(ही गोष्ट आहे क्षमा, तिचा समंजस मुलगा ओजस आणि नवरा राजेश यांची..)
ओजस - बाबा, एक विचारु का ? तुझे आणि आईचे काही बिघडले आहे का?
की माझ्याकडून काही झाले आहे? तिची बडबड, ओरडा याची सवय आहे, पण सध्या ती खूप रेस्टलेस असते.
राजेश - ह्म्म्म मीही विचार करतच होतो की तुझ्याशी बोलावे, बरं झालं तूच विषय काढला.
ओजस - काही सिरियस आहे का? मी काही करु का ?
राजेश - आता तूच काहीतरी कर. गंभीर आहे की नाही माहित नाही. गेले पंधरा दिवस माझा हर एक प्रयत्न झाला, पण कुठे आणि काय बिनसले याचा अंदाजच येत नाही. "
ओजस - घरात नाही, तर मग ऑफिसमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये तर नाही ना काही इश्यू ?"
राजेश - तसं असत, तर तीने मला सांगितले असते.
ओजस - मला परवा निलू मावशीचा मेसेज आला होता. तशी ती मला कधी मेसेज नाही करत. जस्ट कसा आहेस ? आई-बाबा कसे आहेत असे विचारत होती.
राजेश - निलू म्हणजे निलांबरी का? मला पण आला होता तिचा फोन. क्षमाचा लागला नाही म्हणून केला म्हणाली. याच गप्पा झाल्या साधारण.
ओजस - तिला माहिती असेल का काही?
राजेश - काय माहित? तशा त्या इतक्या भेटत नाहीत बहुदा. मेसेज, फोन होत असतील. एवढयात तेही सांगितल्याचे आठवत नाही.
ओजस - असं असतानाही तिने आपल्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला उगाच वाटत आहे की, तिला विचारावे एकदा. बघू आज मेसेज करतो. आता पळतो, उशीर होईल नाहीतर. "
( दुपारी ओजस बाबाला मेसेज करतो.)
ओजस - निलू मावशीने आपल्या दोघांना भेटायला बोलवलं आहे. आई नको.
राजेश - काही झाले आहे का ?
ओजस - काहीच अंदाज नाही आला. फोन करु का विचारलं, तर नको प्रत्यक्षच भेटू म्हणली.
राजेश - बरं मी कळवतो क्षमाला, आज उशीर होईल. तू पण मेसेज कर.
ओजस - नाही लवकर बोलावलं आहे तिने. घरी नको सांगू. नेहमीच्या वेळेतच जा, असेही सांगितले.
राजेश - मी अर्ध्या तासात आवरतो आणि निघतो. आपल्या नेहमीच्या सुक्षांतमध्ये भेटू. निलुला सांग. पाचला ये बरोबर.
( ५-५.१५ च्या दरम्यान सुक्षांतमध्ये )
ओजस - कशी आहेस मावशी? आपण किती दिवसांनी भेटतो आहे..
राजेश - कदाचित तीन वर्षांनी. तुला जॉब लागला, म्हणून आम्ही घरी आलो होतो सगळ्या मैत्रिणी.
क्षमानी पार्टी दिली होती. हे फबी, व्हॉटस् ॲप आहेत म्हणून बरंय, अपडेट कळतात, नाहीतर ओळखलं नसत तुला. किती बदला आहेस.
राजेश - तू मात्र आहे तशीच आहे. आमचा मित्र दिन्या भलताच नशीबवान आहे ब्बा !
निलांबरी - अरे लेक लग्नाचा झाला. त्याच्या समोर काय हे, गैरसमज करेल ना तो.
ओजस - क्षमानी केला नाही कधी गैरसमज . याला काय घाबरायचे. आणि ही प्रजा दिसते तशी नाही. आपल्यापेक्षा पुष्कळ पुढे आहे. आज आपण त्याच्यामुळेच भेटलो आहे. तोच म्हणला तुला मेसेज करतो.
निलांबरी - हो खूप आनंद झाला मला, त्याचा मेसेज बघून, लगेच भेटू म्हणलं.
ओजस - मावशी रागवू नको, पण सांग ना, तुला आईबद्दल काही माहिती आहे का?
राजेश - हो गं. मलाही खटकत आहे, इतकी अपसेट असते क्षमा हल्ली. मी खूप प्रयत्न केला बोलायचा, पण काही उपयोग झाला नाही.
ओजस - मावशी, मी खूप अडकून गेलो आहे गं. नवीन जॉब, त्यात आजकाल सतत स्वतःला रोज प्रुव्ह करावे लागत. खूप कमी वेळ मिळतो मला घरात.
त्याबद्दल ती बोलते नेहमी. त्याची सवय आहे मला. पण सध्याच काहीतरी वेगळच आहे.
सतत काहीतरी विचार करत असते. हरवलेली असते. छोट्या गोष्टीत खूप चिडचिड करते. बोलताना मधूनच उदास होऊन जाते. काळजी वाटते गं.
निलांबरी - लग्न कधी करणार तू ? म्हणजे बघायला वगैरे सुरुवात केली का? की करायचे नाही?.
ओजस - हे काय मधेच? विषय बदलू नको ना.
राजेश - खरचं विषय नको बदलू, काही सिरीयस असले, तरी आम्हाला ऐकायचे आहे.
निलांबरी - विषय नाही बदलत. तू सांग, लग्न ?
ओजस - करणार आहे, पण अजून वर्षभर तरी नाही. नेत्रा आमच्या ऑफिसमध्येच आहे. ती एमबीए करते आहे. ते झाले की जॉब.
निलांबारी - म्हणजे सगळं ठरलं आहे.
ओजस - हो, पण हे आईबाबा दोघांना माहिती आहे. त्यांना आवडते नेत्रा. आम्ही मिळून हे ठरवले आहे.
निलांबारी - प्रॉब्लेम तो नाहीच. फक्त काही गोष्टी विचारुन घेतल्या इतकंच. तुला मेसेज केला, ते तुझ्या आणि क्षमामध्ये काही बिनसलं नाही ना याचा अंदाज घ्यायला, आणि नंतर राजेशला फोन करुन, पाणी तिथे तर नाही ना मुरत, हेही बघितले.
राजेश - निलू, तू काय बोलते आहेस, माझ्या तर डोक्यावरुन चालले आहे सगळे. क्षमा आणि मी लग्नाआधी पासून घट्ट मित्र आहोत. आम्ही सगळ्या गोष्टी बोलतो एकमेकांशी. तू तर तिला रेग्युलर भेटत पण नाही मग...
निलांबारी - हो मान्य. आमच्या भेटी वरचेवर होत नाही. पण मला थोडाफार अंदाज आहे की काय चालू आहे, कारण मी स्वतः नुकतीच त्यातून गेले आहे.
मला क्षमा मधले बदल गेला महिनाभर जाणवत होते, ते तिच्या सतत बदलणाऱ्या सोशल मिडीया स्टेट्सवरुन. पूर्वी तिला डीपी, स्टेट्स काहीच माहिती नव्हतं, पण आता ती भलतीच अक्टीव्ह असते.
ओजस - ते तर मी शिकवले तिला. दोन महिन्यापूर्वी तिचा फोन पण बदलला. आधी नको म्हणली, मी काय कॉलेज गोइंग आहे का? पण जमायला लागल्यावर भलतीच खुश असायची.
निलांबारी - तेच तर सुरुवात जुने फोटो, मस्त शायरी, चारोळी, गाणी, एक ना अनेक गोष्टी असायच्या. गृपमध्ये खूप चर्चा व्हायची.
पण इतक्यात खूप उदास, हरवलेले असे काहीतरी असते. सुरुवातीला एक दोघींनी विचारले, तर नीट उत्तर दिले नाही तीने. मग त्यांनीही सोडून दिले.
ओजस - मावशी, तू मघाशी म्हणली, की तू हे अनुभवलं आहे, म्हणजे काय नेमकं?"
निलांबारी - सांगायला थोडं अवघड आहे. एक तर तुम्ही दोघे पुरुष आहात.
ओजस - मावशी पुरुष असलो तरी दगड नाही गं. आम्हालाही जाणवलं, म्हणून तर आलो ना इथे, तेही लगेच.
निलांबारी - त्याबद्दल तुमचे खरचं कौतुक आहे. आणि म्हणूनच प्रयत्न करते.
बघा कस आहे, की क्षमा आणि मी शाळेतल्या मैत्रिणी. मोठे झालो, लग्न झाली, आमच्या भेटी कमी झाल्या, पण सोशल मिडीयाने पुन्हा जवळ आणले. वरचेवर भेट नाही जमत पण मेसेज, कॉल तरी होतात.
सध्या आम्ही सगळ्याच वयाच्या एका अवघड टप्प्यावर आहोत.
ज्यामुळे शरीरात बदल होत आहेत, त्यात प्रचंड उलथापालथ आहे आणि त्याचे परिणाम मनावर होत असतात. ज्यातून जावेच लागते. डॉक्टरी भाषेत याला मेनोपॉझ म्हणतात.
राजेश - ओह आय गॉट यू. मला येतंय लक्षात तुला काय सांगायच आहे. मी वाचलं आहे याविषयी, थोडफार पण त्यात शारीरिक समस्यांची माहिती जास्त होती आणि तसे कोणतेच प्रश्न तिच्यात दिसले नाही मला.
निलांबरी - या गोष्टी सगळ्यांसाठी सारख्या नसतात आणि शारीरिक बदल लक्षात तरी येतात. कळत नाही, ती मानसिक अस्वस्थता.
आपले काहीतरी निसटत चालले आहे, हरवणार आहे, अस्तित्व बदलणार असे अनेक उलटसुलट विचार येतात.
पूर्वीचा काळ खूप वेगळा होता. एकत्र कुटुंब, माणसांचा राबता, सततची उठबस यात बायकांना हा टप्पा पार केल्याचे, लक्षातही यायचे नाही, पण आता तसे नाही. दिवसेंदिवस सगळ जग, संकुचित होत चालले आहे.
प्रत्येक जण स्वतःच्या व्यापात इतका अडकतो की त्यालाच जगणे म्हणतो. नाती आणि त्यातला संवाद हरवत चालला आहे.सण, सुट्टी, पिकनिक हे पण तांत्रिक होत आहे.
राजेश, त्यात तुझे सतत परदेशी जाणे, ओजसची नवी नोकरी. त्यामुळे तुम्हाला घरात मिळणारा कमी वेळ.
त्यात आता ओजसचे जमलेले लग्न , म्हणजे त्यातून येणारे नवनवीन विचार, क्षमा एकटीच करत असणार.
आणि कुणाशीच बोलावेसे, सांगावेसे वाटणार नाही. मग सगळ्याचा संबंध, कारण नसताना, आता आपण एकटे पडणार का? याच्याशी ती लावत राहणार.
आणि त्याची चाचपणी छोटया, छोटया गोष्टीतून करण्याचे वेडे प्रयत्न करणार..
जसे डीपी, स्टेट्स बदलत राहणे, त्याची दखल कोण घेत हे पाहणे,
क्षमा याचा वापर करुन, तिच्या जवळचे तिची किती काळजी करतात, तिच्या छोटया गोष्टी न सांगता, त्यांच्या किती पटकन लक्षात येतात हे बघते आहे.
याशिवाय काही जणी तर, उगाच नावडते पदार्थ बनवणे. त्यावर ताशेरे ऐकणे, खाण्यात टाळाटाळ करणे, आवडत्या मालिका टाळून नावडत्या चॅनलवर रेंगाळणे, एक ना अनेक गोष्टी करतात..
ओजस - मावशी अगं ब्रेक घे. तू या विषयावर पी एच डी करणार आहेस की काय? की घाबरवत आहेस आम्हाला? किती काय, काय सांगते आहेस, पण एक मात्र मान्य, यातल्या बऱ्याच गोष्टी आई करते हल्ली."
निलांबरी - मी नाही, माझी धाकटी कन्या हा विषय घेऊन पी एच डी करत आहे. सायकोथेरपिस्ट आहे ती.
काही महिन्यांपूर्वी मी तिचा आयता बकरा होते. मला तिनेच यात मदत केली.
काय काय सांगत असायची. आता मी तिने सांगितलेले कुठे दिसले आणि व्यक्ती ओळखीची असली तर, आधी प्रत्यक्ष तिच्याशी बोलते. पुरेसे नाही झाले तर, त्यांच्या जवळच्या माणसांना सावध करते. गरज असेल तर माझ्या लेकीची मदत घ्यायला सुचवते.
तेही फक्त एक माणुसकी म्हणून. सगळंच काही पैशात नाही मोजता येत, हो ना?
क्षमा तर माझी वर्ग मैत्रिण. तिची काळजी वाटली मला. तुम्हाला भिती वाटावी, म्हणून नाही सांगत हे सारे.
राजेश - कळते गं मला तुझी काळजी, पण मला तर हे डिपी, स्टेट्स अगदीच निरुपयोगी वाटायचे. रिकामटेकडी माणसे हे उद्योग करतात. असा समज होता माझा. याचा असा उपयोग होत असेल असे वाटले नाही कधी.
ओजस - ते सगळं सध्या, बाजूला ठेवू या, पण यावर उपाय काय? तिला डॉक्टरकडे न्यावे लागेल? औषध द्यावी लागतील का?
आणि मुख्य म्हणजे हे तू आईशी बोलली होतीस का याबद्दल?
निलांबरी - तुम्हाला संपर्क करण्याआधी मी तिला फोन, मेसेज करुन अंदाज घेतला होता आणि त्यात ती तुम्हा दोघांना मिस करते आहे असे वाटले, ती नाही म्हणली, तस काही. माझा आपला अंदाज.
मी स्वतः यातून गेले, तेव्हा माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला टार्गेट केले होते. ती बदलली, मला विसरली, अनेक गैरसमज. तेंव्हा मला दिनेश किंवा मुलींनी कितीही सांगितले तरी, कधीच पटले नाही.
अगदी तसेच माझ्या बोलण्याचा क्षमावर परिणाम झाला नाही, म्हणून ठरवलं तुम्हाला विचारावे, पण फोनवर सांगण्यासारखा विषय नाही नव्हता हा.
आणि काळजी नको करु ओजस, औषध देण्याइतकी परिस्थिती मला तरी वाटली नाही.
सोशल साईट विषयी तुझे वाटणे अगदीच चुकीचे आहे, राजेश त्याचे तोटे आहेत तसे फायदे ही आहेत. फक्त समस्या लक्षात यायला, ती नजर हवी.
ओजस - मावशी, मग काय आता आम्ही, सारखे आईचे डीपी, स्टेट्स बघत रहायचे का?
निलांबरी - हरकत काय आहे? नेत्राचे नाही करत? पण हो तितकंच पुरेसे नाही. तिला गृहीत धरणे, थोडे दिवस बंद करावे लागेल. तिच्याशी गप्पा मारणे, तिच्या आवडीच्या गोष्टी करणे, मस्करी करणे. छोट्या छोट्या गोष्टीही सांभाळाव्या लागतील. फार अवघड नाही पण विशेष लक्षात घेऊन करावे लागेल, नाहीतर..."
राजेश - ए बाई, थांब. तुझी नाहीतर.. ची गाडी पार्क करुन टाक.
नुसतीच झलक हलवून गेली आहे आम्हाला. यापेक्षा जास्त झेपणार नाही सध्यातरी. आम्ही काळजी घेऊ तिची, आणि मदत लागलीच, तर तुझ्या कन्येची भेट घेऊ. बट रियली थँक्यू.
ओजस - बाबा काय रे, फक्त थँक्यू म्हणतो. मावशी, इसके लिये तो, मेरे तरफ से पार्टी.
निलांबरी - पार्टी तर हवीच, पण नेत्राची बातमी लपवून ठेवली, म्हणून डबल हवी.
ओजस - नक्की. त्यासाठी आईला घेऊन लवकरच भेटू.
(ओजस आणि राजेश निलांबरीचा निरोप घेऊन, घरी परत निघतात, वाटेत)
ओजस - बाबा, तू आणि आई चार दिवस मस्त कुठेतरी जाऊन या. तोपर्यंत मी या सगळ्याचा नीट स्टडी करतो. मग ठरवू अजून काय करायचे ते.
राजेश - आम्ही नाही, आपण जाणारच आहोत, तुला इथे नाही सोडणार, नाही तू आणि नेत्रा मिळून वेगळाच स्टडी कराल. त्याला हरकत नाही पण, सध्या क्षमाला आपल्या दोघांची तितकीच गरज आहे रे.
ओजस - येस बॉस, उद्याच सुटी प्लॅन करुन, बुकिंग करतो.
(काय मंडळी, जवळच्या व्यक्तीमधला, छोटासा बदलही लक्षात येणे आणि त्याची काळजी वाटणे यालाच तर प्रेम म्हणतात ना..
मग तुम्हीही घेणार ना बदलांची दखल..)
********************


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome