Saturday, May 09, 2020

संचय

संचय की वापर


 
एक नेहमीसारखा शनिवार. 

जिनियस नुकताच शाळेतून आला होता. 

सोमवार आषाढी एकादशी म्हणजे जोडून आलेली सुटी.

स्वारी खूप आनंदात इकडे तिकडे नाचत होती. 

इतक्यात आईने आवाज दिला.

"बोला मातोश्री काय आज्ञा आहे. कोणत्या मोहिमेवर जायचे आहे? कोणती कामगिरी फत्ते करायची आहे? युवराज दोन दिवस आपल्या सेवेसाठी असणार आहेत."

"
युवराजांनी प्रथम वर्तमानात यावे. जरा हा संदेश वाचावा आणि काही करता येईल का ते पहावे."

बाजूलाच बसलेला बाबा, आजी, आजोबा या गमतीशीर संवादाने हसू लागले. जिनियसने व्हाट्स ऍपला आलेला तो संदेश म्हणजेच मेसेज वाचला.

"
काय युवराज कोणत्या गडावर जाताय? की अजून कोणती कार्यशाळा आहे सुटी कारणी लावायला?"

"
नाही आजोबा, हा तर वस्तू संकलन असला काहीतरी संदेश आहे, थोडक्यात आपल्याला न लागणाऱ्या पण चांगल्या दुसरे वापरु शकतील अशा वस्तू जमा करणार आहेत उद्या. यात कपडे, भांडी, इलेक्ट्रोनिक वस्तू बरेच काही आहे."

"
अरे वा छान उपक्रम आहे. मीही जरा बघते माझ्याकडे असे काही आहे का?" आजी.

"
बघ ना मी नेऊन देईन माझ्या सायकलवरुन इथे जवळच आहे तो हॉल. पण मातोश्री यात नेऊन देण्यापलीकडे मी काही करावे असे आपणास सुचवायचे आहे का?"

"
का नाही, तूही तुझ्या न लागणाऱ्या अनेक गोष्टी देऊ शकतो. तुझी जुनी सायकल, खेळणी, पुस्तक..."

" त्या साऱ्या तर माझ्या आवडीच्या, आठवणीच्या गोष्टी आहेत. त्या का बरं द्यायच्या?"

"
त्या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या आहेत. कोणाला तरी त्याचा छान उपयोग होईल."

"
आजोबा तुम्ही  तर तुमच्या लहानपणीच्या कितीतरी गोष्टी जपून ठेवल्या होत्या ना मग तूम्ही द्यायला कसे काय सांगता?"

"
बरं का जिनियस आमच्या लहानपणी आम्ही एका घरात खूप भावंड असायचो. मी आणि माझे पाच भाऊ, तीन बहिणी. घरातच नऊ जण झालो. अजून काका, मामा यांचीही मुले असायचीच. सहसा एक वस्तू एकदाच आणली जायची मग मोठ्यापासून सुरुवात होऊन लहान मुलापर्यंत तीच वापरली जायची. अगदीच खराब झाली तर दुसरी यायची. आम्ही पुस्तकही एकमेकांची वापरायचो. आधीच्याने केलेल्या खुणा, महत्वाचे प्रश्न उपयोगीच पडायचे."



"
हे सगळे माझ्या लहानपणी कमी झाले बरं का. मी आणि तुझा मामा आम्ही दोघेच भावंड. चुलत, मावस भावंड राहायला लांब त्यामुळे अनेक जणात नाही पण दोघात अनेक वस्तू वापरल्या आहेत. त्यानंतर शेजारच्या काकूंच्या मुलांना द्यायचो. जे खूप छान आणि कायम वापरात होते तेवढे मात्र अजूनही आहे जसा की कॅरम जो आता तू खेळतोस." आई.

"
या सगळं  बरोबर आहे. मला माहितही आहे पण तरी मी माझी खेळणी, सायकल आणि गोष्टीची पुस्तक का कुणाला देऊ?"

"
सायकल आता तू वापरत नाही कारण नवी गियरची सायकल आपण तुला आणली आहे. आधीची पडून पडून गंजायला लागली आहे. त्यापेक्षा कोणीतरी छान वापरेल." आजोबा.



" आणि तूच नाही काही. आम्ही पण आमच्या अशा वापरत नसलेल्या पण चांगल्या काम करणाऱ्या वस्तू देणारच आहोत. आम्हाला शिकवायला एक ताई होत्य. त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला होता, जी वस्तू तुम्ही सहा महिन्यात वापरली नाही ती तुम्हाला त्यपुढे लागणार नाही. ती उगाच जपण्यापेक्षा गरजू व्यक्तीला दिली तर तो त्याचा छान उपयोग करेल आणि तुम्हाला आशीर्वादही देईल, म्हणून आपण अधून मधून आवराआवर करत असतो. काही वस्तू घरकाम करणाऱ्या मावशीना देत असतो." बाबा.

"
आधी तुझ्या गोष्टी मी द्यायचे पण आता तू मोठा आहेस म्हणून यावेळी तुलाच काढायला सांगतो आहोत. बघ तुझ्या खेळण्यांमध्ये बरीच  खेळणी आता तू मोठा झाल्यामुळे तुझ्या कामाचीच नाही. आपल्याकडे कोणी लहानपण नाही. ती दिलीस तर कोणीतरी छोटू खुश होईल आणि खेळणीसुद्धा." आई.

"
राहिली तुझी गोष्टीची पुस्तकं. ती सगळी नाही पण जी त्यातली बालकथा, पंचतंत्र अशी आहेत जी तू आता वाचत नाही ती दे. पुस्तकं ग्रंथालयाला दे जेणेकरुन तुला अगदीच वाचवीशी वाटली तर कधीतरी घेऊनही येता येतील."

"
मला तुमच्या सगळ्यांचे म्हणणे पटले आहे. कोणत्याही गोष्टी जमवण्यापेक्षा त्याचा वापर होत रहायला हवा. आपली गरज संपली तरी इतर कुणाला तरी उपयोगी पडू शकते त्यामुळे ती त्यास दिली तर ती अधिक छान रहाते. मी आत्ता माझा कप्पा, रुम आवरतो आणि असं काय काय सापडते आहे ते बघतो. तसही नवीन काही आणायचे म्हणल्यावर आई म्हणतच असते, आधीचा पसारा आवर मग बघू नवीन...." डोळा मारत जिनियसने सगळी आवराआवर केली.




सायकल, खेळणी, पुस्तक यांच्याबरोबर काही लहान होणारे कपडे, शूज, सॅक, स्टडी टेबल  यांचीही त्यात भर पडली. हे सगळे उत्तम आणि वापरायला चांगले होते फक्त नवीन मिळाल्यामुळे आधीचे जिनियस वापरत नव्हता. 





आधी आपल्या वस्तू कुणालाही द्यायला न आवडणारा जिनियसला वस्तू वापरल्या तर उपयोगी असतात हे पटल्यामुळे द्यायला अगदी एका पायावर तयार झाला होता.

काय मित्रांनो तुम्हाला पटते आहे का

अनेक गोष्टी अशा असतात ज्या पडून राहिल्या तर खराब होत जातात त्यापेक्षा कुणा गरजूला दिल्या तर त्या चांगल्या राहतात. 

आपल्याला दिल्याचा आणि मिळणाऱ्याला गरज पूर्ण झाल्याचा आनंद होतो. 





मग बघणार ना तुमच्याकडे असे काय काय आहे ते आणि देणार ना...

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome