अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
ही बहिणाबाई चौधरी यांची कविता पहिल्यांदा कुठे, कधी, कुणाकडून ऐकली हे आठवत नाही, पण ती अनुभवली, ते करोना काळात..
त्याचे झाले असे, की लहापणापासूनच भाकरी या पदार्थाशी विशेष सख्य नव्हते, पुढे लग्न झाल्यावरही पारंपरिक पदार्थ सासूबाई, आणि नव्या काळाचे मी अशी नकळत विभागणी झाली नवरा किंवा मुलगा दोघांनाही भाकरी विशेष आवडत नसल्याने, करायला शिकावी, यायला हवी असेही झाले नाही..
पण करोना काळात प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकण्याचा चंग बांधला होता, माझी गाठ पडली ती भाकरी सोबत..
त्या काळात सासूबाई आहारात फक्त भाकरी खायच्या, सुरुवातीला त्यांची त्या करूनही घेत होत्या, पण एकदा माझा मित्र शशांक, याच्याशी गप्पा चालू असताना भाकरी पुराण सुरू झाले आणि त्याने सांगितले की, तो फार छान भाकरी बनवतो, एकदम टम्म फुगणारी..
झालं..!
मग काय म्हणतात ना, स्वाभिमान की काय, तो दुखावला गेला, इतके पदार्थ बनवतो आपण, पण साधी भाकरी येऊ नये..? लगेच पक्के ठरवले, काही झाले तरी हे जमायलाच हवे..
लहान असताना माझी काकू, जी मूळ सोलापूरची आहे, तिच्या अतिशय पातळ, भल्या मोठ्या भाकरीचे भरपूर कौतुक ऐकलं, पाहिलं होतं, अगदी तशीच जमवायची असा निश्चय केला..
काही दिवसात अगदी तशी नाही, पण पुणेरी बाज असणारी, मध्यम आकाराची, पातळ आणि सर्वात महत्त्वाचं टम्म फुगणारी भाकरी जमू लागली..
आणि तेंव्हाच बहिणाबाईंच्या कवितेचा खरा अर्थ उमगला..
हवी तशी भाकरी येईपर्यंत, प्रक्रियेत रोज बदल करावे लागले, तेंव्हा राहून राहून ही कविता गुणगुणू लागायची..
तिच्या ओळी गेल्या वीस वर्षातला संसार डोळ्यांसमोर उभ्या करायच्या,आज त्यात असणारी स्वस्थता, समाधान, गोडवा येण्यासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान, केलेल्या तडजोडी लक्षात यायच्या..
या वेगवेगळ्या प्रसंगात व्यक्तींना तवा, चूल, निखारे यांची उपमा दिली, तर भूमिका बदलती असली, तरी त्यावर बनणारी संसार रुपी भाकरी उत्तम होण्यासाठी सगळे धडपड होते हे जाणवले..
प्रत्यक्षात किती भाकरी करायच्या, त्यासाठी पीठ किती घ्यायचे, त्यात योग्य मीठ व पाणी घालून मळायचे..
बरं हे पीठ मळणे, हे पोळीची कणीक मिळण्यापेक्षा खूपच वेगळे, कारण मुळातच ज्वारी, बाजरीच्या पिठात चिकटपणा कमी, त्यामुळे त्यासाठी वेगळेच कौशल्य लागते..
भाकरीच्या पिठाला पुन्हा पुन्हा आंजारावे, गोंजारावे लागते, एक न् एक कण एकमेकांशी सांधावा लागतो,
पीठ मळून गोष्ट संपत नाही, अजून भली थोरली लढाई असते, भाकरी थापून करावी लागते..
लाटणे आणि थापणे या क्रिया वेगळ्या का, हे भाकरी करताना समजते, त्यातही थालिपीठ थापणे आणि भाकरी थापणे हे अजून वेगळे..
थोडेसे कोरडे पीठ घेऊन, त्यावर मनसोक्त मळून घेतलेला गोळा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने भाकरी थापायची, ती सर्व बाजूंनी एकसारखी असेल तरच उचलता येते, मधेच कुठेतरी पातळ झाली की मोडते, कोरडे पीठ जास्त झाले की भेगा पडतात अशा अनेक बाबी अनुभवातून जमल्या..
छान थापलेली भाकरी तापलेल्या तव्यावर टाकली की असते खरी परीक्षा आणि आठवतात कवितेच्या मुख्य ओळी..
आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर..
ज्वारी, बाजरी हे प्रमुख पीक असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात, पोळी हा पदार्थ खूप नंतर आला..
पूर्वी भाकरी हेच प्रमुख अन्न होते, त्यासोबत मिळाली तर भाजी, नाहीतर मिरचीचा ठेचा, कांदा अगदी पाण्यासोबतही भाकरी खाल्ली जायची, ती अनेक दिवस टिकायची, त्यामुळे प्रवासाला जाताना शिदोरी म्हणून बांधून दिली जायची..
पुरण भरुन केली जाणारी तीच पोळी, तेंव्हा गहू तुलनेत कमी पिकायचा, त्यातून महाग, त्यामुळे सण समारंभाच्या वेळी पोळी नव्हे पुरणपोळी असायची..
पुरण न भरता पोळी करण्याची पद्धत सुरू झाली, तेंव्हा तिला चपाती हे नाव मिळाले..
पुढे खाण्याच्या पद्धती, शेती अनेक गोष्टीत बदल झाले आणि रोजच्या खाण्यात भाकरी ऐवजी गव्हाची चपाती मुख्य आहार बनली..
शहरी भागात तिलाच पोळी संबोधले जाऊ लागले आणि भाकरी काहीशी मागे पडली..
जशी भाकरीची कथा तशीच चुलीची गोष्ट, तिचे स्थान गॅस शेगडीने घेतले..
अरेच्या, विषय चालू होता, हाताला बसणाऱ्या चटक्यांचा, पण पोळी करताना तसा चटका बसण्याचे प्रसंग कमी येतात, काळजीपूर्वक केल्यास येतच नाही..
पण भाकरीचे तसे नाही..
कोरड्या पिठावर थापलेली भाकरी, उचलून तव्यावर टाकली की खरी परीक्षा असते, त्या कोरड्या पिठाच्या बाजूला, ना कमी ना जास्त पाणी टाकून, ते पूर्ण भाकरीभर एकसारखे पसरावे लागते..
आणि असे करताना तापलेल्या तव्यावर पाणी गरम होते आणि ते पसरवताना हलके चटके बसतात..
पण यानेच भाकरीचा खरपूस पापुद्रा तयार होतो, त्यामुळे ते चटके छान वाटतात..
जसे संसार येणाऱ्या किरकोळ कुरबुरी नाती अधिक घट्ट बनवतात, आपण अधिक समंजस होत जातो, रोजच्या छोट्या मोठ्या आव्हानांना सामोरे जायचे बळ मिळते..
भाकरीवरचे पाणी पुरले, असे म्हणतात की ती पचली, मग ती उलटवतात, ही वेळही अचूक साधावी लागते, अन्यथा दुसऱ्या बाजूला भेगा पडतात आणि मग ती फुगत नाही, उलटवलेली भाकरी दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी, पूर्वी तिला चुलीतल्या निखाऱ्यावर टाकताच ती मस्त फुगायची, आता तवा बाजूला करून शेगडीवर भाजतात, सगळा ताळमेळ जमला की भाकरी टम्म फुगते आणि छान खरपूस पापुद्रा सुटतो, अशी भाकरी खाताना खूप छान वाटते, अगदी तशीच नाही का मी हळूहळू संसारात रमत गेले..
एखाद्या वेळेस पीठ जुने झाले, विरी गेले, की मळताना थोडे कोमट पाणी वापरावे, उकड काढून घ्यावी किंवा त्याचे धिरडे, आंबील करतात, यातून समजते की प्रश्न असले, तरी त्यावर उपाय शोधता यायला हवा हे नव्याने उमगले..
असे एक ना अनेक अनुभव कवितेच्या प्रत्येक ओळीला समजून घेतना मला नव्याने समृद्ध, अधिक परिपक्व करत होते..
आणि एकदम जाणीव झाली, की शाळा, शिक्षण, अभ्यासक्रम या नावाखाली अशा सुंदर, तरल कविता, कथा शब्दशः अर्थ सांगून, आपण किती नीरस बनवतो..
त्यापेक्षा त्या फक्त पुन्हा पुन्हा वाचाव्यात, तोंडपाठ कराव्यात,
बहिणाबाईंच्या इतर अनेक कविता शिक्षक, आई बाबा, नातेवाईक, सांस्कृतिक, भाषिक कार्यक्रमात अनेकदा ऐकल्या, वाचल्या..
त्या कधी अभ्यासक्रमात होत्या की नाही, हेही आठवत नाही, पण त्यातल्या अनेक आजही तोंडपाठ आहेत, हे नक्की..
असे सांगितले जाते की या बहिणाबाई निरक्षर होत्या, एक शिक्षक म्हणून यावर हसावे की रडावे, हेच समजत नाही..
जाणवते ती शिक्षण नामक अर्थशून्य धडपड, पण मग आठवते, ती कृतियुक्त शिक्षण पद्धती..
प्रकर्षाने जाणवले कविता ऐकली होती, मनात खोलवर रुजली होती पण संसार, हाताचे चटके, भाकरी खाण्याचा आनंद तेंव्हाच समजला जेंव्हा हे सारे प्रत्यक्ष अनुभवले..
अर्थात उत्तम साहित्य ऐकवत राहायला हवे, फक्त ते लगेच समजून घेण्याचा निरर्थक अट्टहास करण्यापेक्षा ज्याने त्याने आपले अनुभव, प्रवास या सारे त्याच्याशी जोडून त्यातून जाणवणारे अर्थ, भावार्थ, मतितार्थ शोधायला हवे..
जसे आज मी भाकरी आख्यान मांडले, तुम्हाला सांगताना पुन्हा एकदा सारे अनुभवले, अगदी तसेच..
अशा साहित्याची भाषिक सहजता, सुमधुर शब्द आणि दैनंदिन अनुभवांची मांडणी यामुळे प्रत्येकाला ती आपलीच गोष्ट वाटते..
सतत होणारे बदल, येणारे प्रश्न - समस्या, सुख दुःख, यश अपयश याने ओतप्रोत भरलेले, अतिशय नाट्यमय असणारे प्रत्येकाचे आयुष्य अनेक साहित्यिक आपल्या कथा, कवितांमध्ये अचूक शब्दात रेखाटतात, चुकलेल्यांना नवी वाट दाखवतात, हरलेल्यांना नवी उमेद देतात..
आजच्या एआयच्या जमान्यात सामाजिकता, भावनिकता, सोशिकपणा या अनेक गोष्टी हळूहळू कमी होताना दिसत आहेत..
परवाच गप्पांमध्ये विषय झाला, की येणाऱ्या काळात नाती रुजविण्यासाठी, सांभाळण्यासाठी खूप काम करावे लागणार आहे, बाकी सारे स्विगी, झोमॅटो करता येईल, पण माणसातले माणूसपण प्रयत्नपूर्वक जपावे लागणार आहे..
यासाठी अशा कथा, कविता नक्कीच मदत करतील हे अर्थात अनुभवाने सांगावेसे वाटते..
पुन्हा एकदा वाचून नव्याने अनुभवण्यासाठी, कविता सोबत देत आहे..
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।
अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
आपले अनुभव सांगायला विसरू नका, प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..
Khup chan ..AI and Technology artificial relationship madhe माणसातले माणूसपण प्रयत्नपूर्वक जपावे लागणार
ReplyDeleteमनःपूर्वक आभार!
Deleteअसाच प्रतिसाद देत रहा.. प्रेरणा मिळते..
खूपच सुंदर लिहिले आहेस ... भाकरीवरून सुरु झालेल्या तुझ्या विचारमंथनातून माणसातल्या माणूसपणा पर्यंत घेऊन आलीस तितकीच विचारात मीही फिरले...
ReplyDeleteखरंच आपण काय काय ऐकतो,वाचतो ... असा कधीतरी त्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव येतो तेव्हा आपण अजूनच समृद्ध होतो ...
वाचत , ऐकत ऐकवत राहिलं पाहिजे .. मनापासून पटलं
खूप खूप प्रेम ... अशीच सुंदर लिहीत रहा 😘❤️😇
तुझा प्रतिसाद नेहमीच प्रेरणा देतो. 😍
Deleteमनापासून आभार 🧡💛💜
भाकर हा विषय घेऊन त्याभोवती केलेला लिखाणाचा प्रपंच अद्भुत आहे. मजा आली वाचताना
ReplyDeleteमनःपूर्वक आभार!
Deleteअसाच प्रतिसाद देत रहा.. प्रेरणा मिळते🙏