Tuesday, May 04, 2021

बालवाडी


कल्पनेतील आधुनिक बालवाडी

अहो काय सांगू, आज एक गंमतच झाली.. 

स्वप्नात पाहिली, गमतीची शाळा..
तिथे आपण सारे, जाऊ या चला..!

या ओळी जुळवत, मोठ्याने गात, माझी मानस कन्या गार्गी, म्हणजे माझ्या वर्गातली चिमुरडी नाचत आली.. 

मी जरा कामात होते..

बाईसाहेब दारातूनच ओरडल्या,” ताई, ऐका ना..” 

आणि धावतच येऊन गळ्यात पडत, तिच्या गप्पांची गाडी पुढे सरकली..

"काल की नाही, एक मज्जाच झाली, मला ना एकदम भारी स्वप्न पडल..” 

ताई बाईंचे लवकर आवरणार नाही, हे लक्षात आल्यावर मी कान तिच्याकडे ठेवून, आधी माझ्या कामाचा पसारा आवरला.. 

मला तिचे सारे बोलणे नीट ऐकायचे होते, म्हणून तिला माझ्या समोर बसवले.. 

मग तर तिची तुफान मेल, अजिबात थांबली नाही..

“तुम्हाला माहित आहे, मला स्वप्नात काय दिसलं माहिती आहे..? 

नाही ना ओळखू येत..?

अहो मी शाळा बघितली..!

तशी आपल्याच शाळेसारखी होती, पण तरीसुद्धा खूप वेगळी होती.. 

तिथे खूप खेळणी होती, भारी भारी पुस्तक होती आणि खूप सारे लॅपटॉप सुद्धा होते..

आणि ससा, मांजर असे प्राणी पण होते..

लिहायला फक्त वही, पेन्सिल नाही, तर भिंत, फरशी खूप काही होते.. 

तिथे डबा नाही न्यायचा तर, आपला खाऊ आपण शाळेतच बनवायचा.” बाईसाहेब बोलतच होत्या..

बाकी सगळे बालगोपाळ जमेपर्यंत, आम्ही दोघींनी तिचा तो स्वप्न प्रवास पुन्हा एकदा करुन आलो..

पुढे नेहमीसारखी शाळा सुरु झाली, पण माझ्या विचारातून, गार्गीचे स्वप्न काही केल्या जाईना..

तिच्या स्वप्नातली शाळा, ही तिच्या बालमनाला सहज सुचली  की तशीच असायला हवी..

जी आता थोडी तिला हवी तशी असली तरी, फारशी हवी तशी नाहीच मुळी..

म्हणजेच आपण शाळा, शिक्षण म्हणून नकळत काही गोष्टी, मुलांच्या मनाविरुद्ध करत आहोत का ? असा प्रश्न सतावू लागला..

बालशिक्षणात काम करताना अनेक पुस्तकांची पारायण झालेली जसे की दिवास्वप्न, चीपर बाय डझन, तोत्तोचान, विथ लव्ह सर, चला खेळू खेळ, गमतीची शाळा.. 

मला माझ्या विद्यार्थ्यांना, सहज शिक्षण कसे देता येईल, यावरच माझा भर असतो, तरीसुद्धा माझी ही कन्या, जर मला तिच्या स्वप्नात फिरवून आणते..?

मला याचा सखोल विचार करावासा वाटला..

खरं सांगते, त्या विचारांच्या मागे मला अक्षरशः पळावे लागले, मग एका नव्या आधुनिक बालवाडीचे दिवास्वप्न मला दिसले..

जी बालवाडी अनेक जुन्या नव्या गोष्टीचा समतोल साधणारी होती, फक्त गार्गी नाही तर पुढच्या किमान दहा वर्षात येणाऱ्या मुलांना आपलेसे करणारी, घरी जावेसे वाटणार नाही अशी होती..

बालवाडीची जागा  

परिसर खूप मोठा, त्याची चौकट आवश्यक उंचीच्या संरक्षक भिंत तयार झालेली.. 

आजूबाजूला भरगच्च झाडी, त्यात आंबा,पेरु,बुच,कडुलिंब, जांभूळ असे मोठे, डेरेदार शीतल छाया देणारे वृक्ष..
 

समुद्राच्या वाळूचा एक मोठा हौद..

काही ठिकाणी गोल, त्रिकोण, चौकोन, पंचकोन असे विविध भौमितीक  आकारांची मैदाने..

एकावेळी दहा बारा मुलांना खेळता येईल असा पोहण्याचा तलाव..

आणि या सगळ्याच्या बरोबर मध्यभागी बालवाडीची इमारत..

प्रत्येक वर्ग खोली  

पंचवीस मुलांना सहज बागडता येईल इतकी मोठी..

अष्टकोनी आकार, ज्यात सजवायला जास्त बोलक्या भिंती मिळतील.. 

न दिसणारी भिंतीमध्ये लपलेली साहित्याची कपाटे, त्यांची मांडणी विषयानुरुप, आणि नावे मुलांना समजतील अशी खाऊ, खेळ, हाताला काम, गंमत, डोळ्यांना मज्जा, डोक्याला व्यायाम अशी काहीतरी.. 

मुलांच्या उंची, गरजा यानुसार बेसिन आणि स्वच्छतागृह..





वेळ आणि दिनक्रम - 

ही बालवाडी शिक्षक, मदतनीस यांच्यासाठी पाच आणि मुलांसाठी चारच तास भरणार..

सहा विषय असणार व त्यानुसार वर्गखोल्या सजलेल्या असणार..

भाषा, गणित, परिसर, कला, क्रीडा, जीवनव्यवहार हे सहा विषय शाळेच्या वेळेत वेगवेगळ्या वर्गात फिरुन स्वतःचे शिकायचे, शिक्षक त्यासाठी लागेल ती मदत करतील..

प्रत्येक विषयाला अर्धा तास त्यातले २०-२५ मिनिटे प्रत्यक्ष विषय आणि उरलेल वेळ, वर्ग बदलायला.. 

यात तीन तास संपले की मग, एक तास रोज मैदान..

त्यातला अर्धा मुलांच्या आवडीचे खेळ आणि मग उरलेला अर्धा तास, गटाने ताईंनी ठरवलेले खेळ.. 

मग एक तास खाऊ आणि गप्पा.. 

शाळेला सुटी फक्त रविवार, पण त्यातही ज्यांना हवे, ते आधी सांगून रविवारी पण तासभर येऊन शकतील..

शिक्षिका (ताई) आणि मावशींचे (मदतनीस) नियोजन  

ताई सर्व विषय आणि वयोगट हाताळू शकणाऱ्या, तर मावशी आजीसारख्या अत्यंत प्रेमळ..

प्रत्येक विषय खोलीसाठी दोन ताई आणि एक मावशी.. 

तिघी हा वयोगट खूप आवडतो म्हणूनच, इथे काम करणाऱ्या.. 

त्यांचे काम अधिकाधिक निरीक्षक व मार्गदर्शक.. 

बाकी मुलांच्या 'मी' पणाला संधी.. 

बालवाडी शिक्षिका बालशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करुन नंतर किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण, प्रमाण व बोली भाषा यांचा सखोल अभ्यास व बोलताना अस्खलित बोलण्याचा अभिमान असणाऱ्या.. 

सतत नवे प्रयोग करत, आनंदाचा आणि उत्साहाचा वाहता झरा भासावा अशा.. 

या सगळ्याची जाणीव ठेऊनच त्यांचे वेतन हवे, असे सारे नियोजन..

तासिका नियोजन 

विषय पहिला रोज पहिला तास खेळाचा, त्यात अर्धा तास परिसरात नुसते फिरा.. 

बीया, सुकलेली पान गोळा करा..

पळा, आवडीचे खेळ खेळा, झाडावर चढा, रेतीच्या हौदात किल्ले करा, उड्या मारा, पोहण्याच्या तलावात पोहायला जा असे काहीही करा..

यावेळी सर्व ताई, मावशी आजूबाजूला असतील आणि मुलांच्या मागणीनुसार त्यांच्या खेळात सहभागी होतील, नाहीतर नुसते निरीक्षण करतील.. 

नंतरचा अर्धा तास सांघिक खेळ, कवायत यात सारखे बदल, संगीताचा, साहित्याचा भरपूर वापर असेल..

यानंतर स्वच्छ हातपाय धुवून एकत्रित प्रार्थना, राष्ट्रगीत होईल, मग वर्ग चालू होतील.. 

मुलांना हवे त्या वर्गात जाण्याचे स्वातंत्र्य असेल पण पक्षी-प्राणी यांच्या आवाजाची घंटा (चिमणी, कावळा, कोकीळ, मांजर, बदक, बेडूक इ. ) वाजली की वर्ग बदलायचा..

एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाताना, ताई त्या वर्गाच्या विषयाचे मेडल (बिल्ला) देणार, अशी सहा मेडल रोज जमवायची (घरी जाताना परत करायची)..

वर्ग आणि विषय

हाताला काम 

या वर्गात मणी, फुले, पान, बिया, काड्या, ठोकळे असे खूप सारे वेगवेगळे साहित्य असेल.. 

त्यातले हवे ते घेऊन आवडीच्या रचना करायच्या..

मुलांनी दरवेळी एकच साहित्य घेऊ नये यासाठी ताई नोंदी ठेवतील व नवीन साहित्य, रचना करण्यासाठी प्रेरणा देतील..

डोळ्यांना काम 

परिसर, विज्ञान नकळत शिकता यावे म्हणून या वर्गात प्राणी, पक्षी, फुले, पाने, कुटुंब, वहाने, ऋतू, घर, व्यावसायिक, नियम,काळजी अशा सर्व विषयांचे तक्ते, चित्रे, पझल, प्रयोग साहित्य  असतील.. 

त्याच्या खेळातून, निरीक्षणातून मुले ताईला प्रश्न विचारत, गप्पा मारत माहिती साठा वाढवतील आणि ताईंनी तो फुलवत रहातील..



कलेशी गट्टी 

इथे चित्रकला, हस्तकला हे मुख्य विषय.. 

त्यात चित्र काढणे, रंगवणे, ठसेकाम, चिकटकाम, घडीकाम असे वेगवेगळे अनुभव..

मुले स्वतःच्या पद्धतीने हवे ते साहित्य निवडतील.. 

आदर्शकृती समोर ठेवलेल्या असतील, पण त्या कशा बनवल्या, हे मात्र मुले त्यांचे तेच शोधतील.. 

त्यांना त्यांच्या सृजनशीलतेचे कारंजे अनुभवता येतील..




मग दोन प्राणी / पक्षी यांच्या आवाजाची घंटा वाजेल, ती वेळ नाश्ता करण्याची..

म्हणजे दोन वर्ग फिरल्यावर खाऊचा तास.. 

त्यातला अर्धा तास खाऊ बनवायला आणि उरलेला गप्पा मारत मनसोक्त ताव मारायला..

खाऊ

त्यासाठी भले मोठे आणि सर्व सोयी मुलांच्या वयाचा, उंचीचा विचार करुन सुसज्ज स्वयंपाक घर बालवाडीत आहे..

तिथे  चिरणे, घुसळणे, कुटणे, निवडणे अशी बरीच कामे करायला मिळतील.. 

मोड आलेल्या कडधान्यांची भेळ, कोशिंबीर, फळे, पोळी, वेगवेगळ्या पुऱ्या, लाडू असा पौष्टिक पण गमतीचा खाऊ बनवताना, यातले एखादे छोटे व शक्य ते काम मुलांनी करायचे, बाकी करायला आचारी मावशी-काका असणारच..

उदाहरणार्थ - कोशिंबीर करताना मोठा वयोगट काकडी,गाजर,बीट किसतील, छोटा गट सगळे पदार्थ एकत्र करतील..

मग ताई - मावशी वाटप करतील..

आणि सगळे मिळून गप्पा मारत फस्त करतील..

जीवनव्यवहार 

खाऊ खाऊन झाल्यावर मुले आणि सदस्य सगळेच आपली ताट, वाटी, पेला घासून, धुवून, कोरडी करुन जागेवर ठेवतील..

मग बसलेली जागा झाडून, पुसून स्वच्छ करतील.. 

पुढच्या विषयाला धूम ठोकतील..

त्यानंतर असेल..

अक्षरांची सफर 

वर्ग अक्षरांचा असला तरी, त्याला बंधन नाही, संस्कृत, मराठी, इंग्रजी वा हिंदी..

साऱ्या भाषा हातात हात घालून असतील..

कारण एक मुलांची मातृभाषा, जी त्यांना थोडीफार ओळखीची आहे, आणि बाकी साऱ्या नवीन..

या वयात मुले शिकवू तितक्या भाषा उत्तम शिकतात, त्यामुळे सगळ्या भाषांची छान तोंडओळख करुन देणारी ही बालवाडी.. 

त्यात प्रार्थना, श्लोकगाणी-गोष्टी असतील,
शब्दभांडार खजिन्यासारखे भरपूर असेल, त्यात सहजता, सुलभता असेल..

प्राथमिक वाचनबोली वापर आणि लेखन याचेही ठरलेले पण घाई कोणतीच नाही..

ठराविक कालावधीत पूर्ण व्हायलाच पाहिजे अशी सक्ती तर अजिबात नाही..

प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने आधीचा टप्पा पार केला की, मग पुढचा सुरु करेल..

यासाठी वय आणि शैक्षणिक वर्ष हे गणित असणारच नाही..

यासाठी ताई वैयक्तिक नोंदी वापरतील..

अंकांशी कुस्ती  

अंक हे रोज पूर्ण दिनक्रमात लागणारे, पण त्यांच्याशी जमवून घेताना लहानथोर सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात, म्हणून हे नाव..

इथेही वाचनवापर आणि लेखन असेच टप्पे आणि प्रत्येकाने आपल्या गतीने जायचे..

कालपेक्षा आज किमान एक पायरी पुढे जायचे हे नक्की.. 

लेखन हे तर शिकायचे पण हवेत, पाटीवर, वहीवर, फळ्यावर, भितींवर असे खूप प्रकार उपलब्ध..

त्याची सक्ती नाही, वळण, सुलेखन, किती यापेक्षा येण्याला महत्व.. सौंदर्याची आवड लावायची पण अतिरेक टाळायचा..


अनुभवांचे भांडार 

यात सतत नावीन्यपूर्ण गोष्टी.. 

परिसर सहल, बागकाम, जोडीकाम, गटकाम असे नियोजन यासाठी विशिष्ट वर्ग नाही..

तंत्रज्ञान ही आजच्या काळाची गरज ओळखून त्याचेही वयाला अनुरूप पण आवश्यक माहिती देणारे, अनुभव देणारे नियोजन नक्की असेल..

शक्ती उपासना करुन शाळा सुटेल..

रोजचे नियोजन आदल्या दिवशी ठरून ताई-मावशी आवश्यक तयारीत करुन घरी जातील..

असे विचार गोंधळ चालूच होते, असतात आणि पुढेही असतील.. 

असे ही उघड्या डोळ्यांनी बघितलेले दिवास्वप्न..

खरे तर पूर्णतः अशी बालवाडी आपण आज तरी घेत नाही.. 

अनेक प्रकारचे जबरदस्तीचे काम आपण नकळत मुलांवर लादतो, असे या स्वप्नाने मला दाखवून दिले.. 

आता मी नव्याने या साऱ्याचा विचार करुन मला माझ्यात, शाळेच्या व्यवस्थापनात काय बदल करता येतील, यासाठी कामाला लागणार आहे.










मग 

मज आवडते ही मनापासून शाळा..

या ओळी नुसत्या शब्दात न राहता अनुभवात दिसतील..

शाळा सुटल्यावर मुले आनंदाने ओरडणार नाही, तर घरी नाही यायचे म्हणून रडतील..

पुन्हा एकदा मी, हे दिवास्वप्न बघताना हरवून गेले..

यास सर्वांच्या शुभेच्छा मिळून सगळीकडे अस्तित्वात येऊ दे, हीच भगवंत चरणी प्रार्थना..


सदर लेखनास
१६ नोव्हेंबर २०१७ रोजी
आपटे प्रशाला पुणे आयोजित, आंतरशालेय शिक्षक निबंध
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला आहे..
***************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome