हंपी बदामीची ओळख शाळेच्या पुस्तकात होते ..
इतिहास सांगणारी हंपीची पवित्र भूमी, अनेक हिंसक घाव झेलून, त्या जखमा अंगावर मिरवतना अनुभवणे हा खरोखर सुखद अनुभव आहे..
हा अनुभव पाठ्यपुस्तकाच्या चार ओळीत सामावणारा नसून, त्या जागांना, वास्तूला स्पर्श करुन मिळतो..
या उदात्त, वैभवशाली आणि काळाच्या कैक शतके पुढे असणाऱ्या सांस्कृतिक भूमीत आपण जन्म घेतला आहे या जाणिवेने ऊर भरून येतो..
या साऱ्याचा विध्वंस करु पाहणाऱ्यांच्या अगतिकतेची कीव वाटते..
जेंव्हा गाईड सांगतात, की या पाशवी आक्रमणापासून वाचवण्यासाठी या वास्तू रेती खाली दडवण्यात आल्या, तेंव्हा असे काम नेमके कसे केले असेल ही कल्पनाच अचंबित करते..
आपल्या देवता, त्यांच्या रंजीत शक्ती अचानक खऱ्या वाटायला लागतात..हनुमानाच्या जन्माने पवित्र झालेला पण तरीही त्याच्या मातेच्या नावाने ओळखला जाणारा अंजनाद्री पवर्त, मातृसत्ताक संस्कृती जपतो..
इथल्या विशालकाय गोल आकाराच्या, एकमेकांवर रचल्या प्रमाणे असणाऱ्या रेतीच्या शिळा कधी कोड्यात टाकतात, तर कधी अंगावर पडतील की काय अशा घाबरवून सोडतात, या गुरुत्वाकर्षणाला अपवाद कशा याचे कोडे जेंव्हा कुणालाच उलगडत नाही, तेंव्हा अमूर्त विधात्याच्या कलाकारीचे कौतुक वाटते..
विरुपाक्ष मंदिर सोडून कोणत्याही ठिकाणी पूजा होत नाही, कारण त्यापैकी अनेक ठिकाणी देवतांच्या मूर्ती नाहीत किंवा त्या भग्न केल्या आहेत..
तरीही त्या प्रेमात पाडतात, नतमस्तक करतात..
त्यांची भव्यता शाळेच्या दिनक्रमातील प्रतिज्ञेची आठवण होऊन हात नकळतजुळतात व मनोमन प्रार्थना घडते..या समृद्ध परंपरांचा पाईक होण्याची पात्रता, माझ्या अंगी येण्याची प्रेरणा दे..
सुटीचे दिवस असूनही पहाटे लवकर उठून, काहीशा अंधारात काटेकुटे विशाल दगड यांनी वेढलेला, अनोळखी डोंगर चढून सूर्योदय बघायला जाताना वेगळीच मजा येते..
अशावेळी हवामान साथ देत नाही, आपण आपली साखर झोप सोडू आलो असलो तरी, खट्याळ भानूदेव मात्र ढगांची दुलई घट्ट धरुन ठेवतो तेंव्हा मन काहीसे खट्टू होते..
पण त्या टेकडीवरून दिसणारा हंपीचा गौरवशाली प्रदेश फार काळ उदास राहू देत नाही..
नमुन्या दाखल बघितलेला काही भाग, जेंव्हा नजर जाईल, तिथवर पसरला आहे हे लक्षात येते, तेंव्हा ते सारे वैभव बघत रहाणे अविस्मरणीय आहे..
तुंगभद्रा नदीच्या काठावरील मंदिरातून फिरताना, तिचा कानी गुंजणारा अवखळ प्रवाह मोहवून टाकतो..
राजा राणी बनून ज्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले, प्रजेचा सांभाळ केला, त्यांच्या संपत्ती, समृद्धच्या खुणा कमल महाल, राणीचे स्नानगृह, राज दरबार सारख्या वास्तू बघताना मिळतो..
अखंड दगडात कोरलेल्या अति विशाल लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती, सोन्या चांदीच्या बाजाराचे दाखले, हत्ती खाना ही सारी, कोणत्याही आधुनिक साहित्यशिवाय साकारलेली वास्तूशिल्पे, त्याकाळच्या पण आज अज्ञात स्थापत्य शास्त्राची चुणूक दाखवून नतमस्तक करतात..
त्रिमितीय कोरीव काम, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला थिटे करते..
पन्नास रुपयांच्या नोटेवरील पाषाण रथ, खऱ्या रथारुढ राजा, त्याचे कौतुक करणारी प्रजा याची प्रतिकृती डोळ्यांसमोर आणते..
दगडी खांब जेंव्हा सूर छेडतात, तेंव्हा संगीत अधिक मनोहर होऊन जाते..
हे खांब विठ्ठलाच्या मंदिराचे आहेत, ज्याचे वास्तव्य पंढरपूरच्या मंदिरातही आहे, हे ऐकताना आपोआप ओळी स्मरतात,
कानडाऊ विठ्ठलु, कर्नाटकु..
कानडा राजा पंढरीचा..
शहरातला झगमगाट, सिमेंटची जंगले, साऱ्या प्रकारचे प्रदूषण, कलह, मतभेद, स्पर्धा या साऱ्यापासून काहीसे दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत वसलेलं हंपी मनाला एक वेगळीच ऊर्जा देते..

खूप छान
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Delete