तुटणे नव्हे टिकवणे ?
"दो बजके उनत्तीस मिनिट पर आनेवाली बोरिवली फास्ट लोकल आज प्लॅटफॉर्म नंबर 3 के बजाय प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आयेगी."
कानावर सगळं पडत होतं निखिलच्या पण त्याची नोंद त्याचं मन मात्र घेत नव्हतं. आजूबाजूचे लोक पटापट निघून जिन्याकडे जाऊ लागले आणि भानावर आला तो आणि त्याच्या लक्षात आलं की आपण किती विचार करत बसलोय साक्षीचा, एकूणच नात्याचा. त्याने ट्रेनचा एकूणच नाद सोडून दिला.
सरळ प्लॅटफॉर्मच्या बाहेर आला तो.
अमीर खानची ऊर्जा आणि व्यक्तिमत्व ज्याच्यापुढे फिकं पडेल असा निखिल आज विचार करून करून अगदी मलूल झाला होता.
आज ऑफिसमध्ये सुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं त्याचं म्हणून half day टाकून निघाला होता तो.
स्टेशनच्या बाहेर आला तर एक पुस्तकांचं दुकान दिसलं. तो आत शिरला. जवळजवळ अर्ध्या तासाने बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात पुस्तक होतं "101 ways to fix your unhappy married life."
साक्षी...... नुकतीच चाळीशी पार केलेली पण अजूनही तिशीत आहे की काय असं वाटणारी, मनाने अगदी खंबीर आणि एकदम rational thinking असणारी. आपल्या वकील मैत्रिणीच्या ऑफिसमधून बाहेर पडली. हातात divorce चे कागद घेऊन.
सोहम. अत्यंत स्मार्ट मुलगा. त्याच्या कॉलेजमधून बरं वाटत नाहीये असं कारण देऊन लवकर घरी आलेला. आजची संध्याकाळ काय घेऊन येईल याचा विचार करत आई बाबांची वाट बघत एकीकडे मोबाईलवर काहीतरी करत बेडवर पडून होता.
त्याला नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दिवाळीची धमाल आठवत होती. सगळ्या नातेवाईकांना जमवून मस्त थाटामाटात दिवाळी साजरी झाली होती.
नंतर तिघे आठ दिवसांची काश्मीर ट्रिप करुन आले होते. त्यात आईबाबा असे मिरवले होते की हनिमून कपल्स पण फिके पडले होते.
मग असं अचानक काय झाले? गेल्या महिन्या दीड महिन्यात यांच्यात सतत वकील-घटस्फोट असल्याच चर्चा असतात.
मागच्या महिन्यात सोहमने मिळवलेले यश बघता त्याच्याकडून कॉलेज, प्रोफेसर यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण घरात असे विचित्र घडत असल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते.
आज दोघांशी स्पष्ट बोलायचेच असेच ठरवून तो घरी लवकर आला होता.
आधी निखिल घरी आला आणि फ्रेश होण्यासाठी आत गेला जाताना हातातले पुस्तक टेबलावर ठेवले. पुस्तकाचे नाव बघून सोहमला थोडा आधार वाटला.
थोड्यावेळाने साक्षी आली. सोहमकडे बघून हलकेसे हसली पण चेहऱ्यावर ताण स्पष्ट जाणवत होता. पुस्तकाकडे तिरकस कटाक्ष टाकत त्याच्या शेजारी हातातले पेपर मुद्दाम आपटत तीही आत गेली. सोहमने पेपर उघडून बघितले आणि त्याला गोष्टी अपेक्षित असूनही धक्काच बसला.
"आई आधी बाहेर ये बघू, बाबा तूही ये, लगेच या. मला तुमच्या दोघांशी आत्ताच्या आता बोलायचे आहे."
दोघे बाहेर आले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलेले होते. मघाशी दिसणारी अस्वस्थता विचित्र शांततेत स्थिरावली होती. सोहमला हा बदल खटकला पण ते बाजूला ठेवून त्याने मुद्द्यालाच हात घातला.
"मला एकदा कळेल का आपल्या घरात सध्या काय चालू आहे. मी आता लहान नाही की कानावर पडणाऱ्या गोष्टींचे अर्थ समजणार नाहीत. दीड एक महिन्यापासून काय काय ऐकतो आहे. सुरुवातीला वाटले तुम्ही कुठल्या तरी मित्र-मैत्रिणीविषयी बोलत असाल, नंतर स्वतःची समजूत घातली कदाचित भास असतील, म्हणूनच विचारायचे रोज उद्यावर ढकलत होतो. पण या सगळ्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होतो आहे, म्हणून ठरवले आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच.आई तू तर आज हद्दच केलीस. घटस्फोटाचे पेपर घेऊन आलीस. एकदाही बोलावेसे वाटले नाही तुला? तरी बाबाने आणलेले हे पुस्तक माझ्यासाठी आशेचा किरण आहे."
" थांब सोहम, गैरसमज होतोय तुझा. मी ते पुस्तक उपाय शोधायला नाही तर कोर्टात काय काय कारण सांगता येतील ते ठरवायला आणले आहे."
"बाबा आर यू ओके? कारण ठरवायला म्हणजे? "
" घटस्फोट घ्यायचा तर पटणारी कारण तर द्यावी लागतील ना? तीस वर्षांचा सहवास अनुभवाला आम्ही दोघांनी. तुझा जन्मही पुऱ्या दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाला. त्यामुळे खूप साऱ्या वादळांना भिडून आलोय आम्ही."
" अरे यार तेच तर ना. मग गेल्या दीडेक महिन्यात असे नेमके काय झाले की तुम्ही आज इथेपर्यंत येऊन पोहचला आहात. किमान एक कारण सांगा मला.."
" बाळा, कारण नाहीच काही, पण आमचेही वाद होतात, भांडणे टोकाला जातात, आम्ही दोघे अगदी दोन ध्रुवांवर वावरतो हे आम्हाला नव्याने जाणवायला लागले आहे. मी ते माझ्या मैत्रिणीला पटवून दिले म्हणूनच तिने हे पेपर बनवून दिले ना."
" पुस्तक चाळल्यावर मला तीस एक मुद्दे तरी सापडले जे पुढे करुन हे सगळे अगदी सहज पार पडेल."
" माझ्या डोक्याचा ना आता भुगा झाला आहे. तुमची बडबड मला वेडे करेल. त्यामुळे प्लिज एक फेवर करा आणि काय ते सरळ, स्पष्ट सांगा."
" सरळ आणि स्पष्ट सांगायचे तर बरोबर पन्नास दिवसांपूर्वी तू लिहिलेल्या प्रायोगिक एकांकीकेला पहिले बक्षीस मिळाले ना तसे जगून बघायचे आम्ही ठरवले आहे घटस्फोट - तुटणे नाही टिकवणे."
" गेली तीस वर्षे आम्ही करत असलेला विचार किती पोकळ आहे हे किती परफेक्ट मांडले आहेस तू. नाते म्हणजे कागदाचे बंधन नसते. मतभेद नाते पोखरत जातात आणि उरते ती फक्त तडजोड.
अशी तडजोड आता करायची नाही. तुटेपर्यंत ताणायचे इतकेच ठरवले आहे.आणि हो यामुळे फार काही बदलत नाही उलट नाती अधिक स्वच्छ आणि मोकळी होतात. एकमेकांशी कसे जास्त प्रॅक्टिकल होता येते हेही तू उत्तम मांडले आहेच ना."
अशी तडजोड आता करायची नाही. तुटेपर्यंत ताणायचे इतकेच ठरवले आहे.आणि हो यामुळे फार काही बदलत नाही उलट नाती अधिक स्वच्छ आणि मोकळी होतात. एकमेकांशी कसे जास्त प्रॅक्टिकल होता येते हेही तू उत्तम मांडले आहेच ना."
" नो...नो... प्लिज थांबवा हे डायलॉग. एकतर ते नाटक होते स्पर्धेसाठी लिहिलेले. तो माझ्या अभ्यासाचा-कामाचा भाग होता. त्याचा अनुभव कोणी घेण्याचा विषयच कुठे येतो. आणि त्यात दोघांचे मतभेद, त्यामुळे होणारी फरफट बघितलीच नाही का तुम्ही? "
" बघितले म्हणून तर इतका मोठा निर्णय घेत आहोत ना? तू ज्याला मतभेद-फरफट म्हणतो अशा त्यातल्या किमान ऐंशी टक्के गोष्टी आम्हीही अनुभवल्या आहेत. रुसवे-फुगवे झाले, आरोप-प्रत्यारोप झाले, टोकाची भांडणे पण झाली पण कधी विचारांची, कधी मोठ्यांच्या मायेची तुरटी फिरायची आणि सगळ्याचा निचरा व्हायचा. आम्ही तोडायचे नाही हा विचार करुन प्रत्येकवेळी माघार घेतली होती म्हणलं आता टिकवणे अनुभवून बघू या."
" ऐंशी टक्के ? मी नाही बघितले कधी?"
" म्हणून होत नव्हती असे तर होत नाही ना. "
"तरीही नाटक आणि प्रॅक्टिकल लाईफ वेगळे असते. "
" म्हणजे घटस्फोट हा उपाय नाही असे तुझेही म्हणणे आहे का?"
"अर्थात हो. पण म्हणून काय दरवेळी तेच तेच गुळमुळीत दाखवायचे का? नाट्य आणि परिस्थिती यातली तफावत रसिकांनी सांभाळली तरच काहीतरी वेगळे निर्माण होईल ना?"
" गल्लत करतोयस सोहम तू. अशा विषयांवरचे नाट्य, साहित्य हे कधीच पूर्ण काल्पनिक असू शकत नाही. त्याला एकतर भूतकाळ किंवा भविष्याची किनार जोडलेली असते. तू ज्याला गुळमुळीत म्हणतो ती आपल्या संस्कृतीची, संस्कारांची विचारधारा आहे. नाते कागदाने जपता किंवा तोडता येत नाही. तसेच ते फक्त दोन व्यक्तींचे नसते याची जाणीव यातून होते म्हणून तर उशीरा का होईना पण आमच्या मधल्या ताणाचा तुझ्यावरही परिणाम झालाच ना?"
"आणि ज्याला तू वेगळं काहीतरी असे नाव देत आहेस ते तुझे प्रयोग येणारा भविष्यकाळ रेखाटणार आहेत. चूक आणि बरोबर यातल्या सीमारेषा पुसणार आहे."
" म्हणजे माझे लेखन त्याला मिळालेले यश यात काही खटकते आहे का तुम्हला?"
" तुझे यश हा अभिमानाचाच विषय आहे आमच्यासाठी पण त्यासाठी निवडलेली वाट मात्र निश्चित क्लेषदायी आहे. प्रगती करताना नेमकी कशाची तोडमोड आपण करतो आहोत ह्याचे भान तू हरवतो आहेस. कोणतेही काम हे कधीच फक्त वैयक्तिक नसते तर त्याचे काही ना काही परिणाम समाज मनावर आघात करत असतात."
" रसिक मनोरंजन म्हणून कलाकृती अनुभवताना त्यात गुंतत जातात. त्याला हळूहळू प्रमाण मानू लागतात याची जाणीव आतापर्यंत होऊन गेलेल्या दिग्गजांना होती म्हणून तर त्याचे भान सांभाळून त्यांनी तुझ्या भाषेत गुळमुळीत मांडणी केली आहे."
" त्यातही तुझी कलाकृती यशस्वी झाली नसती ना तर फार चिंता नव्हती पण तसेही घडले नाही. तेव्हा मात्र आम्ही थोडे हादरलो. अजून किती आणि काय वेगळे प्रयोग करशील याने धस्स व्हायला झाले. असे का बरं घडले विचार केल्यावर लक्षात आले की तुझे लेखन हे खूप सहज, सोपे आणि अनुभवांवर आधारलेले आहे."
" तिथेच आम्हाला आमची चूक लक्षात आली. तू खूप वर्षांनी झालास म्हणून तुझ्या बाबतीत आम्ही सदैव जागरुक असायचो. तुला वाढवताना तुझ्या मनावर परिणाम होतील म्हणून अनेक गोष्टी तुझ्यापर्यंत येऊच दिल्या नाही. त्यामुळे तू त्या अनुभवल्याच नाहीत. त्यामुळे असे सगळ्यांच्यात घडत असते हेच तुला मान्य नाही."
" त्यामुळे कथानकाच्या दुसऱ्या बाजूचा तू कधी विचारच केला नाहीस. मतभेद आणि उपाय याचे गणित तर मांडले पण त्यात वजा आणि भागाकार यांचे परिणाम तुला माहितीच नव्हते. दुसऱ्याच्या जखमेची बोच समजायला स्वतःलाच ठेच लागावी लागते हेच खरे. मग आम्ही मिळून ठरवले की हाही अनुभव तुला द्यायला हवा. "
" डोन्ट टेल नाऊ की हे सगळे नाटक होते?"
" अलबत ! नाटकच होते फक्त ते वठवताना आम्ही संपत चाललो होतो. आज तर साक्षीने आणलेल्या पेपर सह्या करताना नाटकातल्या मुलाप्रमाणे तूही माझ्या खांद्यावर हात ठेवून धीर देत आहेस असे स्वप्नही मी प्लॅटफॉर्मवर बघितले."
"पण हे सगळे तुम्ही मला सरळपणे सांगू शकला नसता का? का मी समजू शकलो नसतो असे वाटले तुम्हाला?"
" सांगून समजले असते तर तू असे लिहिलेच नसते ना. अनुभवांच्या धर्तीवरचे तुझे लेखन समृद्ध करायला तसे अनुभवच यायला हवे ना."
"फक्त या आधी जाणीवपूर्वक तुझ्यापासून जे लांब ठेवले होते ते ओढून ताणून तुझ्यापुढे मांडताना आमचा खरच घटस्फोट तर नाही ना होणार हीच भिती मला वाटायची. याचे दडपण घेऊन फिरताना गेला दीड महिना मी मन मोकळे वागणेही विसरुन गेलो होतो."
" पण मला मात्र मी खरच इतकी rational आहे हे अनुभवताना आपल्यात अनेक गोष्टी बदलू शकतात असे नव्याने समजले."
" आता तुमचे काय झाले, काय मिळाले याचे पाढे ठेवा बाजूला, आणि माझे काय होते आहे ते बघा. तुमचे म्हणणे मला नुसते समजलेच नाही तर मी चांगले अनुभवले आहे. माझी चूकही मी मान्य करतो पण हे आता थांबवा."
" आम्हाला पण काही हौस नाही असली नाटके करायची पण यापुढे तू हटके लेखन करताना त्यातून सुदृढ समाजाचेच स्वप्न उभे कर.
अनुभवांचा उपयोग सहज लिखाणासाठी कर पण तेच प्रमाण मानू नको. प्रत्येक विषयाचा चौफेर विचार करत जा."
अनुभवांचा उपयोग सहज लिखाणासाठी कर पण तेच प्रमाण मानू नको. प्रत्येक विषयाचा चौफेर विचार करत जा."
" कोणतीही कलाकृती ही समाजमनास खतपाणी घालत असते हे विसरु नकोस."
" नाही विसरणार कदापि नाही विसरणार. माताश्री-पिताश्री मला आशीर्वाद द्या."
"यशस्वी भव!"
निश्चिन्त झालेल्या निखिल आणि साक्षीला आता यश, प्रसिद्धी किंवा पैसा मिळवताना सोहम चौफर विचारांनीच वाटचाल करेल याची मनोमन खात्री झाली
************************

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome