भाषा शिकताना फार लहान वयात कवितेच्या ओळी सोदाहरण स्पष्ट करा, रसग्रहण लिहा, भावार्थ सांगा.. अशा प्रश्नांची ओळख हीच अनेकदा मुलांना कविता, गाणी या साहित्य प्रकारापासून दूर नेतात कदाचित..
परवा गप्पा मारताना असाच विषय झाला, गंधार संभाजी महाराजांच्या एका महाकाव्याविषयी सांगत होता, आणि ते ऐकणारी माझी मैत्रिण पटकन म्हणाली, मला नाही झेपत कविता..
लहानपणी शाळेत कवीला काय म्हणायचे, असे बाईंनी विचारल्यावर मी म्हणाले होते की मी तर कवींना भेटले नाही, मला कसे माहित असेल त्यांना काय म्हणायचे आहे..इति मैत्रिण..
एकीकडे मला तिच्या या सहज प्रतिसादावर मनापासून हसू आले, आणि दुसरीकडे शिक्षक कसे चुकीच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापनाचे प्रश्न प्रकार यामुळे नकळत त्या विषयाची नावड, भीती निर्माण करण्यास कारणीभूत होतो हे जाणवले..
पण सगळेच शिक्षक किंवा त्यांच्या विषय शिकवण्याच्या पद्धती अशा सदोष नसतात हे सांगणारा आजचा अनुभव..
विषय - कविता रसग्रहण... कविता - प्रेम कर भिल्लासारखं
कवी - कुसुमाग्रज ... रसग्रहण शिकविणारे शिक्षक - जोर्वेकर सर
शाळेतून कॉलेज असा प्रवास सुरू झाला, तो पहिला आठवडा..
तास ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स (ओसी)..
शिकविणारे जोर्वेकर सर वर्गात आले आणि म्हणाले की सर्वत्र गुलाबी रंग दिसणाऱ्या तुम्हा सर्वांचे स्वागत, पण या रंगाला, मी एक दिशा देणार आहे..
माझा ओसी विषय मी वर्षभर मनापासून शिकवणार आहेच, पण आज मराठी साहित्यातील एक दैवत, कवी कुसुमाग्रज यांच्या एका प्रेम कवितेची खास मांडणी तुमच्यासाठी करणार आहे.. (अर्थात सर त्यांच्या विषयात तितकेच पारंगत हे वेगळे सांगायला नको)
मग सरांनी सुरुवात केली, कवितेची एकेक ओळ, आवाजाचे अचूक चढउतार करत अशी काही सादर केली, की हे सारं कधी संपूच नये, त्यांनी सांगत राहावे आणि आम्ही ऐकत, असे वाटत होते..
ते कवितेचे फक्त सादरीकरण नव्हते तर, प्रत्येक शब्दातल्या बारीक सारीक अर्थ छटा, त्यांची जीवनात अनुभवायला मिळणारी मार्मिक तरी गमतीशीर उदाहरणे होती..
वयाच्या अतिशय नाजूक टप्प्यावर असणाऱ्या आम्हाला, स्वप्नातून जागं करणारी प्रेम या विषयाची व्यावहारीक पण तरीही तरलता जपणारी ओळख सरांनी त्यादिवशी करून दिली..
पुढे जाऊन खऱ्या अर्थाने प्रेमात पडताना, सरांचे शब्द वेळोवेळी आठवत होते, त्यांनी नाट्यरुपात, गमती करत सांगितलेला अर्थ, भावार्थ.. ते पडणे सुसह्य आणि अधिक जाणिवेने झाले..
या कवितेत कुसुमाग्रजांनी खूप नेमक्या शब्दात, प्रेमाच्या गुलाबी रंगासोबत येणाऱ्या जबाबदारी , कर्तव्ये, बंधने अशा एका ना अनेक व्यावहारीक रंगांच्या साऱ्या छटा एकेका शब्दाने बखुबी गुंफल्या आहेतच, पण सरांनी त्या अधिक जिवंत केल्या..
या घटनेला २७ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला, पण आठवण अगदी आज दुपारी घडल्याप्रमाणे आहे..
कविता सरांच्या संदर्भासहित , नाट्य पद्धतीत आणि सोबत माझ्या प्रेमाचे किस्से ऐकत अनुभवायची असेल तर नक्की सांगा, तशी एक मैफील भरवू या..
आजचा अध्याय समाप्तीला एकच विनंती करेन..
भाषा जितकी सहज, सोपी.. तितकीच खोल, गहिरी असते..
ती अनुभवताना काही चुकीचे अनुभव, चुकीच्या व्यक्ती, प्रश्न प्रकार, परीक्षा असे अडथळे मधे येऊन वाट अडवतील..
पण त्यास त्यांच्या मर्यादा समजून, एका प्रबोधन गीतात म्हणल्याप्रमाणे..
मर्यादांना मर्यादून..? छे ss त्यांना उल्लंघुनी..
पुढे पुढे चालणे असू दे .. हेच ध्येय तव मनी..
हेच ध्येय तव मनी..
स्वतः स्वतःची पद्धत शोधा, वाट बनवा.. पण प्रवास थांबवू नका..
तुम्हाला नवी पद्धत लाभो, नवे उत्तम शिक्षक, मित्र मिळोत आणि..
भाषाभ्यासाचा ध्यास लागो, हीच सदिच्छा..!
छान लिहिले आहे!
ReplyDeleteखरंच आहे कवितेखालेचे प्रश्न मूळची कवितेची गम्मत घालवून बसतात.🙁
ReplyDeleteपरवाच सासूबाईशी या बाबतीत बोलत होते. त्यांचे जेष्ठ मैत्रीण मंडळ रोज खाली बागेत बसून छान लेख , कविता एकमेकांना वाचून दाखवतात.
त्या परवा तेच सांगत होत्या 'आठवणीतल्या कविता' पुस्तक कोणीसे आणले आणि म्हणता म्हणता त्यांच्या लहानपणच्या सगळ्या कवितांची त्यांची उजळणी झाली
आणि आश्र्चर्य म्हणजे बहुतांश सर्वाना त्या पाठ होत्या ...😇
पण आपल्या लहानपणच्या कविता काही अपवाद वगळता काही आठवत नाहीत कारण कदाचित हेच असेल "कवीला यातून काय म्हणायचे आहे ?" या मुळे किंव्हा "कवीला असे का बरे वाटले असेल ?" असल्या प्रश्नामुळे...
काव्यार्थ थोडा उलगडताना ठोक उत्तरांपलीकडे ते वाचून आपल्याला काय बरे वाटले असे कोणी विचारले असते तर कदाचित कविता अलवार मनात प्रवेशती झाली असती ... न जाणो आहे त्या कवितेला विनोदी चाल लावण्यापलीकडे एखादी नवीच कविता सुरेल लकेर घेत जन्मली असती..😊
म्हणून वाटतं व्याकरण , नियम ठेवा कि मार्कांसाठी ...
भाषा विषयामागे नकोच मार्कांचा ससेमिरा ... त्या त्या वयाला साजेश्या कविता, लेख असे पुस्तक करून .. करा रसग्रहण असेही चालेल की ..
आणि आताच्या कविता , लेख म्हणजे मनाचे रंजन बाजूलाच .. उपदेश डोस कसा मुलांना देता येईल अश्याच सगळ्या ..
एकदा युगंधर कंटाळून म्हणाला ,"काय ग , हे कवी लिहितात का कधी धड्याखालची उत्तरे ... एकदा लिहावं लागलं असतं ना मग कळलं असतं .."
बघ कुठे भरकटले ....
खूप छान लिहिला आहेस लेख ...💜 आणि तुझ्या सरांचे रसग्रहण आणि तुझ्या प्रेमाचे किस्से नक्की मैफिल करू 👍
एक भाषा अध्यापिका आणि तेही संस्कृत... अशा वेळी खरोखर प्रश्नच या भाषेला अवघड बनवतात... साहित्याचा मन मुराद आनंद घेण्यासाठी खरोखर जजोर्वेकर सरांचा आदर्श ठेवणे आवश्यक आहे... नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण पण तरीही तरल लेखन👌🏻
ReplyDelete