देव असतो का..? कुठे असतो..? कसा दिसतो..? अमूर्त की मूर्त..? मूर्त असेल तर, त्यातल्या कोणत्या मूर्त स्वरूपाची भक्ती करायची.. ? का करायची..? कशी, कधी करायची..?
असे कोणतेही प्रश्न ना कधी पडले, ना यापुढे पडतील..!
चराचरातील चल वा अचल, प्रत्येक बाब ही एका शक्तीची निर्मिती आहे..
आणि आपल्या निर्मितीचा सांभाळ, प्रगती या साऱ्याची जबाबदारी ती शक्ती प्रेमाने करते, ही भावनाच किती सुंदर आहे ना..!
अशा शक्तीकडे आपली सुख-दुःख, यश-अपयश ही सारी ओझी सोपवली की आपण किती निश्चिंत होऊ शकतो, हा कुणी सांगण्याचा नाही, तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे..
या अनुभवांना अनुभूती म्हणतात..
अमूर्त, अज्ञात शक्तीचे खऱ्या स्वरूपाचे दर्शन व्हावे, जसे श्रीकृष्णाने यशोदा मातेला, अर्जुनाला दिले..
गुरु रामकृष्ण परमहंसांचे मार्गदर्शन नि स्वतः पराकोटीची ध्यान धारणा केल्याने स्वामी विवेकानंदांनी अनुभवले..
तसे आपल्या सारख्या अति सामान्य मानवास होणे, केवळ अशक्यच..
पण जर आपण वेद, उपनिषद, भगवद्गीता यात सांगितल्याप्रमाणे सत्कर्म, सद्वर्तन, सहृदयता या मार्गाने चाललो, तर त्याचे फळ म्हणून शक्तीची प्रचिती नक्की मिळते, हा स्वानुभव आहे..
कधीही न सुटू शकणाऱ्या समस्या सहज संपतात..
कठीण परिस्थितीत तन, मन, धन सर्व प्रकारे सहाय्य लाभते..
मग विषय पुन्हा मूळ पदावर.. की ही शक्ती कोणत्या मूर्त रूपात बघायची, पुजायची..
अंदाजे सहस्र कोटी संख्या, सोबत काळानुकाळ सांगूनही संपणार नाहीत अशा रंजक कथा यांनी समृद्ध असलेल्या आपल्या आर्य जन्मभूमीच्या संस्कृतीत खूप सारी भव्य, दिव्य सगुण, मोहून टाकणारी मूर्त रूपे आहे..
तुम्ही त्यातल्या कोणत्याही एक वा प्रसंगानुरूप अनेकांची निवड करू शकता..
त्याने काहीच फरक पडत नाही, कारण निस्वार्थ प्रेम, भक्ती, साधना इतकीच अपेक्षा असणारी ही मातृ पितृ स्वरूप शक्ती, तुम्ही निवडलेल्या प्रत्येक मूर्त स्वरूपात वास करते..
फक्त तुमची भक्ती निस्वार्थ आणि हाक आर्त असायला हवी..
आधी म्हटल्याप्रमाणे, शक्ती आहे, नि तिच्या अस्तित्वाची प्रचिती वेळोवेळी अनुभवली आहे..
त्यामुळे प्रसंगानुरूप ती शक्ती विविध रुपात बघायला आवडते..
एकादशीला विठोबा संगती संत मंडळी, महाशिवरात्रीला शंकर, गोकुळाष्टमीला बाळकृष्ण, गणेशोत्सवात लाडका बाप्पा, नवरात्रीत रोज नव्या रूपातली देवी, कुळाचार करताना कुलदैवत इथपासून ते अनारोग्य रोखणारी वेशीवरची मरीआई ही देखील प्रेमाची आहे..
पण..
जेंव्हा सण नाही, उत्सव नाही, रोजमितीला ज्यांचा नामजप नेहमी आनंद, मनःशांती देतो, समस्या निराकरण करण्यासाठी लढण्याचे बळ देतो, यशात पाय जमिनीवर ठेवण्याची बुद्धी देतो, सुख द्विगुणित करतो, थोडक्यात सांगायचे तर..
किती वर्णू सांग माझ्या, दैवताचे गोडवे..
नाम स्मरता नुसते, बळ हत्तींचे संचारे..
ते दैवत, गुरुपद म्हणजे, शेगाव निवासी श्री गजानन महाराज.. 🙏🏻🙏🏻
आता ओघाने येणारा प्रश्न, ही निवड केली कशी, कधी, कोणी..?
त्याला मिळणारे पटकन उत्तर..
पूर्वसंचित..
लहानपणी आईबाबांसोबत वर्षातून एकदा शेगाव वारी असायची, तेंव्हापासून त्या परिसरातील उर्जा, शांतता, स्वस्थता अनुभवली आहे..
अनेक वेळा तोबा गर्दी असूनही काही तासच दर्शनासाठी लागत, त्यावेळी तिथे असणाऱ्या जमावाला ना घाई असायची, ना त्रस्तता, अखंड नामजप करत, वेळ अगदी सहज निघून जायचा, लहान वयात त्या रांगेत बागडायला मजा यायची..
सिंधू आजी म्हणजे बाबांची आई तिच्याबरोबर घराजवळ असल्या महाराजांच्या मंदिरात अनेकदा सकाळ, संध्याकाळ आरतीसाठी जायचे, तो अनुभव तर अजूनच वेगळा, टाळ वाजवणारे ते चिमुकले हात, त्या नादमय वातावरणात रंगून मनसोक्त नाचणाऱ्या त्या बालपणीची आठवण आजही खूप आनंद, ताकद देते..
अशाप्रकारे लहान वयात या गुरूची, दैवताची तोंड ओळख झाली..
मंदिरात जाणे, जप करणे याचे आधी फक्त अनुकरण केले, त्याचे सवयीत रूपांतर कधी झाले कळले देखील नाही..
शेगाव आणि घराजवळील मंदिर या दोन्ही ठिकाणी नियमित जाणे होते, आहे आणि राहील, तिथल्या अनेक आठवणी, घटना या आजवरच्या प्रवासाला नवीन वाट, यश, आधार देणाऱ्या आहेत..
तिथले महाराजांचे (अमूर्त शक्तीचे) वास्तव्य नक्की अनुभवास येते, फक्त तशी हाक हृदयातून आली पाहिजे..
या पलिकडे जाऊन इतर शहरात जिथे गजानन महाराजांची मंदिरे आहेत, जसे की चिंचवड, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर इ. त्या सर्व वास्तू देखील, अस्वस्थ मनाला स्वस्थ करणाऱ्या, अशांत जीवाला शांतता देणाऱ्या, थकलेल्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत..
याचे कारण समान व्यवस्थापन व्यवस्था, महाराजांची सर्व भक्त मंडळी एका वेगळ्या नियोजनाने एकमेकांशी जोडलेली आहेत..
नव्याने कुठेही मंदीर स्थापन झाले की त्यांना या व्यवस्थेचा भाग व्हावे लागते, समान नियमावली, पद्धती राबवावी लागते..
ज्यात दर्शन वा इतर कोणत्याही बाबतीत आर्थिक गणिते (दर्शन पास ) कोणालाही प्राधान्य देत नाहीत..
प्रत्येक भक्ताचा संत परंपरेनुसार आदर करणे, सूचना देताना प्रथम माऊली ही हाक देणे, नियमांचे पालन करण्यासाठी प्रेमाने सुचवणे अशा एक ना अनेक गोष्टी आहेत..
असे वाटेल की लहान मंदिरांच्या जागी हे करणे सोपे असेल, तर हा अनुभव एकदा शेगावी जाऊन नक्की घ्या..
आजच्या आंतरजाल युगात यां विषयीची माहिती गुगलवर जरूर बघा..
फक्त भारतीयच नाही तर अनेक परदेशी व्यवस्थापन शिकविणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांना उत्तम व्यवस्थापन कसे असते, कोणताही आर्थिक मोबदला मिळत नसून, सेवा करण्याची इच्छा, व्रत, नवस यासाठी महाराजांची भक्त मंडळी अनेक कामे सुनियोजित, विना सक्ती, ना सूचना, ना दुराग्रह तरीही मनापासून शांतता, स्वस्थता, आदर भावनेने करत असतात..
मंदीर परिसरात रांगेत जा उगाच गर्दी करू नका, भोजनगृहात पोटभर खा पण टाकू नका, स्वच्छता राखा, तेथील अन्न वाढप, त्यानंतर उष्टी ताटे आवरून त्यांची स्वच्छता, शिवाय भक्त निवास व्यवस्था.. किती आणि काय काय कामे चालू असतात पण कुठेही आरडाओरडा नाही, की गोंधळ नाही..
देणगी स्वीकारण्याची पण वेगळीच पद्धती, त्यातही सहजता, शिस्त..
जमा झालेल्या अर्थाचा विविध सामाजिक कामांसाठी वापर..
अजूनही अनेक गोष्टी सांगता येतील, पण त्यापेक्षा त्याचा अनुभव घ्यावा हेच अधिक योग्य वाटते..
चांगले विचार, उन्नतीची दिशा, भक्ती मार्ग दाखविण्यासाठी अमूर्त शक्ती गजानन महाराजांच्या रूपात शेगावात माघ वद्य सप्तमी शके १८०० मध्ये प्रकट झाली..
आज ती तिथी म्हणजेच प्रकट दिन..
तर सांगायचा मुद्दा असा की माझ्यासारखी अति सामान्य व्यक्ती, मानवी जन्म अनुभवताना, माझा मीपणा संपून जावा, नि विश्वाचा पसारा वाहणाऱ्या शक्तीने मला आपलेसे करावे..
या माझ्या मानवी देहाद्वारे सदैव सत्कर्म होण्याचे दान पदरी टाकावे यासाठी ज्यांना गुरुस्थान दिले, त्या गजानन महाराजांच्या चरणी आजची लेखनसेवा..
मी आणि माझे कुटुंब यांच्यावर जशी महाराजांची सदैव कृपा होते, तशीच तुम्हावरही होवो हीच सदिच्छा..
जय गजानन..🙏🏻
Jay Gajanan maharaj 🙏..
ReplyDeleteजय गजानन
ReplyDeleteअप्रतिम लेखन...किती सहज आणि सुंदर
ReplyDelete