चिंगी तुमच्यासारखी छोटी मुलगी. गोड, चुणचुणीत, हुशार पण थोडीशी आळशी. कोणतेही काम वेळेवर करण्याची आवडच नव्हती. त्यात तिला सारखा टीव्ही बघायला नाहीतर कॉम्प्युटर, मोबाईलवर गेम खेळायची सवय होती. खेळून झालं की सगळं तसंच चालू ठेवून दुसर काहीतरी करायचं. खाऊ घेणासाठी फ्रीज उघडला की बंदच करायचा नाही, सगळ्या खोल्यांमध्ये दिवे, पंखा चालूच..
आईबाबा तिला समजवून सांगायचे असं करु नये. दिवे, पंखा, टीव्ही नको असेल तेव्हा बंद करावे, खाऊ घेऊन झाला की फ्रीजचे दार लावून टाकावे या सगळ्यासाठी लागणारी वीज बनवायला खूप त्रास होतो, खूप पाणी लागत त्यामुळे सगळं जपून वापरावं, चिंगी हो तर म्हणायची पण वागण्यात जरा ही बदल नाही.
वीजदेवी हे सगळं बघत होती. देवीने ठरवले, चिंगीला लक्षात राहील असं काहीतरी करावं आणि काय झालं माहितीये?
एका संध्याकाळी चिंगी घरात एकटीच होती. आईबाबा भाजी आणायला गेले होते.
नेहमीप्रमाणे टीव्ही, कॉम्प्युटर चालू होते. सगळ्या खोल्यांमध्ये दिवे पंखा पण चालूच आणि चिंगी खेळत बसली होती.
अचानक सगळीकडे अंधार झाला.
चिंगीला खूप भिती वाटू लागली. जरा वेळाने रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश आल्यामुळे थोडं दिसू लागलं. रडत रडत चिंगी गॅलरीत आली तर बाकी सगळ्या घरात दिवे होते फक्त चिंगीच्या घरात अंधार असं कसं झालं असा ती विचार करत होती.
इतक्यात तिला आवाज आला, "आता तुझ्या घरात असाच अंधार राहणार. मी तुझ्यावर रागवले आहे."
"कोण...कोण आहे ?" घाबरत चिंगीने विचारले.
"मी वीजदेवी."
"पण देवी तू का रागावली आहेस? मी काय केलं?"
"काय केलं काय विचारते? तू वीज नीट वापरत नाहीस, दिवे, पंखा, टीव्ही, फ्रीज,मोबाईल, कॉम्प्युटर काम झालं की बंद करत नाहीस. त्यामुळे किती वीज वाया जाते. तिकडे गावाकडे अजून खूप ठिकाणी खूप खूप वेळ वीज नसते आणि तू मात्र अशी वाया घालवते. आईबाबा सांगतात ते पण लक्षात ठेवत नाही. नुसतं हो म्हणायचं आणि करायच मात्र नाही, म्हणून मी रागावले आहे. आता मी तुझ्या घरात राहणार नाही. फक्त तुला हे सांगायला थांबले होते आता मी चालले आणि परत येणार पण नाही."
"देवी थांब ना गं, मी कान धरुन माफी मागते. वचन देते की यापुढे असं होणार नाही. मी वीज जपून वापरणार. उगाच वाया घालवणार नाही", हात जोडून चिंगीने देवीला विनवणी केली.
यापुढे नीट वागली नाही, वीज वाया घालवायली तर मात्र न सांगता जाणार असं चिंगीला सांगून देवी अदृश्य झाली.
पण तेव्हापासून चिंगी शहाणी झाली. वीज वाया घालवत नाही, गरज नसताना दिवा, पंखा लावत नाही. उगाच टीव्ही, कॉम्प्युटर वापरत नाही.
काय मुलांनो तुम्हीपण लक्षात ठेवणार ना?
नाहीतर वीजदेवी तुमच्यावर रागावून घरातून जाईल बरं का.
वीज तर वाया घालवायची नाहीच पण तिची काळजी पण घ्यायला हवी. दिवे,पंखे स्वच्छ ठेवायचे. वेळेवर बंद करायचे आणि हे सगळे आपल्याला मदत करतात म्हणून हात जोडून त्यांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं,
दिव्या दिव्या दिपत्कार,
कानी कुंडले मोतीहर,
दिव्याला पाहून नमस्कार ||
राहील ना पक्क लक्षात !
<<<<<<<<>>>>>>>>>
ही गोष्ट बघण्यासाठी...





छान आहे गोष्ट . लहान मुलांना आवडेल आणि ते निश्चितच यातून कसे वागावे हे शिकतील.
ReplyDeleteमनापासून आभार 🌹
ReplyDeleteमुलांची मानसिकता समजून घेऊन गोष्टीची मांडणी छान👍👌
ReplyDeleteउत्तम 👍👍
ReplyDeleteखूप छान आहेत दोन्ही गोष्टी. मी सायली ला पा पठवल्या अंतरा साठी.
ReplyDeleteखुप सुंदर आहे गोष्ट .👍
ReplyDeleteखूप सहज सांगितलेला मोठ्ठा विचार .मस्त कथा
ReplyDelete