Tuesday, May 04, 2021

प्रेम प्रस्ताव दिन



त्याने आज कॉलेजला मुद्दाम दांडी मारली.. 

घरात एकटा असण्याची चोख व्यवस्था केली.. 

सर्वात आधी त्याने दिवाणखाना सुंदर आवरला, रचना बदलली, जेणेकरुन मनात असलेले सगळे सहज करता येईल.. 

इतकंच काय पण खिडक्यांचे पडदेही बदलले..

कोपऱ्या कोपऱ्यात फुलांच्या आकाराच्या सुगंधी मेणबत्या सजवल्या.

सार काही मनासारखे झाल्यावर स्वतःभोवती मस्त गिरकी घेऊन स्वयंपाक घराकडे आगेकूच केली..

याची आवड त्याला खूप लहानपणापासूनच असल्यामुळे, इथे तो लिलया वावरायचा पण आज फार वेळ नसल्यामुळे त्याने पटकन करता येईल, असे सोपे आणि सहज होणारे पदार्थ निवडले.. 

स्वागतासाठी एक आजच्या पिढीला आवडणारे वेगळे सरबत बनवून थंड करण्यासाठी शीतकपाटात ठेवले..

शेवटी गोड आईस्क्रीम तर हवेच म्हणून पटकन जाऊन तेही आणले.. 

खास तयार करुन घेतलेली फ्रेम पुन्हा एकदा डोळे भरुन बघितली.. 

मग एका सुंदर तलम मोरपंखी कापडात गुंडाळली वर लाल रंगाची सॅटीन रिबिन बांधली.. 

हे सगळं करताना घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता.. 

आता घाई करायला हवी, हातात वेळ थोडा आणि बरीच तयारी बाकी होती..

गाणे गुणगुणत मस्त अंघोळ करून तयार झाला.. 

नभोमंडळी अस्ताला जाणारा दिनकर मेघांशी रंगपंचमी खेळत होता..

तांबडया, पांढऱ्या, निळ्या रंगांच्या छटांनी ते निसर्गचित्र असे काही रंगले की त्याच्या मनातली कारंजी चहू दिशांनी उमलू लागली..

स्वतःवर खूष होऊन मनात वेळेचे गणित मांडले.. 

मघाशीच, थोड्याच वेळात घरी पोहचणार असे फोनवर बोलणे झाले होते..

मोबाइलच्या बटणांशी चाळा करुन रस्त्यावरच्या रहदारीचा अंदाज घेतला..

आज रस्ता एकदम मोकळा होता, थोडक्यात ठरवल्यानुसारच होत असल्याने जीव भांड्यात पडला.. 

हातात अजून अर्धा तास होता.. 

मनातला अति विचार करणारा असूर उगाच खोड्या काढू लागला..

हे सगळं मला हवे असले तरी समोरच्याला आवडेल का..? 

नाही आवडले तर गैरसमज करुन तोफगोळे डागले जातील का..? 

मग सगळा बेरंग होईल का ..? एक ना अनेक का उगाच दाटून आले..

उगाच विषाची परिक्षा नको म्हणून थोडी आगाऊ कल्पना द्यायला संदेश लिहिला..

‘थोडयाच वेळात घर येईल. दार उघडे असेल. अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येतील. पण माझ्यासाठी, कोणतेही प्रश्न न नको.. 

समोर आलेल्या क्षणांचा आपण मिळून, फक्त मनसोक्त आनंद घेऊ ही विनंती नाही, आग्रह आहे.. 

अधिक उणे प्रत्यक्ष भेटून बोलू, वाट बघतोय.. ’


पाठवू की नको... पाठवू की नको अशा दोलायमान अवस्थेत एकदाचा पाठवला.. 

क्षणभरात दोन निळ्या बरोबरच्या खुणा चमकल्या आणि आश्चर्य म्हणजे कोणताही प्रतिप्रश्न आला नाही.. 

याचा थोडा ताण, भीती, काळजी सगळं एकत्र साठले, ते हाताळण्यासाठी आवडती गाणी सुरु केली.. 

मगाशी सजवलेली एकेक मेणबत्ती प्रज्वलित केली.. 

सगळ्या लावल्यावर दिवे बंद केले, नि तिथला माहोलच बदलला..

इतक्यात गाडी दारात आली, पार्कींग झाले हे जाणवले.. 

स्वागतासाठी सज्ज दारातून दिसणारा मंद प्रकाश, ऐकू येणारे गाणे आणि मघाशी फोनवर आलेला संदेश सारे धागे जुळले.. 

तरीही नेमके काय आणि का या उत्सुकतेने पावलांनी आतला वेध घेतला..

आतल्या तयारी तर कुठल्यातरी वेगळ्याच जगात नेत होती.. 

काही विचारावे तर त्याने आता नको असे मानेने सुचवत थंडगार सरबत पुढे धरले..

सोफे कुरकुरले, जीव विसावले.. 

आवडती गाणी, सरबताची जिभेवर रेंगाळणारी चव,  यामुळे आता बोलूही नये, सोपवून द्यावे स्वतःला या आताच्या क्षणांवर असे वाटू लागले.. 

मनातले भाव नकळत डोळयात उतरले.. 

त्याने ते अचूक हेरले.. 

हात पुढे करत गाण्याच्या सोबत ताल धरायला आमंत्रण दिले.. 

नकळत हात हातात गुंफले, पावलांनी लय पकडली.. 

स्वर्ग फक्त दोन बोट राहिला, असे वाटत असताना, हातांची वीण सैल करत तो एकदम गुडघ्यांवर बसला..

सुरेख वेस्टनात सजवलेली फ्रेम समोर धरली.. 

आता यात अजून काय वाटून अधीरतेने बोटे फिरली, रिबिनीची नीरगाठ सैल झाली.. 

त्यातले छायाचित्र बघून अत्यानंद झाला, पण तरी हे सारे आज का..? 

या न उलगडणाऱ्या प्रश्नातून मोकळे करण्यासाठी तो काहीश्या खट्याळ आवाजात बोलू लागला..

"तसा मी मनमौजी.. सतत मित्रमंडळींच्या गराड्यात रमलेला.. माझी खोली सदैव अस्ताव्यस्त.. मोबाईल म्हणजे तर जीव की प्राण, सोबत आयपॉड, लॅपटॉप असतात.. एकूण काय तर यातले काहीही फार काही कौतुकाचे नाही.. 

नाही म्हणायला शैक्षणिक तक्ता नेहमी समाधानकारक आहे, उपाशी राहावे लागू नये, इतपत स्वयंपाक येतो.. पोट भरून बाकी मौज मजा करता येईल एवढी आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय सांभाळतो आहे.. 

तर असा मी, आज काय तो प्रेम प्रस्ताव दिनाचे (प्रपोज डे)औचित्य साधून मनापासून विचारतो, "तुम्ही दोघे मला मिळणाऱ्या पुढच्या सगळ्या जन्म, योनी यात, माझेच आईबाबा व्हाल ना?"

त्याच्या शब्दात अडकलेली नजर पुन्हा छायाचित्राकडे वळली.

तो जन्माला आल्या तेंव्हाची ती पहिली आठवण.. 

पाळण्यात खट्याळ हसणारा तो आणि त्याला अनिमिष बघणारी ती दोघं..

सकाळीपासून होणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना उलगडू लागल्या.. 

त्याचा नाटकाला जाण्यासाठी हट्ट, नाही म्हणायला संधी नको म्हणून आधीच काढून ठेवलेली तिकिटे..

नाटक संपताच घरी लवकर येण्यासाठी दहादा बजावणे,फोन करुन खात्री करणे...

नंतर पाठवलेला संदेश.. आणि त्यानंतरचे सारे सारे वेगाने डोळ्यासमोर तरळून गेले..

दोघांनी त्याला नजरेने जवळ बोलावले नि घट्ट हृदयाशी धरले.. 

तिघांच्या प्रेमाची ती लोभस मिठी पाहून हे प्रपोजल शिक्कामोर्तब करण्याचा मोह देवालाही होणार, हे ओघाने आलेच..


***************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome