Showing posts with label जिनियस. Show all posts
Showing posts with label जिनियस. Show all posts

Sunday, May 10, 2020

स्वावलंबन


मास्टर जिनियसची उन्हाळ्याची सुटी सुरु झाली. सुरवातीचे काही दिवस वेगवेगळी शिबीरे, नवीन गोष्टी शिकण्यात गेले. 

मग निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे छान गुणांनी मास्टर जिनियस पुढील इयत्तेत गेला.

आता मात्र दिवसाचे चोवीस तास संपणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसले होते. बरेच मित्र कुठे ना कुठे फिरायला गेले होते. आईची नोकरी, बाबाचा व्यवसाय, आजी आजोबांचा नेहमीचा दिनक्रम  यामुळे जिनियस बराच वेळ एकटा असायचा. 

सारखे वाचन तरी किती करणार? टीव्ही , कॉम्प्युटर दिवसातून एक तास हा नियम ( जो त्याच्या भल्याचा होता आणि तो मनापासून पाळायचा) यामुळे आता त्याला सुटीचा कंटाळा येऊ लागला होता.

पण अचानक गंमत झाली. नीलू मावशी जी गावाकडे असायची. गावी म्हणजे छान सुधारलेले पण शेती आणि तशा अनेक गोष्टी अजूनही सांभाळून ठेवलेले. 

मावशीचा मुलगा पुष्कर जिनियसपेक्षा एक वर्षानी मोठा तर मुलगी सानिका एक वर्षानी लहान होती.एकत्र आले कि या  भावंडांचे छान मेतकूट जमायचे.

मावशीने फोन करुन आईला सांगितले की काका दोन दिवसांनी काही कामासाठी पुण्यात येणार आहेत. परत येताना  त्यांच्यासोबत जिनियसला सुट्टीसाठी गावी पाठव.  

हे ऐकल्यावर स्वारी खूप खूष झाली. आनंदाने घरभर नाचू लागली. गावाला जाऊन काय काय करायचे हे सगळ्यांशी गप्पा मारुन ठरवू लागली. 

आईने हाक मारली, " शौनक एरवी मी, बाबा किंवा आजी आजोबांपैकी कोणी ना कोणी तुझ्यासोबत असतो. तू पहिल्यांदाच असा एकटा जाणार आहेस. त्यामुळे नीट रहायचे. कोणालाही त्रास होईल असे वागायचे नाही, भांडण करायचे नाही आणि सगळ्यात महत्वाचे आपण ज्या चांगल्या गोष्टी रोज करतो त्या तिथेही करायच्या."

"
हुकूम सर आँखोपर ! खरं म्हणजे हे सगळे सांगायची गरज नव्हती माते पण तरीही आपल्या अपेक्षांचा भंग होणार नाही याची खात्री हा जिनियस देतो. उलट नवीन काहीतरी शिकून येईन हेही आश्वासन देतो." शौनकच्या या नाटकी आवाजात पण मनापासून दिलेल्या उत्तरला सगळ्यांनी कौतुकाने हसून दाद दिली.

या सगळ्यात दोन दिवस कसे गेले कळलेच नाही. काका त्याला घ्यायला आले, त्यांना फार वेळ नसल्याने जेवण करुन रात्रीच्या गाडीने दोघे निघणार होते. आपली बॅग आईच्या देखरेखी खाली पण स्वतःहून भरुन साहेब तयार होते.

झोपेत आठ तासांचा प्रवास कधी संपला हे कळलेही नाही. साधारण सहाच्या सुमारास दोघे घरी पोहचले.

शौनकला बघून घरातील सर्वांनाच आनंद झाला. प्रवासाचा शीण जावा म्हणून मावशीने आंघोळ करायला सांगितल्यावर त्याने पटकन कपडे घेऊन बाथरुमकडे धूम ठोकली.

काहीवेळातच स्वारी बाहेर आली. हातात प्रवासात घातलेले कपडे धुवून, पिळून आणले होते. वाळत घालण्यासाठी मावशीला जागा विचारु लागला.


       

"
अरे तू का धुतले? इथेही बाई आहे, मशीन आहे. नाहीतर तुझी मावशी पण आहे." आजी (मावशीची सासू) म्हणाली.

"
यावर्षीच मी हे शिकलो आहे. घरीसुद्धा धूतो, मशीन असले तरी कारण हे मला यायला पाहिजे असे आईला वाटते आणि मलाही पटते." हसत डोळा मारत त्याने उत्तर दिले आणि मावशीने दाखवलेल्या दोरीवर कपडे वाळतही घातले.

त्यानंतर दूध पिऊन कपही छान विसळून ठेवला. नाष्टा झाल्यावर ताटली उचलून ठेवली, मग मात्र स्वारी सानिका-पुष्करसोबत खेळायला पळाली.


मावशीला हे सगळे माहिती होते त्यामुळे तिला काही वाटले नाही. पण तिच्या सासूबाई थोड्या जुन्या वळणाच्या असल्याने त्यांना मुलाने अशी कामे करणे आवडले नाही. त्या तसे बोलल्या नसल्यातरी त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणवत होते.

दुपारी जेवणानंतरही त्याने आपले ताट उचलले. आता मात्र  आजी त्याला म्हणाली, " अरे हे सगळे तू तुझ्या घरी करत असला तरी इथे  करु नको. तुझी आई नोकरी करते पण मावशी असते घरी त्यामुळे ती करु शकते आणि मदतीला मी, सानिका आहोतच."


यावर गोड हसत तो आजीजवळ गेला, "आजी हे सगळं मी का करु नको त्याचे एक कारण सांग. मी नाही करणार."

"
अरे ही मुलांची कामे नाहीत. आणि घरात आम्ही तिघी असताना तू हे सगळं करायची गरज नाही." 

मावशीने खुणेने काही बोलू नको असे सांगितले. आजी आजोबा जुन्या वळणाचे आहेत हे आईने त्याला सांगितले होते. त्यांना उगाच काही बोलू नको असेही बजावले होते. आपली बाजू कशी सांगावी यावर क्षणभर विचार करत तो म्हणला,

"
माझी ही काम जरावेळ बाजूला राहू दे. आज आम्ही आपल्या शेतावर जाऊन आलो. ते किती मोठे आहे आणि छान आहे. शिवाय काकांनी खूप नवनवीन यंत्रांनी अगदी आधुनिक केले आहे. हे सगळं बघताना मला खूप छान वाटले. एरवी पुस्तकातून शिकतो आम्ही पण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून खूप काही नवीन समजलं."

"
हे तर छानच झालं. हे सगळे केले तरच शेत टिकवता येईल बाबा.... नाहीतर नोकरीच करावी लागेल. तुझ्या काकांनी हट्टाने हे शिक्षण घेतले. इथे अनेक बदल केले आणि करतात म्हणूनच आज हे सगळे बघायला मिळते आहे नाहीतर बाकीच्यांसारखी शेती विकून टाकावी लागली असती."

"
आजी म्हणजे काळाप्रमाणे बदलायला हवे हे तुला पटते तर."

"
यात न पटण्यासारखे काय ?"

"
मग मुलांनी कोणती कामे करावे आणि मुलींनी कोणती यात बदल नको? खरतर अशी कोणतीही कामे विशिष्ट कुणाची नसतात.

मी ही काम करतो कारण मला हे सगळे करता यायला हवे.ही कामे मला स्वावलंबी बनवतात. आत्मविश्वास देतात. हे केल्यावर घरातही किती कामे असतात याची माहिती मला होते. 

आई नोकरी करते म्हणून मी हे करत नाही तर ही कामे माझी नाहीत असे वाटून मला इतरांवर अवलंबून राहण्याची सवय लागू नये म्हणून आहेत. आईने मला ही सवय लावली असली तरी मलाही ते पटते.

मावशी नोकरी करत नाही पण तिचाही फळ प्रक्रियेचा व्यवसाय आहेच ना. तिथे कामाला बायका असल्यातरी लक्ष द्यावे लागते शिवाय बाकीची कामे असतातच ना.

सानिका लहान असून तुम्हा दोघींना मदत करते का तर मुलगी आहे आणि पुष्करदादा मात्र यातले काही करत नाही हे मला फार पटत नाही. उद्या शिक्षणासाठी त्याला शहरात किंवा दुसऱ्या ठिकाणी जावे लागले तर यामुळे त्याचेच हाल नाही का होणार? उलट या सवयी आताच लावून घेतल्या तर त्याला खूप सोपे होईल.

आजी मी अजूनही खूप काही करतो. माझे अंथरुण आवरतो, धुतलेली भांडी लावतो, माझे कपाट नीट ठेवतो, आईला दुकानातून छोटे सामान आणून देतो.

इतकेच नाही तर आता हळूहळू थोडाफार स्वयंपाकही शिकणार आहे. सध्या मी आईसोबत कधी पोहे तर कधी भाजी करतो, कधी कुकुरही लावतो.

शिवाय ही कामे करताना मजा येतेच आणि सगळ्यांकडून कौतुकही होते. मी तर हे सगळे करतो म्हणून मित्रांमध्ये खूप भाव खातो. आणि एखाद्या वेळी कंटाळा आला म्हणून नाही केले तर लगेच कोणी मला ओरडत नाही. 

आजी रागवू नको. माझे चुकत असेल तर तसे सांग. पण मी तरी माझी ही सवय मोडणार नाही."

"
नाही रे, तुझे अजिबात चूकत नाही. आम्ही कधी पुरुषांनी अशी कामे केलेली बघितली नाही म्हणून मला ते आवडले नव्हते.

पण तू काकांनी आजची गरज म्हणून शेतीसाठी नवे पर्याय वापरुन ते कसे छान बनवले हे सांगत... पुष्कर किंवा तुला ही कामे करुन काय फायदे होतील हे सांगितले तेव्हा मला ते पटले. 

तू तुझी सवय अजिबात सोडू नको आणि पुष्करलाही हे सगळे शिकव. कदाचित हे सगळं ऐकल्यावर तो स्वतःच करेल. 

मागे पुष्करची मुंज झाल्यावर तुझ्या मावशीने हे सुचवले होते पण मीच नको म्हणले होते. तेव्हा तीनेही सांगितले होते बाहेर गेल्यावर हाल नको पण तुझ्यासारखे कोणते उदाहरण न दिल्याने तितकेसे पटले नव्हते. 
त्यासाठी मी तिचीही माफी मागते."

"
माफी कसली आई. आपण राहतो तिथे बदल व्हायला वेळ लागतो आणि त्यासाठी थांबायची माझी नेहमीच तयारी असते. तुम्हाला पटले की तुम्ही बदलता हे मला माहिती आहे. आणि आज तुम्ही ते दाखवून आणि या साहेबांनी तुम्हाला छान पटवूनही दिले."

"
उगाच नाही मला मास्टर जिनियस म्हणत. आता हे स्वावलंबन पुरे झाले. सानिका आणि पुष्करदादाकडून बागकाम शिकायचे मी ठरवून आलो आहे त्यामुळे आम्ही आता पळतो ......."

काय मग ?

गाव किंवा शहर , मुलगी किंवा मुलगा....आपली काही कामे आपल्याला स्वतःला यायला हवी, स्वावलंबी बनायला हवे... हे मास्टर जिनियसचे म्हणणे तुम्हालाही पटले ना?

चला तर मग ऊठा आणि लगेच सुरुवात करा. मला कळवायला विसरु नका.

जादुई शब्द

मास्टर जिनियस त्याच्या केदार मामाकडे गेला होता.

मामा म्हणजे जिनियसचा आयडॉल जो खूप हुशार तर आहेच, पण एक उत्तम व्यावसायिकही आहे. 

त्याने उत्तम शिक्षण घेऊन, फळ प्रक्रियेचा व्यवसाय सुरु केला.  

नातेवाईकांमध्ये या आधी कुणीही व्यवसाय करत नसूनही, केदारमामाने मात्र आपला उत्तम जम बसवला आहे. 

सुरुवातीला चढउतार आले, प्रश्न उभे राहीले, पण या सगळ्यातून मार्ग काढत आज त्याने यशस्वी उद्योजक म्हणून नाव मिळवले आहे.

मोठे झाल्यावर आपणही मामासारखा स्वतःचा व्यवसाय करावा, असे जिनियसला नेहमी वाटते म्हणूनच संधी मिळाली की तो मामाकडे जात असतो. 

त्याच्यासोबत राहून त्याच्या कामाचे निरीक्षण करत असतो. अर्थातच यातून नवनवीन गोष्टी शिकत असतो.

यावेळी मामाने जिनियसला जादूचे शब्द शिकवले, ज्यामुळे कोणतेही काम उत्तम व्हायला मदत होते.

त्याचे झाले असे, नेहमीप्रमाणे जिनियस मामा बरोबर त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला होता. 

सुरुवातीला तेथील कामगारांशी मामा काहीवेळ बोलत होता. कामाविषयी सूचना देत होता. 

त्यानंतर तेथील थोड्या वरच्या पदावरील मंडळींसोबत चर्चा झाली.

आत्तापर्यतचे, यापुढील काम याविषयी बोलणी झाली. 

दुपारी काही व्यापारी मंडळी आली होती. त्यांच्यासोबत नवीन कामाची आखणी झाली.

घरी जाताना मामाचे काही मित्रमैत्रिणी भेटले. त्यांच्यासोबतही खूप गप्पा झाल्या.

दिवसभर मामाला इतक्या माणसांशी बोलताना बघून जिनयसला मजा तर वाटतच होती, पण इतक्या सगळ्यांशी बोलताना मामा दमत नाही, कुणावरच चिडत कसा नाही, कंटाळत नाही, याचे त्याला आश्चर्य वाटत होते.

घरी आल्यावर आपली शंका त्याने मामला विचारली.

मामा म्हणाला, "जिनियस मी आधी असा नव्हतो. चिडायचो, ओरडायचो पण त्यामुळे काम अजूनच बिघडायचे. 

मी जरी स्वतःचा व्यवसाय करत असलो तरी, सगळी कामे एकटा करु शकत नाही. अनेकांना बरोबर घेऊन काम करावे लागते. खूप माणसे जोडावी लागतात.

मग मी थोडा अभ्यास केला. स्वतःमधे बदल केला. हळूहळू काही गोष्टी शिकत गेलो. मला कळलं की जेव्हा मला अनेकांबरोबर काम करायचे असते, तेव्हा काही जादूचे शब्द मदत करतात."

"जादूचे शब्द ! गंमत करतो का माझी ? मी काही आता लहान नाही." जिनियस.

"अरे बाळ, जादूचे म्हणजे, असे की ज्यामुळे काम करताना छान वाटते आणि उत्साह वाढतो.

बघ म्हणजे मी कामावर गेल्यावर तिथल्या कामगारांना भेटलो. 

त्यांनी काल केलेल्या कामासाठी त्यांचे अभिनंदन केले आणि नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या. म्हणजेच तुमच्या भाषेत congratulation आणि thank you या शब्दांनी मला मदत केली. 

नंतर काही व्यापाऱ्यांशी बोलणे झाले. त्यांचे एक काम जरा उशीरा झाले. त्यासाठी मनापासून माफी मागितली. पुन्हा एक संधी देण्याची विनंती केली व अशी चूक परत होणार नाही याची खात्री दिली. म्हणजेच sorry, please आणि promise या शब्दांनी जादू केली.

काय मास्टर जिनियस काही समजते आहे का?"

" हो मामाश्री, तुमच्या या शिष्याला आज जादूच्या शब्दांचा खजिना मिळाला आहे. उगाच चिडचिड करुन किंवा रागावून आपली कामे होत नाहीत. उलट माणसे आपल्यापासून दुरावतात. एकमेकांबरोबर काम करताना किंवा खेळताना आनंद हवा असेल तर योग्यवेळी अभिनंदन, आभार, माफी, विनंती म्हणजेच congratulation, thank you, sorry, please, promise हे शब्द जादूच करतात. हे आता पक्क लक्षात ठेवणार आणि त्याचा उपयोगही करणार."

काय मित्रांनो, तुम्हीही वापरणार ना, हा जादुई शब्दांचा खजिना ?

नक्की वापरा. तुमची कामे तर छान होतीलच, पण त्याचबरोबर खूप सारे मित्रमैत्रिणीही यामुळे जोडले जातील.

पाऊलखुणा




आपला मास्टर जिनियस म्हणजेच शौनक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत. काय करणार काळची गरज.

 
माध्यम इंग्रजी निवडले तरी मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती उत्तम आली पाहिजे म्हणून आईबाबांनी त्याच्या लहानपणापासून खूप कष्ट घेतले. त्याला भरपूर गोष्टी सांगायच्या, पुस्तके वाचून दाखवायची. आजी आजोबाही वेगवेगळी माहिती, संदर्भ सांगायचे.

त्यामुळे जिनियसला मराठी छान येते आणि आवडते सुध्दा. तो भरपूर वाचतो आणि त्यात मराठी पुस्तके असतातच.

झालं काय जिनियस एक मासिक वाचत होता. त्यात एक सुंदर कविता होती. एका चित्रकलेत उत्तुंग यश मिळवलेल्या चित्रकारावर लिहिलेली. जिनियसला कविता खूपच आवडली कारण खूप सहज आणि सोप्या भाषेत पण प्रेरणादायी होती. फक्त कवितेतल्या एका शब्दावर त्याची गाडी अडकली....शद्ब होता....पाऊलखुणा.

मराठी भाषाची आवड भरपूर वाचन असले तरी या शब्दमागची मांडणी त्याला काही उमगेना.

स्वारी आजोबांकडे धावली. " आजोबा पाऊलखुणा म्हणजे नेमके काय? पाऊलांचे ठसेच ना?"

"
हो, बरोबर. का बरं जिनियस आज मधेच या पाऊलखुणा कुठून आल्या?"

"
या मासिकातली एक सुंदर कवितेत आहे. कविता आहे चित्रकाराची आणि शेवटची ओळ आहे.

स्मरती पाऊलखुणा. कविता तर मला छान समजली कारण खूपच सोपे शब्द आहेत फक्त या ओळीवर गडबडलो.

चित्रकार चित्र काढतो मग त्याच्या पाऊलांचे ठसे का बरं आठवतात?"

"
असा गोंधळ आहेत तर, बरं का  जिनियस आपली मराठी ही खूप समृद्ध भाषा आहे. 

असे अनेक शब्द आहेत ज्यांचा वरवर दिसणारा अर्थ आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी येणारा अर्थ यात फरक असतो. 

इथे पाऊलखुणा म्हणजे त्याच्या चित्रकलेतील उत्तमता, वेगळेपण ज्यामुळे त्याला उत्तुंग यश मिळाले, प्रसिद्धी मिळाली. ज्यासाठी तो आजही ओळखला जातो. या सगळ्याला पाऊलखुणा म्हणलं आहे. 

येत आहे का लक्षात ?"

दोघांच्या गप्पा चालू असताना बाकी मंडळी म्हणजेच आई,बाबा आणि आजी तिथे येऊन बसली. त्यांच्या गप्पा ऐकत होते.

"
आजोबा आता मला पाऊलखुणा म्हणजे काय हे थोडेसे समजले. मोठे, यशस्वी लोक आपल्या कामाची जी ओळख, वेगळेपण सगळ्यांसमोर ठेवतात ते म्हणजे पाऊलखुणा. जसं माझ्या आवडत्या मेस्सीने फुटबॉल खेळात आपल्या पाऊलखुणा तयार केल्या आहेत. बरोबर ना?"

"
एकदम बरोबर टिळकांचा स्पष्टवक्तेपणा, गांधीजींची अहिंसा-असहकार, तेनालीरामचे चातुर्य या सगळ्या पाऊलखुणाच."

"
पाऊलखुणा तयार व्हायला खूप मोठे व्हावे लागते, यशस्वी व्हावे लागते तरच सगळे आपल्याला ओळखतात. हो ना ?"

"
हो पण आणि नाही पण. " मधेच बाबा म्हणाले.

"
काय म्हणायचे आहे बाबा तुला? मला नाही समजलं."

"
पाऊलखुणा हा एक सांकेतिक शब्द आहे. कामाची पावती देणारा. त्यामुळे त्यासाठी काम करायला हवे हे बरोबर पण फक्त मोठे कामच सगळ्यांच्या लक्षात राहते असेच काही नाही. प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो आणि त्याच्या खुणा मागे राहतातच.  कधी त्या चांगल्या असतात कधी वाईटसुद्धा."

"
म्हणजे काय मला अजूनही नाही समजलं ना...."

"
अंन......  मला सांग आजीला आपल्या ओळखीतले किंवा घरातले सगळे कशासाठी ओळखतात किंवा तिच्यामध्ये काय वेगळे आहे?"

"
अर्थात तिच्या सुंदर कविता आणि लोकरीच्या विणकामासाठी."

"
बरोबर. आजोबा?"

"
त्यांच्या जेष्ठ नागरिक संघाच्या कामासाठी."

"
एकदम बरोबर आणि मी....आई?"

"
आईपण तिच्या महिला मंडळात वेगवेगळी काम करत असते. शिवाय छान सूत्रसंचालन करते. खास बोलावतात तिला. पण तू ... मला तुझ्या कामाची काहीच माहिती नाही."

"
अरे तुझा बाबाला सगळे शिस्तीसाठी ओळखतात. जे काम जसे आणि जेव्हा हवे तसे झालेच पाहिजे यासाठी सतत सगळ्यांच्या मागे लागत असतो. कदाचित म्हणूनच खूप कमी वेळात त्याने कामात खूप मोठी पोस्ट मिळवली आहे. मागच्या वर्षी नाही का त्याला सर्वोत्तम कामासाठी कंपनीने बक्षीस दिले." आजी.



"
अरेच्या हे कसं विसरलो मी... तो त्यासाठी मलाही रोज सांगत असतो... नाही ओरडतच असतो."

"
अरे वा जे मी सांगणार होतो बरोबर तेच तुम्ही सांगितले मास्टर जिनियस."

"
काय सांगणार होता जे मी सांगितले?"

"
अरे या पाऊलखुणा काही एका दिवसात नाही तयार होत.  तशी सवय असावी लागते. काम छान, नीट आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी तसे वळण असायला हवे. नाहीतर अनेक जण खूप काम करतात पण कधी ते वेळेत होत नाही किंवा हवे तितके चांगले होत नाही मग त्याची दखल घेतली जात नाही. उलट कधी कधी त्यामुळे नुकसानही होते."

"
आता मला हळूहळू लक्षात येत आहे की तू नेमकं काय सांगणार आहेस. माझे काम खूपदा वेळेत होत नाही, आठवण करुन द्यावी लागते म्हणजे माझ्या कामाच्या खूणा या माझी चुकीची आठवण करुन देतात हेच सांगायचे आहे ना तुला?"

"
हो अगदी हेच. म्हणजे बघ आता तू तसा मोठा झाला आहेस. या वयात लागलेल्या सवयी पुढे तशाच राहतात. तुझी अनेक कामे तू स्वतः करु शकतोस आणि ती तू करतोस. याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आणि अभिमान आहे."

"
फक्त आता ती कामे अधिक छान, व्यवस्थित आणि वेळेत करायची सवय लागली तर त्याचा फायदा तुलाच पुढे होईल." आई.
" अजून नीट म्हणजे नक्की काय?"

"
बघ आपण उठण्यापासून सुरुवात करु या. ऊठल्याबरोबर अंथरुण नीट आवरुन ठेवणे.  न सांगता ब्रश, दूध, नाष्टा हे सगळे वेळेत आवरणे." आई.

"
शाळेत दिलेला अभ्यास, प्रकल्प वेळेत करणे, वह्या-पुस्तके छान ठेवणे त्याची काळजी घेणे, काम करुन झाल्यावर, खेळून झाल्यावर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणे." बाबा.

"
अरे हो....हो किती ते. बास करा. बिचाऱ्याने एक शब्द समजला नाही म्हणून विचारले तर तुम्ही तर त्याची शाळाच चालू केली." आजोबा.

"
अगदी माझ्या मनातलं बोलला आजोबा तुम्ही पण मी यावर रागवणार नाही बरं का. हे सगळे मी अगदी रोज ऐकत असतो पण त्याची गरज मला आज या पाऊलखुणा या शब्दाने करुन दिली. बाबाने सांगितलेले मला पटले की चांगल्या सवयी एका दिवसात लागत नाही. 
मला छान छान कल्पना सुचतात म्हणून सगळे कौतुक करतात पण त्यावर काम करायचे झाले तर ते वेळेत पूर्ण होत नाही मग ओरडा मिळतो. 
काम वेळेत करायची सवय मला अजून लागलेली नाही. 
नीट , सुवाच्य लिहिण्यासाठीही खूपवेळा शाळेत ताई सांगत असतात.
पसारा आवरत नाही म्हणून तुम्ही सगळे रोज खंडीभर वेळा सांगत असता.
पण मला माझी ही ओळख नको म्हणून आता मी बदलणार आहे. बाबसारखे मलाही सगळ्यांनी नीट व वेळेत काम करण्यासाठी ओळखायला हवे. माझ्या कामाच्याही छान पाऊलखुणा मागे रहायला हव्या."

"
वा शाबास जिनियस. तू हा शब्द नुसता समजून नाही घेतला तर आपणही तसे करण्यासाठी काय करायला हवे हे मान्य करुन ते करण्याची तयारी दाखवली. यासाठी तुझे कौतुक. याबद्दल माझ्याकडून तुला छान खाऊ मिळेल आणि म्हणल्याप्रमाणे बदल केले तर छान बक्षीसही." बाबा.

"
हुर्यो! मी हे नक्की करणार आहे."




" खूप मोठा हो. आणि चांगल्या कामाच्या पाऊलखुणा म्हणजेच तुझी वेगळी ओळख तयार कर." सगळे.