Wednesday, May 17, 2023

आईबाबा

अनेक सुंदर नात्यांची दैवी देणगी, अनुभवत आपण जन्म घेतो..

त्या नात्यांना सांभाळणे, रुजवणे हे फक्त रोज नव्याने करत राहावे लागते..

यात सदैव वात्सल्य, आधार, विश्वास, प्रेरणा, संस्कार अशा अनेक गुणांची ठेव आपल्याला नकळत ज्यांच्याकडून मिळते ते म्हणजे आईबाबा..

लहान मुलांना तुला आई आवडते, की बाबा, हा प्रश्न विचारलेला मला अजिबात आवडत नाही, कारण तुलना करावी असे हे नातेच नाही..

कुटुंब व्यवस्थेचे ते दोन भक्कम आणि तितकेच गरजेचे खांब आहेत, एका शिवाय काहीतरी कमतरता आहे, असमतोल आहे..


(बदलत्या समाजव्यवस्थेत आता एकल पालकत्व अनेक प्रकाराने दिसत असले तरी त्यावर आता बोलायचे नाही..)

म्हणूनच फक्त माझे बाबा यावर मला व्यक्तच होता येणार नाही, कारण त्यांच्या प्रत्येक गोष्टीत अर्धा भाग माझ्या आईचा अनुभवला आहे..

मी आईबाबा..दोघांच्या छत्र छायेत जन्मले, वाढले, घडले आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते सोबतच असणार आहेत, यासाठी मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते..

जे काही फुटकळ, चांगले कर्म पूर्वजन्मी केले असेल, ते या जन्मी त्यांच्या रुपात आशीर्वाद बनून  मी अनुभवते..

बाबा कसे होते, असे कुणी विचारले एक ना अनेक क्षण भोवती नाचू लागतात..

लग्न होईपर्यंत मी आईबाबांसोबत अर्ध्याहून अधिक भारत फिरले..

बाबांना फिरायची प्रचंड आवड होती, त्याला आईच्या काटकसरीने भक्कम आर्थिक पाठबळ दिले..

त्या सहली जीवन शिक्षणाची शाळा होती, अनेकदा प्रवासाची तिकिटे निश्चित नसायची, नियोजित ठिकाणी पोहचल्यावर रहाण्याची सोय केली जायची, अनेक चांगल्या वाईट गोष्टी व्हायच्या, पण त्यासाऱ्याला एक कुटुंब म्हणून अनुभवायचे, हे त्या दोघांकडे बघून मी शिकले..

वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असले तरी अभ्यासक्रम कधीच शिकवू शकला नाही, तो कर्तव्य आणि अधिकार यांच्यातला समतोल मी आई बाबांना बघून शिकले..

स्वीकारलेले काम, कुटुंब, नाती, सामाजिक कामाची आवड या सगळ्यात कर्तव्ये सांभाळताना दोघांनी अनेकदा एकमेकांना साथ दिलेली पाहिली..

त्यातून नकळतच कर्तव्य काय असतात, त्याकडे बघायचे कसे, ते पूर्ण करताना स्वतःला नव्याने घडवायचे कसे, हे अगदी आजही अनुभवत असते..

बाबांना सगळ्यांनी नेहमी शांत, हसरे बघितले, ते होतेही तसे पण दोघांनी असे असून चालत नाही म्हणून रागवणे, गरज असेल तिथे थोड्या रुक्ष शब्दात समजण्याची भूमिका अर्थात आई समर्थपणे सांभाळते..


अनेक निर्णय ठामपणे घ्यावे लागायचे, तेंव्हा बाबांच्या हळव्या स्वभावाला आईने स्वतः कठोर बनत जपले..

नोकरी, प्रबोधिनी, मिल्ट्री आणि इतरही अनेक सामाजिक संस्था यात रमण्याची बाबांची आवड, आई या सगळ्यात अलिप्त असल्याने अधिक फुलली..

आईमधल्या अन्नपूर्णेला बाबांनी मनापासून सांभाळले, आणि कौतुकाने नेहमीच फुलवले त्यामुळेच अगदी आजही घरी बनवलेले संस्कारित अन्न आम्ही मनसोक्त खातो..

पण त्यासोबतच अडीनडीला, प्रवासात, कार्यक्रम, उत्सवात बारा गावचे पाणी आणि मिळेल ते अन्न परब्रह्म असते, हा संस्कार करायलाही दोघे कधी विसरले नाही, तोही नुसत्या पोकळ शब्दांनी नव्हे तर स्वकृतीतून..

 

लग्न हा फक्त सोहळा नाही, तर दोन घरांना, नातेवाईकांना जोडणारी भारतीय संस्कृती दोघांनी मनापासून जपलेली बघितली, दोघेही एकमेकांच्या माहेर आणि सासर अगदी सारखेच प्रिय आहेत, कुठेही दूजाभाव झालेला बघण्यात नाही..

आम्ही दोघी मुलीच पण त्याचा अभिमानच सदैव अनुभवला,  आमच्या प्रत्येक आनंदातच नाही तर दुःखातही ते  आमच्यापुढे असायचे..

कोणी म्हणते मी आईसारखी दिसते, तर कुणी म्हणते बाबंसारखी..

मला नेहमी वाटते की, मुले जेंव्हा दोघांना बघत मोठी होतात, तेंव्हा त्यांच्यामधले जे जे आवडते, ते ते स्वतःमध्ये रुजवतात.. 

प्रसंगानुरुप ते गुण, ते भाव इतरांना अनुभवायला येतात आणि त्यावेळी ती कधी आईसारखी तर कधी बाबासारखी दिसतात.. 

पण असतात, ती त्या दोघांमधली उत्तमता आणि स्वतःचे वेगळपण यांनी बनलेली, मीही तशीच आहे..

मला आईबाबांची लेक, पण तरी थोडी वेगळी म्हणून ओळखावे असेच वाटते..  

अजूनही खूप आहे सांगण्यासारखे..

पण खरे सांगायचे तर लग्न, कुटुंब, नाती, पालकत्व याचे नकळत धडे आई बाबा दोघांना एकत्रित बघून शिकता येतात..

आज हा विश्वास आम्ही गंधारला देऊ शकतो हे त्याच्याशी बोलताना जाणवते, तेंव्हा मला त्या दोघांमधले थोडेफार माझ्यातही आले आहे, याचा आनंद होतो..

थोडक्यात फक्त बाबा किंवा फक्त आई असे त्या दोघांनीच कधी शिकवले नाही..

कधी ते किंवा ती कुठे कमी जाणवले तर ती गोष्ट त्यावेळेपुरती आहे, हे दोघेही लगेच न विसरता सांगायचे..

बाबांना आवडणार नाही, अशी भीती कधी आईने दाखवली नाही, की तुझी आई अशीच आहे असे कोणतेच गैरसमज बाबांनी मनात भरले नाही..

दोघेही एकमेकांच्या जागा नेहमीच भरून काढायचे..

अगदी आजही दोघेही आहेत, आणि असणार आहेत..





No comments:

Post a Comment

suggestions most wlcome