Sunday, December 10, 2023

अर्बन रुरल कनेक्ट

अनेकदा आपले शिक्षण आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन यात तफावत जाणवते, त्यामागे अनेक कारणे असतील, पण काहीवेळा यातील सूक्ष्म फरक दृष्टिकोनच बदलून टाकतात..

असाच काहीसा अनुभव सिटी प्राईड निगडी व न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या निवडक विद्यार्थी व शिक्षक गटाने घेतला..

सातारा जिल्ह्यातील आय ऑफ सी (Initiative of Change) संस्थेच्या पाचगणी येथील ग्रामपरी विभागातर्फे, ग्रामीण शहरी  विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दुवा साधण्यासाठी, अर्बन रुरल कनेक्ट नावाचा एक विशेष उपक्रम राबवला जातो..

याचा पहिला टप्पा शिक्षकांचे मत परिवर्तन होता..

(त्याविषयी सविस्तर https://abhigandhashali.blogspot.com/2023/10/blog-post_42.html 

https://abhigandhashali.blogspot.com/2023/10/blog-post_15.html )

मत परिवर्तन..? कोणते मत..?

भाषा शिकताना, आपण अनेक व्याकरण संकल्पना शिकवतो, त्यातील एक म्हणजे विरुद्धार्थी शब्द..

त्यात अनवधानाने गाव × शहर असे नकळत सांगतो, आणि तेच रुजते, त्याची पाळेमुळे खोलवर गेली की परिणामी आपण फक्त या जागांना नाही, तर तेथे राहणाऱ्या माणसांना सुद्धा आपल्या विरुद्ध समजू लागतो..

खरे तर या दोन भिन्न जागा असल्या तरी भौगोलिक, वैज्ञानिक, शास्त्रीय किंवा मानवी गरजांनुसार त्या पूर्णतः भिन्न नाहीत.. 

त्यात काही गोष्टी वेगळ्या, काही सामाईक तर काही परस्परपूरक आहेत..

उदाहरणार्थ कप-बशी आकार, आकारमान वेगळे पण उपयोग सारखाच..

दिवस रात्र यात वेळ, दृश्य स्वरुप वेगळे पण त्याची निसर्गातील आवश्यकता समान..

अगदी तसेच गाव आणि शहर यांच्यात बदलत जाणाऱ्या काळानुसार कमी जास्त भिन्नता आली असेल, पण दोन्ही मानवी वस्तीच्या जागा आहेत..

दोघांच्या प्राथमिक गरजा समान आहेत, त्यांच्या इच्छा, स्वप्ने सारखी आहेत, दोघांच्या भाव भावना देखील सारख्याच आहेत..

फरक असेल तर तो राहणीमान, आहार, सोयी सुविधा यात..

पण दोघांना एकमेकांच्या दिनक्रमाचे कुतूहल वाटते, ते शमावण्याचा प्रयत्न यातील वेगवेगळ्या कृती उपक्रमातून झाला..

आणि त्यातूनच गाव आणि शहर हे एकमेकांपेक्षा काही बाबतीत वेगळे आहेत, पण विरुद्ध नाहीत, हे मत तयार होत गेले..

दुसऱ्या टप्पा दिनांक ८ शुक्रवार व ९ शनिवार डिसेंबर रोजी पूर्ण झाला..

पहिल्या दिवशी सकाळी  शहरी शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रामीण शाळेस भेट होती, त्यानुसार सिटी प्राईड निगडीच्या निवडक सतरा विद्यार्थ्यांनी बामणोलीच्या शाळेस भेट दिली..

ढोल हलगीच्या गजरात स्वागत, पारंपरिक लेझिम नृत्य, लाठी काठी, मल्लखांब सादरीकरण इ. कार्यक्रम बघितले, शाळा पाहिली, बैलगाडीत बसण्याचा आनंद घेतला..

त्यानंतर बहुतांश ग्रामीण लोक जो व्यवसाय करतात, तो शेती व्यवसाय अंतर्गत पीक, स्ट्रॉबेरी, गहू, मिरची लागवड याची माहिती प्रत्यक्ष शेतात जाऊन घेतली, कांद्याच्या पातीची लागवड प्रत्यक्ष अनुभवली..


स्थानिक विद्यार्थ्यांच्या घरी ग्रामीण चवीच्या जेवणाचा आनंद घेतला..

मग दोन्ही शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामपरी संस्थेत आले, तिथे एक रात्र निवासी शिबीर अनुभवले..

तेथील वेगवेगळ्या खेळातून मुलांचा एकमेकांशी परिचय झाला, स्व शोधन, वेगवेगळ्या विषयांवरील विचारांचे आदान प्रदान झाले..

तर विविध कृती उपक्रमातून गाव आणि शहर यात फरक आहे, पण विरोधाभास नक्कीच नाही हेच नकळत रुजले..

We are different but not opposite..

शेवटच्या सत्रात दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळून सण-उत्सव, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, तंत्रज्ञान, स्त्री - पुरुष दिनक्रम या विषयांचे तक्ते बनवून त्याचे सादरीकरण केले, यात ग्रामीण गटाने शहराविषयी तर शहरी गटाने गावाबद्दल सांगितले, यातून आपोआप ज्या एकमेकांविषयी कौतुक, आदर भाव तयार झाले..

 

   
 


  

गावात अधिक प्रमाणात शेती होत असली तरी त्यावर आधारित व्यवसाय शहरात असतात, तंत्रज्ञान विकास शहरात झाला तरी त्यातून ग्रामविकास होऊ शकतो..

आरोग्य, शिक्षण याच्या सुविधा गावात होण्यासाठी ही भावी पिढी काम करु शकते, असे अनेक मुद्दे मुलांनीच मांडले..

त्यातूनच आपल्याकडे असणाऱ्या जमेच्या बाजू दुसऱ्या गटाला कशा उपलब्ध करुन देता येतील, याचे बीज आपोआप पेरले गेले..

शहर आणि गाव परस्पर पूरक झाले पाहिजे, हा नवा विचार दोघांना मिळाला..

एकूणच फक्त पुस्तकात दिसणाऱ्या चित्रातून आपला देश, आपली माणसे अभ्यासण्यापेक्षा, प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहून, गप्पा मारुन, त्यांच्या दिनक्रमाचा अनुभव घेत विद्यार्थी अनेक गोष्टी शिकले..

यासाठी आय ऑफ सी, ग्रामपरी यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन..

या उपक्रमात मला मुलांसोबत सहभागी होता आले, त्यासाठी आयोजक व नियोजकांचे मनापासून आभार.. 

ही संधी प्रत्येकासाठी अनेक नव्या गोष्टींची, बदलांची सुरुवात होवो हीच सदिच्छा..





2 comments:

  1. खूपच उपयुक्त...! ग्रामपरीचे आणि सिटी प्राईड स्कूलचे मन:पूर्वक अभिनंदन...! वृषाली, छान लिहिलंयत, व्यक्त झालायत...! त्यासाठी तुमचंही अभिनंदन...!

    ReplyDelete

suggestions most wlcome