.

आज दोघांशी स्पष्ट बोलायचेच असेच ठरवून तो घरी लवकर आला होता.

आधी निखिल घरी आला आणि फ्रेश होण्यासाठी आत गेला जाताना हातातले पुस्तक टेबलावर ठेवले. पुस्तकाचे नाव बघून सोहमला थोडा आधार वाटला.

थोड्यावेळाने साक्षी आली. सोहमकडे बघून हलकेसे हसली पण चेहऱ्यावर ताण स्पष्ट जाणवत होता. पुस्तकाकडे तिरकस कटाक्ष टाकत त्याच्या शेजारी हातातले पेपर मुद्दाम आपटत तीही आत गेली. सोहमने पेपर उघडून बघितले आणि त्याला गोष्टी अपेक्षित असूनही धक्काच बसला.

"आई आधी बाहेर ये बघू, बाबा तूही ये, लगेच या. मला तुमच्या दोघांशी आत्ताच्या आता बोलायचे आहे."

दोघे बाहेर आले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलेले होते. मघाशी दिसणारी अस्वस्थता विचित्र शांततेत स्थिरावली होती. सोहमला हा बदल खटकला पण ते बाजूला ठेवून त्याने मुद्द्यालाच हात घातला.

"मला एकदा कळेल का आपल्या घरात सध्या काय चालू आहे. मी आता लहान नाही की कानावर पडणाऱ्या गोष्टींचे अर्थ समजणार नाहीत. दीड एक महिन्यापासून काय काय ऐकतो आहे. सुरुवातीला वाटले तुम्ही कुठल्या तरी मित्र-मैत्रिणीविषयी बोलत असाल, नंतर स्वतःची समजूत घातली कदाचित भास असतील, म्हणूनच विचारायचे रोज उद्यावर ढकलत होतो. पण या सगळ्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होतो आहे, म्हणून ठरवले आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.आई तू तर आज हद्दच केलीस. घटस्फोटाचे पेपर घेऊन आलीस. एकदाही बोलावेसे वाटले नाही तुला? तरी बाबाने आणलेले हे पुस्तक माझ्यासाठी आशेचा किरण आहे."

" थांब सोहम, गैरसमज होतोय तुझा. मी ते पुस्तक उपाय शोधायला नाही तर कोर्टात काय काय कारण सांगता येतील ते ठरवायला आणले आहे."

"बाबा आर यू ओके? कारण ठरवायला म्हणजे? "

" घटस्फोट घ्यायचा तर पटणारी कारण तर द्यावी लागतील ना? तीस वर्षांचा सहवास अनुभवाला आम्ही दोघांनी. तुझा जन्मही पुऱ्या दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला. त्यामुळे खूप साऱ्या वादळांना भिडून आलोय आम्ही."

" अरे यार तेच तर ना. मग गेल्या दीडेक महिन्यात असे नेमके काय झाले की तुम्ही आज इथेपर्यंत येऊन पोहचला आहात. किमान एक कारण सांगा मला.."

" बाळा, कारण नाहीच काही, पण आमचेही वाद होतात, भांडणे टोकाला जातात, आम्ही दोघे अगदी दोन ध्रुवांवर वावरतो हे आम्हाला नव्याने जाणवायला लागले आहे. मी ते माझ्या मैत्रिणीला पटवून दिले म्हणूनच तिने हे पेपर बनवून दिले ना."

" पुस्तक चाळल्यावर मला तीस एक मुद्दे तरी सापडले जे पुढे करुन हे सगळे अगदी सहज पार पडेल."

" माझ्या डोक्याचा ना आता भुगा झाला आहे. तुमची बडबड मला वेडे करेल. त्यामुळे प्लिज एक फेवर करा आणि काय ते सरळ, स्पष्ट सांगा."

" सरळ आणि स्पष्ट सांगायचे तर बरोबर पन्नास दिवसांपूर्वी तू लिहिलेल्या प्रायोगिक एकांकीकेला पहिले बक्षीस मिळाले ना तसे जगून बघायचे आम्ही ठरवले आहे घटस्फोट - तुटणे नाही टिकवणे."

" गेली तीस वर्षे आम्ही करत असलेला विचार किती पोकळ आहे हे किती परफेक्ट मांडले आहेस तू. नाते म्हणजे कागदाचे बंधन नसते. मतभेद नाते पोखरत जातात आणि उरते ती फक्त तडजोड.
अशी तडजोड आता करायची नाही. तुटेपर्यंत ताणायचे इतकेच ठरवले आहे.
आणि हो यामुळे फार काही बदलत नाही उलट नाती अधिक स्वच्छ आणि मोकळी होतात. एकमेकांशी कसे जास्त प्रॅक्टिकल होता येते हेही तू उत्तम मांडले आहेच ना."

" नो...नो... प्लिज थांबवा हे डायलॉग. एकतर ते नाटक होते स्पर्धेसाठी लिहिलेले. तो माझ्या अभ्यासाचा-कामाचा भाग होता. त्याचा अनुभव कोणी घेण्याचा विषयच कुठे येतो. आणि त्यात दोघांचे मतभेद, त्यामुळे होणारी फरफट बघितलीच नाही का तुम्ही? "

" बघितले म्हणून तर इतका मोठा निर्णय घेत आहोत ना? तू ज्याला मतभेद-फरफट म्हणतो अशा त्यातल्या किमान ऐंशी टक्के गोष्टी आम्हीही अनुभवल्या आहेत. रुसवे-फुगवे झाले, आरोप-प्रत्यारोप झाले, टोकाची भांडणे पण झाली पण कधी विचारांची, कधी मोठ्यांच्या मायेची तुरटी फिरायची आणि सगळ्याचा निचरा व्हायचा. आम्ही तोडायचे नाही हा विचार करुन प्रत्येकवेळी माघार घेतली होती म्हणलं आता टिकवणे अनुभवून बघू या."

" ऐंशी टक्के ? मी नाही बघितले कधी?"

" म्हणून होत नव्हती असे तर होत नाही ना. "

"तरीही नाटक आणि प्रॅक्टिकल लाईफ वेगळे असते. "

" म्हणजे घटस्फोट हा उपाय नाही असे तुझेही म्हणणे आहे का?"

"अर्थात हो. पण म्हणून काय दरवेळी तेच तेच गुळमुळीत दाखवायचे का? नाट्य आणि परिस्थिती यातली तफावत रसिकांनी सांभाळली तरच काहीतरी वेगळे निर्माण होईल ना?"

" गल्लत करतोयस सोहम तू. अशा विषयांवरचे नाट्य, साहित्य हे कधीच पूर्ण काल्पनिक असू शकत नाही. त्याला एकतर भूतकाळ किंवा भविष्याची किनार जोडलेली असते. तू ज्याला गुळमुळीत म्हणतो ती आपल्या संस्कृतीची, संस्कारांची विचारधारा आहे. नाते कागदाने जपता किंवा तोडता येत नाही. तसेच ते फक्त दोन व्यक्तींचे नसते याची जाणीव यातून होते म्हणून तर उशीरा का होईना पण आमच्या मधल्या ताणाचा तुझ्यावरही परिणाम झालाच ना?"

"आणि ज्याला तू वेगळं काहीतरी असे नाव देत आहेस ते तुझे प्रयोग येणारा भविष्यकाळ रेखाटणार आहेत. चूक आणि बरोबर यातल्या सीमारेषा पुसणार आहे."

" म्हणजे माझे लेखन त्याला मिळालेले यश यात काही खटकते आहे का तुम्हला?"

" तुझे यश हा अभिमानाचाच विषय आहे आमच्यासाठी पण त्यासाठी निवडलेली वाट मात्र निश्चित क्लेषदायी आहे. प्रगती करताना नेमकी कशाची तोडमोड आपण करतो आहोत ह्याचे भान तू हरवतो आहेस. कोणतेही काम हे कधीच फक्त वैयक्तिक नसते तर त्याचे काही ना काही परिणाम समाज मनावर आघात करत असतात."

" रसिक मनोरंजन म्हणून कलाकृती अनुभवताना त्यात गुंतत जातात. त्याला हळूहळू प्रमाण मानू लागतात याची जाणीव आतापर्यंत होऊन गेलेल्या दिग्गजांना होती म्हणून तर त्याचे भान सांभाळून त्यांनी तुझ्या भाषेत गुळमुळीत मांडणी केली आहे."

" त्यातही तुझी कलाकृती यशस्वी झाली नसती ना तर फार चिंता नव्हती पण तसेही घडले नाही. तेव्हा मात्र आम्ही थोडे हादरलो. अजून किती आणि काय वेगळे प्रयोग करशील याने धस्स व्हायला झाले. असे का बरं घडले विचार केल्यावर लक्षात आले की तुझे लेखन हे खूप सहज, सोपे आणि अनुभवांवर आधारलेले आहे."

" तिथेच आम्हाला आमची चूक लक्षात आली. तू खूप वर्षांनी झालास म्हणून तुझ्या बाबतीत आम्ही सदैव जागरुक असायचो. तुला वाढवताना तुझ्या मनावर परिणाम होतील म्हणून अनेक गोष्टी तुझ्यापर्यंत येऊच दिल्या नाही. त्यामुळे तू त्या अनुभवल्याच नाहीत. त्यामुळे असे सगळ्यांच्यात घडत असते हेच तुला मान्य नाही."

" त्यामुळे कथानकाच्या दुसऱ्या बाजूचा तू कधी विचारच केला नाहीस. मतभेद आणि उपाय याचे गणित तर मांडले पण त्यात वजा आणि भागाकार यांचे परिणाम तुला माहितीच नव्हते. दुसऱ्याच्या जखमेची बोच समजायला स्वतःलाच ठेच लागावी लागते हेच खरे. मग आम्ही मिळून ठरवले की हाही अनुभव तुला द्यायला हवा. "

" डोन्ट टेल नाऊ की हे सगळे नाटक होते?"

" अलबत ! नाटकच होते फक्त ते वठवताना आम्ही संपत चाललो होतो. आज तर साक्षीने आणलेल्या पेपर सह्या करताना नाटकातल्या मुलाप्रमाणे तूही माझ्या खांद्यावर हात ठेवून धीर देत आहेस असे स्वप्नही मी प्लॅटफॉर्मवर बघितले."

"पण हे सगळे तुम्ही मला सरळपणे सांगू शकला नसता का? का मी समजू शकलो नसतो असे वाटले तुम्हाला?"

" सांगून समजले असते तर तू असे लिहिलेच नसते ना. अनुभवांच्या धर्तीवरचे तुझे लेखन समृद्ध करायला तसे अनुभवच यायला हवे ना."

"फक्त या आधी जाणीवपूर्वक तुझ्यापासून जे लांब ठेवले होते ते ओढून ताणून तुझ्यापुढे मांडताना आमचा खरच घटस्फोट तर नाही ना होणार हीच भिती मला वाटायची. याचे दडपण घेऊन फिरताना गेला दीड महिना मी मन मोकळे वागणेही विसरुन गेलो होतो."

" पण मला मात्र मी खरच इतकी rational आहे हे अनुभवताना आपल्यात अनेक गोष्टी बदलू शकतात असे नव्याने समजले."

" आता तुमचे काय झाले, काय मिळाले याचे पाढे ठेवा बाजूला, आणि माझे काय होते आहे ते बघा. तुमचे म्हणणे मला नुसते समजलेच नाही तर मी चांगले अनुभवले आहे.  माझी चूकही मी मान्य करतो पण हे आता थांबवा."

" आम्हाला पण काही हौस नाही असली नाटके करायची पण यापुढे तू हटके लेखन करताना त्यातून सुदृढ समाजाचेच स्वप्न उभे कर. 
अनुभवांचा उपयोग सहज लिखाणासाठी कर पण तेच प्रमाण मानू नको. प्रत्येक विषयाचा चौफेर विचार करत जा."

" कोणतीही कलाकृती ही समाजमनास खतपाणी घालत असते हे विसरु नकोस."

" नाही विसरणार कदापि नाही विसरणार. माताश्री-पिताश्री मला आशीर्वाद द्या."

"यशस्वी भव!"

निश्चिन्त झालेल्या निखिल आणि साक्षीला आता यश, प्रसिद्धी किंवा पैसा मिळवताना सोहम चौफर विचारांनीच वाटचाल करेल याची मनोमन खात्री झाली

************************

बदल

                      

(ही गोष्ट आहे क्षमा, तिचा समंजस मुलगा ओजस आणि नवरा राजेश यांची..)  

ओजस -  बाबा, एक विचारु का ? तुझे आणि आईचे काही बिघडले आहे का? 

की माझ्याकडून काही झाले आहे? तिची बडबड, ओरडा याची सवय आहे, पण सध्या ती खूप रेस्टलेस असते. 


राजेश - ह्म्म्म मीही विचार करतच होतो की तुझ्याशी बोलावे, बरं झालं तूच विषय काढला. 

ओजस - काही सिरियस आहे का? मी काही करु का ? 

राजेश - आता तूच काहीतरी कर. गंभीर आहे की नाही माहित नाही. गेले पंधरा दिवस माझा हर एक प्रयत्न झाला, पण कुठे आणि काय बिनसले याचा अंदाजच येत नाही. "

ओजस - घरात नाही, तर मग ऑफिसमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये तर नाही ना काही इश्यू ?"

राजेश - तसं असत, तर तीने मला सांगितले असते.

ओजस - मला परवा निलू मावशीचा मेसेज आला होता. तशी ती मला कधी मेसेज नाही करत. जस्ट कसा आहेस ? आई-बाबा कसे आहेत असे विचारत होती.

राजेश - निलू म्हणजे निलांबरी का? मला पण आला होता तिचा फोन. क्षमाचा लागला नाही म्हणून केला म्हणाली. याच गप्पा झाल्या साधारण.

ओजस - तिला माहिती असेल का काही?

राजेश - काय माहित? तशा त्या इतक्या भेटत नाहीत बहुदा. मेसेज, फोन होत असतील. एवढयात तेही सांगितल्याचे आठवत नाही.

ओजस - असं असतानाही तिने आपल्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला उगाच वाटत आहे की, तिला विचारावे एकदा. बघू आज मेसेज करतो. आता पळतो, उशीर होईल नाहीतर. "

( दुपारी ओजस बाबाला मेसेज करतो.)

ओजस - निलू मावशीने आपल्या दोघांना भेटायला बोलवलं आहे. आई नको. 

राजेश - काही झाले आहे का ?

ओजस - काहीच अंदाज नाही आला. फोन करु का विचारलं, तर नको प्रत्यक्षच भेटू म्हणली.

राजेश - बरं मी कळवतो क्षमाला, आज उशीर होईल. तू पण मेसेज कर.

ओजस - नाही लवकर बोलावलं आहे तिने. घरी नको सांगू. नेहमीच्या वेळेतच जा, असेही सांगितले.


राजेश -  मी अर्ध्या तासात आवरतो आणि निघतो. आपल्या नेहमीच्या सुक्षांतमध्ये भेटू. निलुला सांग. पाचला ये बरोबर. 

( ५-५.१५ च्या दरम्यान सुक्षांतमध्ये )

ओजस - कशी आहेस मावशी? आपण किती दिवसांनी भेटतो आहे..

राजेश -  कदाचित तीन वर्षांनी. तुला जॉब लागला, म्हणून आम्ही घरी आलो होतो सगळ्या मैत्रिणी. 
क्षमानी पार्टी दिली होती. हे फबी, व्हॉटस् ॲप आहेत म्हणून बरंय, अपडेट कळतात, नाहीतर ओळखलं नसत तुला. किती बदला आहेस.

राजेश - तू मात्र आहे तशीच आहे. आमचा मित्र दिन्या भलताच नशीबवान आहे ब्बा !

निलांबरी - अरे लेक लग्नाचा झाला. त्याच्या समोर काय हे, गैरसमज करेल ना तो.

ओजस - क्षमानी केला नाही कधी गैरसमज . याला काय घाबरायचे. आणि ही प्रजा दिसते तशी नाही. आपल्यापेक्षा पुष्कळ पुढे आहे.  आज आपण त्याच्यामुळेच भेटलो आहे. तोच म्हणला तुला मेसेज करतो.

निलांबरी -  हो खूप आनंद झाला मला, त्याचा मेसेज बघून, लगेच भेटू म्हणलं.

ओजस - मावशी रागवू नको, पण सांग ना, तुला आईबद्दल काही माहिती आहे का?  

राजेश - हो गं. मलाही खटकत आहे,  इतकी अपसेट असते क्षमा हल्ली. मी खूप प्रयत्न केला बोलायचा, पण काही उपयोग झाला नाही.

ओजस - मावशी, मी खूप अडकून गेलो आहे गं. नवीन जॉब, त्यात आजकाल सतत स्वतःला रोज प्रुव्ह करावे लागत. खूप कमी वेळ मिळतो मला घरात. 
त्याबद्दल ती बोलते नेहमी. त्याची सवय आहे मला. पण सध्याच काहीतरी वेगळच आहे.
सतत काहीतरी विचार करत असते. हरवलेली असते. छोट्या गोष्टीत खूप चिडचिड करते. बोलताना मधूनच उदास होऊन जाते. काळजी वाटते गं.

निलांबरी - लग्न कधी करणार तू ? म्हणजे बघायला वगैरे सुरुवात केली का? की करायचे नाही?.

ओजस - हे काय मधेच? विषय बदलू नको ना.

राजेश - खरचं विषय नको बदलू, काही सिरीयस असले, तरी आम्हाला ऐकायचे आहे.

निलांबरी - विषय नाही बदलत. तू सांग, लग्न ?

ओजस - करणार आहे, पण अजून वर्षभर तरी नाही. नेत्रा आमच्या ऑफिसमध्येच आहे. ती एमबीए  करते आहे. ते झाले की जॉब.

 निलांबारी - म्हणजे सगळं ठरलं आहे.

ओजस - हो, पण हे आईबाबा दोघांना माहिती आहे. त्यांना आवडते नेत्रा. आम्ही मिळून हे ठरवले आहे.

निलांबारी - प्रॉब्लेम तो नाहीच. फक्त काही गोष्टी विचारुन घेतल्या इतकंच. तुला मेसेज केला, ते तुझ्या आणि क्षमामध्ये काही बिनसलं नाही ना याचा अंदाज घ्यायला, आणि नंतर राजेशला फोन करुन, पाणी तिथे तर नाही ना मुरत, हेही बघितले.

राजेश - निलू, तू काय बोलते आहेस, माझ्या तर डोक्यावरुन चालले आहे सगळे. क्षमा आणि मी लग्नाआधी पासून घट्ट मित्र आहोत.  आम्ही सगळ्या गोष्टी बोलतो एकमेकांशी. तू तर तिला रेग्युलर भेटत पण नाही मग...

निलांबारी - हो मान्य. आमच्या भेटी वरचेवर होत नाही. पण मला थोडाफार अंदाज आहे  की काय चालू आहे, कारण मी स्वतः नुकतीच त्यातून गेले आहे. 
मला क्षमा मधले बदल गेला महिनाभर जाणवत होते, ते तिच्या सतत बदलणाऱ्या सोशल मिडीया स्टेट्सवरुन. पूर्वी तिला डीपी, स्टेट्स काहीच माहिती नव्हतं, पण आता ती भलतीच अक्टीव्ह असते.

ओजस - ते तर मी शिकवले तिला. दोन महिन्यापूर्वी तिचा फोन पण बदलला. आधी नको म्हणली, मी काय कॉलेज गोइंग आहे का? पण जमायला लागल्यावर भलतीच खुश असायची.

निलांबारी - तेच तर सुरुवात जुने फोटो, मस्त शायरी, चारोळी, गाणी, एक ना अनेक गोष्टी असायच्या. गृपमध्ये खूप चर्चा व्हायची. 
पण इतक्यात खूप उदास, हरवलेले असे काहीतरी असते. सुरुवातीला एक दोघींनी विचारले, तर नीट उत्तर दिले नाही तीने. मग त्यांनीही सोडून दिले. 

ओजस - मावशी, तू मघाशी म्हणली, की तू हे अनुभवलं आहे, म्हणजे काय नेमकं?"

निलांबारी - सांगायला थोडं अवघड आहे. एक तर तुम्ही दोघे पुरुष आहात. 
ओजस - मावशी पुरुष असलो तरी दगड नाही गं. आम्हालाही जाणवलं, म्हणून तर आलो ना इथे, तेही लगेच.

निलांबारी - त्याबद्दल तुमचे खरचं कौतुक आहे. आणि म्हणूनच प्रयत्न करते.
बघा कस आहे, की क्षमा आणि मी शाळेतल्या मैत्रिणी. मोठे झालो, लग्न झाली, आमच्या भेटी कमी झाल्या, पण सोशल मिडीयाने पुन्हा जवळ आणले. वरचेवर भेट नाही जमत पण मेसेज, कॉल तरी होतात.
सध्या आम्ही सगळ्याच वयाच्या एका अवघड टप्प्यावर आहोत. 
ज्यामुळे शरीरात बदल होत आहेत, त्यात प्रचंड उलथापालथ आहे आणि त्याचे परिणाम मनावर होत असतात. ज्यातून जावेच लागते.  डॉक्टरी भाषेत याला मेनोपॉझ म्हणतात.

राजेश - ओह आय गॉट यू. मला येतंय लक्षात तुला काय सांगायच आहे. मी वाचलं आहे याविषयी, थोडफार पण त्यात शारीरिक समस्यांची माहिती जास्त होती आणि तसे कोणतेच प्रश्न तिच्यात दिसले नाही मला.

निलांबरी - या गोष्टी सगळ्यांसाठी सारख्या नसतात आणि शारीरिक बदल लक्षात तरी येतात. कळत नाही, ती मानसिक अस्वस्थता.
आपले काहीतरी निसटत चालले आहे, हरवणार आहे, अस्तित्व बदलणार असे अनेक उलटसुलट विचार येतात. 
पूर्वीचा काळ खूप वेगळा होता. एकत्र कुटुंब, माणसांचा राबता, सततची उठबस यात बायकांना हा टप्पा पार केल्याचे, लक्षातही यायचे नाही, पण आता तसे नाही. दिवसेंदिवस सगळ जग, संकुचित होत चालले आहे. 
प्रत्येक जण स्वतःच्या व्यापात इतका अडकतो की त्यालाच जगणे म्हणतो. नाती आणि त्यातला संवाद हरवत चालला आहे.सण, सुट्टी, पिकनिक हे पण तांत्रिक होत आहे. 
राजेश, त्यात तुझे सतत परदेशी जाणे, ओजसची नवी नोकरी. त्यामुळे तुम्हाला घरात मिळणारा कमी वेळ. 
त्यात आता ओजसचे जमलेले लग्न , म्हणजे त्यातून येणारे नवनवीन विचार, क्षमा एकटीच करत असणार. 
आणि कुणाशीच बोलावेसे, सांगावेसे वाटणार नाही. मग सगळ्याचा संबंध, कारण नसताना, आता आपण एकटे पडणार का? याच्याशी ती लावत  राहणार. 
आणि त्याची चाचपणी छोटया, छोटया गोष्टीतून करण्याचे वेडे प्रयत्न करणार.. 
जसे डीपी, स्टेट्स बदलत राहणे, त्याची दखल कोण घेत हे पाहणे,
क्षमा याचा वापर करुन, तिच्या जवळचे तिची किती काळजी करतात, तिच्या छोटया गोष्टी न सांगता, त्यांच्या किती पटकन लक्षात येतात हे बघते आहे.
याशिवाय काही जणी तर, उगाच नावडते पदार्थ बनवणे. त्यावर ताशेरे ऐकणे, खाण्यात टाळाटाळ करणे, आवडत्या मालिका टाळून नावडत्या चॅनलवर रेंगाळणे, एक ना अनेक गोष्टी करतात..

ओजस - मावशी अगं ब्रेक घे. तू या विषयावर पी एच डी करणार आहेस की काय? की घाबरवत आहेस आम्हाला? किती काय, काय सांगते आहेस, पण एक मात्र मान्य, यातल्या बऱ्याच गोष्टी आई करते हल्ली."

निलांबरी - मी नाही, माझी धाकटी कन्या हा विषय  घेऊन पी एच डी करत आहे. सायकोथेरपिस्ट आहे ती. 
काही महिन्यांपूर्वी मी तिचा आयता बकरा होते. मला तिनेच यात मदत केली.
काय काय सांगत असायची. आता मी तिने सांगितलेले कुठे दिसले आणि व्यक्ती ओळखीची असली तर, आधी प्रत्यक्ष तिच्याशी बोलते. पुरेसे नाही झाले तर, त्यांच्या जवळच्या माणसांना सावध करते. गरज असेल तर माझ्या लेकीची मदत घ्यायला सुचवते.
तेही फक्त एक माणुसकी म्हणून. सगळंच काही पैशात नाही मोजता येत, हो ना?  
क्षमा तर माझी वर्ग मैत्रिण. तिची काळजी वाटली मला. तुम्हाला भिती वाटावी, म्हणून नाही सांगत हे सारे.

राजेश - कळते गं मला तुझी काळजी, पण मला तर हे डिपी, स्टेट्स अगदीच निरुपयोगी वाटायचे. रिकामटेकडी माणसे हे उद्योग करतात. असा समज होता माझा. याचा असा उपयोग होत असेल असे वाटले नाही कधी. 

ओजस - ते सगळं सध्या, बाजूला ठेवू या, पण यावर उपाय काय? तिला डॉक्टरकडे न्यावे लागेल? औषध द्यावी लागतील का? 
आणि मुख्य म्हणजे हे तू आईशी बोलली होतीस का याबद्दल?

निलांबरी - तुम्हाला संपर्क करण्याआधी मी तिला फोन, मेसेज करुन अंदाज घेतला होता आणि त्यात ती तुम्हा दोघांना मिस करते आहे असे वाटले, ती नाही म्हणली, तस काही. माझा आपला अंदाज.
मी स्वतः यातून गेले, तेव्हा माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला टार्गेट केले  होते. ती बदलली, मला विसरली, अनेक गैरसमज. तेंव्हा मला दिनेश किंवा मुलींनी कितीही सांगितले तरी, कधीच पटले नाही. 
अगदी तसेच माझ्या बोलण्याचा क्षमावर परिणाम झाला नाही, म्हणून ठरवलं तुम्हाला विचारावे, पण फोनवर सांगण्यासारखा विषय नाही नव्हता हा.
आणि काळजी नको करु ओजस, औषध देण्याइतकी परिस्थिती मला तरी वाटली नाही.
सोशल साईट विषयी तुझे वाटणे अगदीच चुकीचे आहे, राजेश त्याचे तोटे आहेत तसे फायदे ही आहेत. फक्त समस्या लक्षात यायला, ती नजर हवी.

ओजस - मावशी, मग काय आता आम्ही, सारखे आईचे डीपी, स्टेट्स बघत रहायचे का? 

निलांबरी - हरकत काय आहे? नेत्राचे नाही करत? पण हो तितकंच पुरेसे नाही. तिला गृहीत धरणे, थोडे दिवस बंद करावे लागेल. तिच्याशी गप्पा मारणे, तिच्या आवडीच्या गोष्टी करणे, मस्करी करणे. छोट्या छोट्या गोष्टीही सांभाळाव्या लागतील. फार अवघड नाही पण विशेष लक्षात घेऊन करावे लागेल, नाहीतर..."

राजेश - ए बाई, थांब. तुझी नाहीतर.. ची गाडी पार्क करुन टाक. 
नुसतीच झलक हलवून गेली आहे आम्हाला. यापेक्षा जास्त झेपणार नाही सध्यातरी. आम्ही काळजी घेऊ तिची, आणि मदत लागलीच, तर तुझ्या कन्येची भेट घेऊ. बट रियली थँक्यू.

ओजस - बाबा काय रे, फक्त थँक्यू म्हणतो. मावशी, इसके लिये तो, मेरे तरफ से पार्टी.

निलांबरी - पार्टी तर हवीच, पण नेत्राची बातमी लपवून ठेवली, म्हणून डबल हवी.

ओजस - नक्की. त्यासाठी आईला घेऊन लवकरच भेटू.

(ओजस आणि राजेश निलांबरीचा निरोप घेऊन, घरी परत निघतात, वाटेत)

ओजस - बाबा, तू आणि आई चार दिवस मस्त कुठेतरी जाऊन या. तोपर्यंत मी या सगळ्याचा नीट स्टडी करतो. मग ठरवू अजून काय करायचे ते.

राजेश - आम्ही नाही, आपण जाणारच आहोत, तुला इथे नाही सोडणार, नाही तू आणि नेत्रा मिळून वेगळाच स्टडी कराल. त्याला हरकत नाही पण, सध्या क्षमाला आपल्या दोघांची तितकीच गरज आहे रे.

ओजस - येस बॉस, उद्याच सुटी प्लॅन करुन, बुकिंग करतो.

(काय मंडळी, जवळच्या व्यक्तीमधला, छोटासा बदलही लक्षात येणे आणि त्याची काळजी वाटणे यालाच तर प्रेम म्हणतात ना..
मग तुम्हीही घेणार ना बदलांची दखल..)
********************