कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
थोडक्यात फलेच्छा, आसक्ती सोडून कर्म करायचे आहे.
हे अनेकदा वाचले होते, ऐकले होते, तरी मला वाटते की,
या श्लोकात, शब्दात न दिसणारा एक अर्थ अजून दडला आहे...
तू कर्म करत राहा, त्याचे फळ तुला मिळत राहील...
उत्तम कर्माचे, उत्तम फळ आहे हे निश्चित, पण
ते कधी आणि कसे मिळेल याची चिंता नको
आणि त्यासाठी थांबणे ही नको
असाच काहीसा अनुभव प्रत्यक्ष घेतला आणि लिहिण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही...
झाले असे...,
२०१९ मध्ये झेप संस्था, त्या संस्थेत काम करणारी माझी गोड सखी कांचन,
आणि अतिशय हसर -प्रभावी संस्थेचे नेतृत्व असणाऱ्या नेत्राताई आणि तिथली बच्चेकंपनी यांच्याशी एक वेगळेच ऋणानुबंध तयार झाले आहेत...
करोना वर्षात प्रत्यक्ष मुलांसोबत एकदाच वेळ देता आला,
पण कांचन, नेत्राताई, इतर शिक्षक यांच्याशी संपर्क होता...
ऑनलाइन शिक्षणाला सहाय्यभूत असणारे व्हिडीओ, पीडिफ इ. दोघींना पाठवणे वर्षभर चालू आहे...
काही दिवसांपूर्वी दोघींकडून, मुलांचे दहा दिवसांचे
एक तास ऑनलाइन उन्हाळी शिबीर घेऊ या का...?
तू येशील का असे विचारले गेले आणि जणू एक वेगळाच उत्साह अंगात संचारला...
हो तर म्हणले, पण बाकी कामात थोडसं विसरूनही गेले...
१७ मे २०२१ सोमवार पासून सुरु होणाऱ्या या शिबिरासाठी,
रविवारी सकाळपर्यंत माझी काहीच तयारी नव्हती...
आणि तुम्ही लक्ष घालू नका... मी सगळं ठरवते,
असे सांगितल्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काही नियोजन केले गेले नव्हते...
रविवारी दुपारी कांचनने पाठवलेल्या मेसेजने एकदम जाग आली...
आणि मग दहा दिवसासाठी काय-काय करु शकतो..
याचा विचार करत, अनेकांना फोन करणे सुरु झाले...
या सगळ्यात माझ्यासोबत मुलांना वेळ देण्यासाठी,
कोणीच नाही म्हणले नाही, पण निश्चित दिवस ठरले नव्हते...
उद्या पर्यंत सांगतो, यावर साधारण रात्री आठ वाजेपर्यंत काम थांबले...
मग रात्री बाकी काम, जेवण वगैरे आटोपल्यावर,
मी माझे ढोबळ नियोजन केले...
ज्यांना कुठलाही दिवस चालणार होता, त्यांना सुरुवातीला घेतले...
दुसर्या दिवशी सकाळपासून या मजा मस्ती शिबिराची सुरुवात, मी करणार असल्यामुळे,
चित्रसहल असा वेगळा अनुभव.. मुलांना देण्यासाठी काम करायला बसले..
अर्धे काम पूर्ण झाले असताना, अचानक आलेल्या परिस्थितीमुळे काम बाजूला ठेवून उठावे लागले...
माझ्या अहोंना काहीसा मोठा म्हणावा असा अपघात झाला होता...
दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन करावे लागणार होते...
आता मला किमान १७ तारखेला तरी मुलांसोबत वेळ देता येणार नाही हे नक्की होते...
पण या कामामुळेच कदाचित अपघात मोठा असूनही, पायाच्या मारावर निभावल होत...
अनेकांच्या सदिच्छा, आशीर्वाद, गजानन महाराजांची कृपादृष्टी आणि या माझ्या बालदोस्तांचे प्रेम याच्या संरक्षक कवचाने प्रसंग सांभाळला होता...अहो आता छान आहेत लवकरच यातून पूर्ण बरेही होतील...
त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून काहीतरी सोय करुन उपक्रम घ्यायचा हे मनाशी पक्क केलं...
ही बुद्धी, इच्छा लहानपणापासून आईबाबांना घर-नोकरी आणि समाज ऋण,
यात समतोल सांभाळताना बघून झाली होती...
तसे कांचनला कळवले... तीनेही अजिबात काळजी करू नको...
आम्ही घेऊ उद्या आणि नंतरही काहीतरी छानसं, तू दादाकडे लक्ष दे..
अशी समयसूचकता दाखवली आणि तसे उत्तम नियोजनही केले...
पण त्यानंतर अशा एकेक गोष्टी घडत गेल्या..
घरातल्यांनी म्हणजेच माझी ताई, दिर, सासूबाई, आईबाबा सगळ्यांनीच भक्कम साथ दिल्यामुळे..
पहिल्या दिवशीही मी अकरा वाजता असणाऱ्या त्या सेशनला जॉईन होऊ शकले...
त्यांच्या नियोजनासोबतच मी ठरवलेली चित्र सहल घेतली...
काही किरकोळ त्रुटी वगळता, तो दिवस मुलांनी आणि मीही छान अनुभवला...
त्याचवेळी चालू असलेले, अहोंचे ऑपरेशनही उत्तम झाले...
दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी जाणवलेले प्रश्न, त्रुटी दूर करत मुलांना पपेटच्या साहाय्याने स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी गोष्ट आणि एक शाळेची गंमत जम्मत सांगणारे गाणे घेतले...
बघता बघता दोन दिवस कुठे पळाले कळलेही नाही...
पण, मुलांसोबतच्या या एक तासाच्याआनंदाने मला जे बळ दिले...
त्याचे शब्दात वर्णन होऊच शकणार नाही...
अजून आठ दिवस बाकी आहेत पण त्याच्या स्वतंत्र गोष्टी घेऊन भेटेन...
हा आनंदी उपक्रम असेल किंवा अचानक आलेली परिस्थिती असेल दोन्हीमध्ये...
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर... 👧🏻
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..! ❣️
असा अनुभव माझ्या परीस पोतडीत साठवला गेला हे नक्की...
जेंव्हा जेंव्हा या पोतडीची गाठ सोडेल, आणि या आठवणींचा स्पर्श होईल..
तेंव्हा तेंव्हा माझ्यातल्या लोहाचे नकळत सुवर्ण होत राहील हे नक्की...
असे सगळे अनुभव, उपक्रम, प्रयोग
ही माझी एक ताकद, प्रेरणा, विरंगुळा, आणि संरक्षक कवच आहे...
असे आता राहून राहून वाटायला लागले आहे, हे नक्की...!
हेच अनुभव येत राहोत हीच सदिच्छा..!




