Showing posts with label लेखनप्रवास. Show all posts
Showing posts with label लेखनप्रवास. Show all posts

Wednesday, May 12, 2021

लेखनप्रवास

कालानुरुप गोष्टींचे नकळत लेखन घडले ....


 

दिव्यांग मुलांसाठी मनापासून काम करणाऱ्या, पिंपरी येथील झेप संस्थेच्या प्रमुख नेत्राताई यांनी सहज एक प्रश्न विचारला.. 

आणि नकळत माझ्या लेखनाला झालेली सुरुवात, नंतर पुढे त्याचा बदलत गेलेला प्रवास, अगदी सहज शब्दात उतरत गेला.. 

माझ्या गोष्टींना मनापासून प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांना, त्याविषयी सांगण्याचा मोह आवरता आला नाही..
 
माझ्या अनुभवांच्या पोतडीत त्याचा समावेश करुन आणले तुमच्या भेटीला..


तर मला लिहायला लावणाऱ्या, दोन मोठ्या घटना आहेत..

पहिली म्हणजे, लग्नानंतर आम्ही दोन वर्षे लोणावळ्याला रहात होतो, तिकडे पहिला सण आला, तो म्हणजे दीपपूजन..

आमच्या शेजारी पुंडे म्हणून, एक पुजारी काका होते..

मी त्यांना विचारलं," काका, काय करायाचे आज..?"

तेंव्हा ते म्हणाले," वीज बचत, ट्यूब, पंखे पुसून घे.."

ज्यांचा मुख्य व्यवसायच पूजाआर्चा होता.. 

त्यांनी जेंव्हा आजच्या काळाला अनुसरून काय करायला हवे हे सुचवले, तेंव्हा सर्वात आधी सणांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे बीज माझ्या मनात पेरले गेले..

आणि दुसरी घटना म्हणजे, माझा मुलगा गंधार, बालवर्गात असताना, दहीहंडीच्या निमित्ताने त्यांच्या वर्गाचे 'कृष्णजन्म' नाटक सादर होणार होते.. 

त्यावेळी मीही त्याच शाळेत, त्याच विभागात, वेगळ्या गटाची शिक्षिका म्हणून काम करत होते..

नाटकात माझ्या लेकाला कंस व्हावेसे वाटत होते आणि असे का विचारल्यावर त्याचे बाळबोध उत्तर मिळाले, देवकीचे बाळ मारताना, बाहुली फेकायला मज्जा येते.

माझा स्वतःचा जन्म तिथीने दहीहंडीचा असल्याने कृष्णजन्म असतो गोकुळाष्टमी आणि दहीहंडी असते, दुसऱ्या दिवशी नवमीला..

हे दोन्ही वेगवेगळे असतात हे पक्के माहीत असल्याने, मी आमच्या विभाग प्रमुख शारदाताई चोरडिया यांच्याकडे गेले..

आपण ही कृष्णजन्माची गोष्ट मुलांना का सांगतो, तेही दहीहंडीला, हे दोन्ही वेगवेगळ्या दिवशी असते,  गोष्ट दहीहंडीची हवी, असे म्हणणे त्यांच्यापुढे मांडले.

शारदाताईंनी शांतपणे आणि मनापासून ते स्वीकारले आणि म्हणल्या," तू म्हणतेस ते नक्कीच बरोबर आहे. पण मग तू सांग दहीहंडीची गोष्ट, त्यावर नाटक लिहून दे.."

बडबड करणं सोपं असते, पण एकदम कुणी असं काम सांगितले की मग थोडं गडबडायला होत. सुरुवातीला मलाही झालं, पण नंतर ते एक आव्हान वाटले.

लगेच ठरवले.. मिळवूया दहीहंडीची गोष्ट..

चातुर्मासाचे पुस्तक, इतर वेगवेगळी पुस्तक चाळली..

आजी लोकांना विचारुन बघितले, पण गोष्ट काही हाती लागेना.. 

दोन वर्षे लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे एखादी गोष्ट, काही संदर्भांनी कशी तयार होते, हे नक्कीच समजले होते.. 

मुलांनी जे करणे अपेक्षित असते, सरळ सरळ हे करा, हे बरोबर असे न सांगता प्राणी, पक्षी यांच्यामार्फत गोष्टीतून सांगितल्यावर जास्त लवकर समजते, मुख्य म्हणजे पटते हाही अनुभव होता.

मग दहीहंडीच्या वेगवेगळ्या संदर्भांचा अभ्यास केला..

हंडीमध्ये ठेवायला वेगवेगळे पदार्थ एकत्र करुन काला बनवतात, त्यात असलेले पदार्थ,त्यामागचे विशिष्ट अर्थ, कृष्ण-गोपालांची मैत्री, लोणी चोरी मागची कारणे, हंडी फोडताना केली जाणारी रचना असे वेगवेगळे संदर्भ जोडत दहीहंडीची गोष्ट तयार केली आणि ती घेऊन पुन्हा शारदाताईंकडे गेले..

त्यांनी गोष्टीचे मनापासून स्वागत केले..

प्रबोधिनी म्हणजे सनातनातील सनातन आणि आधुनिकातील आधुनिक हे मी तेंव्हा प्रत्यक्ष अनुभवले..

हे सगळं व्हायला बरेच दिवस लागल्याने, त्यावर्षी कृष्ण जन्माच्या नाटका सोबत माझी गोष्ट कार्यक्रमात सांगितली गेली.. 

पण त्यानंतर मात्र ही आणि कृष्णाच्या इतर गोष्टी दहीहंडीच्या निमित्ताने आम्ही मुलांना सांगायचो..

एक-दोन वर्षे यावर नाटक लिहून त्याचेही उत्तम सादरीकरणही झाले..

त्यातूनच अजून नवे काय असे, करत पुस्तकहंडी, आहारहंडी, आरोग्यहंडी असेही वेगवेगळे उपक्रम व त्यासाठी गोष्टींचे लेखन गेले..

तेंव्हापासून नंतर जे सण शाळेत मुलांसोबत साजरे करतो, ते त्यांच्या वयोगटानुसार गोष्टीत मांडायचे, लिहायचे जणू वेडंच लागले..

त्यात लहान मुले दृक्-श्राव्य (ऑडीओ-व्हिडीओ) माध्यमातून लवकर शिकतात हे पक्के माहिती होते..
 
त्यामुळे मला गोष्ट सांगताना अनुरुप चित्र हवी असायची..

मग त्यासाठी खटपट करत गुगलवरील चित्रांच्या खजिन्यातून आणि पी पी टी च्या मदतीने माझे म्हणणे, मुलांना अधिक चांगले समजण्यासाठी चित्र बनवायचे..

सुरुवातीला काही वर्षे हे सगळे मी, शाळा आणि मुले यांच्यात मर्यादित होते..

पण म्हणतात ना, लहान मुलांसारखे उत्तम प्रतिसादी कोणीच नसते.. 

त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली, तर अगदी सरळ सरळ सांगून मोकळे होतात आणि आवडणाऱ्या गोष्टींसाठी तितकाच हट्ट ही करतात..

शाळेत ऐकलेली गोष्ट, त्यांना परत घरीही ऐकायची असायची. मग पालकांची मागणी, ताई तुमच्या गोष्टी आम्हाला सांगा.. 

सुरुवातीला  हाताने लिहून झेरॉक्स, मग छान टाईप करुन, पुढे कागद कशाला वाया घालावायाचा, म्हणून व्हाट्स अँप असा प्रवास चालू होता..

तेंव्हा मग माझ्या बी.एडच्या शिक्षिका शितोळे मॅडम, खूप मागे लागल्या त्यातून ब्लॉग सुरु झाला..
 
त्यांचे म्हणणे असते की, मी फार काहीच  केले नाही, फक्त घोड्याला पाण्यापर्यंत नेले..

"पण घोड्याला पाणी दाखवले नाही तर, त्याला पाणी मिळणारच नाही, हेही तितकेच खरे आहे.. 

मग माझे लेखन ब्लॉगच्या माध्यमातून देश विदेशात अनेकांपर्यत जाऊ लागले..

माझी लाडकी मैत्रिण मेधा लाड, हीने तो ब्लॉग अधिक नेटका आणि सुस्वरूप बनवला, अगं कशाला विचारले तर म्हणाली आम्हाला हव्या त्या गोष्टी लगेच सापडायला हव्या म्हणून..

२०२० मार्चपासून वाढलेल्या ऑनलाईन सिस्टीमने मला अजून नवी, आधुनिक आणि देखणी माध्यमे माहित करुन दिली..

तंत्रज्ञानामुळे अजून अनेक नवी दालने खुली झाली..

यातून मुलांसाठी अजून खूप खूप काही करत रहावेसे वाटते आणि करणार आहे हे नक्की..

थोडक्यात सांगायचे, तर मी ठरवून काहीच ना लिहीते, ना काही करते..  

विविध विषय, गोष्टी  (मनातले, अनुभवातले, स्वप्नातले सारे काही) शब्दात अगदी नकळत उतरत जाते..

आणि तुम्हा रसिक वाचकांमुळे, लिहिते रहाण्याची ऊर्जा मिळत रहाते..

*********************************