Saturday, May 09, 2020

अडते वय

गंमत अडत्या वयाची ... !


मास्टर जिनियस आता मोठा होत आहे. वयाचा अवघड टप्पा सध्या तो अनुभवत आहे. ना कुमार... ना किशोर... अशी ही आड वळणाची वाट चालताना मन असंख्य प्रश्नांनी भरुन येते. शरीर अजूनच वेगळ्या खुणा दाखवत राहते. हे सगळे विचारावे, सांगावे तरी कुणाला ?.... विचार, भावनांचे नुसते काहूर उठते.

जिनियसचीच आई ती, लेकाची व्दिधा मनस्थिती अचूक ओळखते आणि ठरवते आपण याच्याशी बोलायला हवे. पाणी थांबले की त्यावर शेवाळे साठायला लागते. जे चांगले नाही, पाणी वाहते ठेवायला हवे. 

एक दिवस ती सहजच फिरायला जायचे ठरवते. तो जाताना विचारतो, आपण कुठे चाललो आहे. ती म्हणते, सहज फिरायला. दोघे एका फास्टफूड शॉपवर पोहचतात. तीने फिंगरचिप्सची ऑर्डर दिल्यावर साहेबांना  आश्चर्य !... आज हीला झाले तरी काय?

मग दोघे निवांत समोरासमोर बसतात. ती हळूच सुरुवात करते..

"मग काय म्हणते आहे शाळा..., अभ्यास..., मित्र.....?"

"एकदम ओके त टोके! ... पण तू बरी आहेस ना?  का बरे आज हे प्रश्न ? इथे येण्याचे कारण ?"

"कारण खरतर काहीच नाही. म्हटलं जरा गप्पा माराव्या लेकाशी. मोठा होतोय ना तो... माझ्या उंचीला आला. म्हणून... अगदी सहजच."

"हम्म्म्म....."

"चालेल ना? आवडेल ना ? की आता फक्त मित्रच हवे?"

"मी असं काही म्हणालो का ? " (काहीसे रागातच...ती मात्र हळुवारपणे )

"तुला माहितीये, मला तुझ्याशी बोलायला... सगळ काही सांगायला खूप आवडते. तू खूप लहान असल्यापासून आपण येतो असे अधून मधून फिरायला."

"हो... मलाही आवडते. मी तर रोज तुला सगळ सांगतोच की..."

"मी कुठे नाही म्हणते, तरी आज जरा बोलावेसे वाटले म्हणून आलो रे. तुला माहितीये आता तू वयाच्या, वाढीच्या एका अवघड टप्प्यावर आहेस. खूप बदल होतात या दिवसात.

हो... मला माहिती आहे. मी वाचले आहे पुस्तकांमधून. आवाज फुटतो, दाढी-मिशा येतात, नको तिथे केस येतात..."

"हम्म्म... हे शारीरिक बदल तर होतातच पण खूप प्रश्न पडतात. वेगवेगळे विचार येतात. तुला होत असं काही?"

"याविषयी आमच्या ताई आमच्याशी बोलल्या आहेत. त्यावर काय करायचे हेही सांगितले आहे. म्हणजे खूप राग येतो, चिडचिड होते, भांडावेसे वाटते, कधीतरी खूप भिती वाटते.... तेंव्हा काय करायचे हे आम्हाला छान सांगितले. काही गमतीशीर खेळही घेतले." 

"व्वा! ...  हे तर अजूनच छान. तरीही कधी खूप राग आला... सगळ्याचा कंटाळा आला, अगदी कुठेतरी लांब जावेसे वाटले ना तर माझ्याशी.. बाबाशी बोलायचे. एकदम काहीही करायचे नाही."

"हो माहिती आहे मला. नाहीच करत मी असं काही. सगळचं तर सांगतो ना."

"हो. तरीपण पुन्हा आठवण करुन दिली. अजून काही विचारावेसे वाटते का रे ? पडतात प्रश्न ?" 

"हो...मलाही खूप प्रश्न पडतात पण तिथे तुझा काही उपयोग नाही. (ती जराशी घाबरलीच..)"

"का रे ? तू मला काहीही विचारु शकतो."

"पण मला जास्त करुन इतिहासाचे प्रश्न पडतात आणि तुला तर त्यात विशेष आवडच नाही." (तो मिश्किल हसला.)

"हो का ! बरं... ते विचार तुमच्या ताईंना. ते सोडून काहीच प्रश्न नाही पडत? कशाचेच आकर्षण नाही वाटत?"




"तुला नेमके काय विचारायचे आहे ? सरळ सरळ विचार ना?"

"म्हणजे ना दारु, सिगरेट? ..."

"हे बघ मला या सगळ्याबद्दल माहिती आहे. यामुळे होणारा त्रासही माहिती आहे. मला यातले काही करायचेच नाही ना. मला खूप वाचायला आवडते.... फिरायला आवडते आणि मी ते करत असतो. तुला-बाबाला सांगतही असतो." 

"हो... रे पण रोज पेपरमध्ये काही ना काही वाचायला मिळाले ना की काळजी वाटते."

"नको ना करु काळजी. मी आहे का तसा?" (त्याने काहीशा दुखऱ्या आवाजात विचारले.)

" तू मुळीच तसा नाही, पण मोकळेपणाने सांगावेसे वाटले रे... अजून एक सांगायचे होते, सांगू....?

"अजून आहेच का? सांग ...."

"बघ हं...जसे तुम्हा मुलांमध्ये बदल होतात ना, तसेच बदल या वयात मुलींमध्ये पण होतात. त्याबद्दल माहिती आहे काही?"

"खूप नाही, पण मागे एका विज्ञान स्पर्धेच्यावेळी वाचले होते. काहीतरी मासिक पाळी वगैरे."

"हो बरोबर तेच. हे फक्त या वयात नाही तर पुढे अनेक वर्ष म्हणजे साधारण पन्नाशीपर्यंत होते. आई होणे... पोटात बाळ वाढवणे यासाठीची ती शरीर रचना आहे." 

(
तिने अतिशय स्पष्ट, वैज्ञानिक शब्दात आणि मधेमधे त्याच्या प्रश्नांना उत्तरे देत याविषयी अनेक गोष्टी त्याला सांगितल्या. तोही नावाप्रमाणेच जिनियस असल्यामुळे याची खिल्ली न उडवता किंवा आड पडदा न ठेवता मनात असलेल्या अनेक शंका मोकळ्या करुन घेतल्या.)

"
मग ते जाहिरातीत पाणी पडताना का दाखवतात?"

"
कदाचित त्यांच्यावर प्रसारण करतानाची काही बंधने असतील, आणि जे सांगायचे ते सांगता येते ना. पुरेसे आहे तितके. तुला माहितीये हे सगळे मी तुझ्याशी का बोलले ?"

"
हेच मीही विचारणार होतो..."

"
एक म्हणजे हे आजूबाजूला होताना दिसत असते. घरात, वर्गात अनेकदा याविषयी काहीतरी ऐकायला येते. त्याविषयी तुला नीट आणि योग्य माहिती असायला हवी. 

दुसरे त्याहून महत्वाचे हे चार-पाच दिवस आमच्यासाठी बऱ्यापैकी त्रासाचे असतात. पोट,पाठ, कंबर, पाय दुखतात... चक्कर येते... अस्वस्थ वाटते... चिडचिड होते. यावेळी घरातल्या प्रत्येकाने समजून घ्यावेसे वाटते. वर्गात  मुलींना असे झाल्यावर विचित्र वाटते... लाज वाटते. अशावेळी अनेकदा याची नीट माहिती नसल्याने मुले त्यांना चिडवतात. तू असे करु नये म्हणून हा सगळा प्रपंच.

तिसरे अनेक लोक आजही याकडे अशुद्ध, अपवित्र म्हणून बघतात. याकाळात बाईवर अनेक बंधन असतात. इथे जाऊ नको... हे करु नको... पूजा नको... मंदिर नको... "

"
त्यात काही अर्थ असतो ?"

"
अजिबात नाही. या गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. छान आहेत. खर सांगायचे तर या काळात स्त्रीला आरामाची गरज असते. कदाचित त्यासाठी आपल्या पूर्वजांनी अशी बंधन घातली असतील. काळाच्या ओघात त्याचे महत्व बाजूला राहून नको ते सोपस्कारच शिल्लक राहीले. बाईचे अवघडेले पण जास्त वाढत गेले. आता पुन्हा यात बदल होत आहेत पण त्यासाठी यामागची भूमिका, विचार असावा लागतो. तो देण्याचा हा प्रयत्न. तू एक चांगली व्यक्ती म्हणून मोठे व्हावे असे वाटते रे...."

"....................." (
तो काही बोलला नाही पण त्याला समजते आहे... पटते आहे, हे त्याच्या डोळ्यातून पाझरत होते. काहीवेळ शांततेत गेला. दोघेही काहीच बोलत नव्हते...)

"
खूप अवघड, नको असलेले काही सांगितले का रे मी. तू खूप छान असावेस. मोठे होण्यात जबाबदारी असली तरी एक वेगळी गंमत आहे ती तुला माहिती असावी, असं मनापासून वाटलं रे मला....."

"
नको काळजी करु... मी लक्षात ठेवेन सगळचं..." (तिला मधेच थांबवत आणि हाताने ओके दाखवत विश्वासाने तो म्हणाला.)

आड वाटेचा प्रवासतरी असे निरागस
होती अनेक बदल, पण अगदी सहज.
ही सृजनाची सुरुवात, जरा वाटे अवघड,
नको उगा बावरुआम्ही आहोत सोबत ! 

तिला आपण योग्यच केले असे दाटून आले. त्याच्या अवघड प्रवासाची एक पायरी तरी आपण सोबत चढलो याची खात्री झाली. 

दोघे अगदी निवांत होत घरी परतली. 





No comments:

Post a Comment

suggestions most wlcome