आज सोनू खूप दिवसांनी आली होती..
कित्ती मोठी झाली ही अचानक..
घर, नोकरी सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळते आहे..,
तरी तिच्याकडे बघून, तिचे बोलणे ऐकून उगाच वाटते,
की ही आपली सोनू नाही..! ही इतकी पोक्त कधी झाली..
कुठे बरं हरवला हीचा खेळकरपणा, आनंद...
प्रत्येक गोष्टीत त्रास, वैताग कधीपासून करायला लागली ही..
मी जरा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु केल्या, तरी बाईसाहेबांचा एकच सूर.. कटकटी, त्रागा..
गाडी कुठूनही सुरु झाली तरी, दुखरे स्टेशन गाठायची...
कधी जुने ठसठसणारे.. कधी आजचे निसटणारे...
तर कधी उद्याची चिंता..
मला एकदम तिच्या लहानपणीची एक गोष्ट आठवली...
जी मीच कशाला, तर तिला ओळखणाऱ्या सगळ्यांनी खूपदा ऐकली होती..
झाले असे होते की एकदा काकांची हाक आली, "सोनू, चल पटकन..."
"कुठे हो काका? " प्रश्न विचारला तरी उत्तर कुणाला हवं होत..
सोनूची स्वारी जशी होती, तशा आवतारात काकांसोबत उड्या मारत निघाली..
दोघे लवकरच एका कपड्यांच्या दुकानात पोहोचले..
काकांनी दुकानदाराला छान छान फ्रॉक दाखवायला सांगितले..
"तुला आवडेल तो घे, राखीपौर्णिमेची ओवाळणी, पण लक्षात ठेव, कुणालाही आधी सांगायचे नाही हं.. सरप्राईज देऊ.." काका म्हणाले..
खूप सारे फ्रॉक पाहिल्यावर, त्यातला एक तिच्या मनात इतका भरला, की तो सोडून तिला दुसरा कुठलाच छान वाटेना...
"हाच घेऊयात.."
काकांनी तिला घालून बघायला सांगितला..
तिच्या गोऱ्यापान रंगाला तो खूपच उठून दिसत होता..
पैसे देऊन खरेदी पूर्ण झाली, आनंदात दोघे घरी परतले..
दोन दिवसांनी राखीपौर्णिमा थाटात साजरी झाली..
काकांचे सरप्राईज काकूला आणि सोनूच्या आईला माहित नव्हते..
समजल्यावर खरं तर दोघींना आनंद व्हायला हवा होता..
पण फ्रॉकचा रंग बघितल्यावर दोघींच्या तोंडून एकावेळीच, आणि एकच वाक्य बाहेर पडले..
"अहो काळ्या रंगाचा का आणला..?"
"थोडे का दाखवले दुकानदाराने, पण तिला हाच आवडला म्हणून घेतला.."
"हो मला हाच.. हाच.. आणि हाच आवडला. अगं आई जरा बघ ना जरा.. त्याला एक नाही, तर चार-चार खिसे आहेत..
काकू अगं, खेळायला जाताना कित्ती..कित्ती.. आणि काय.. काय नेता येईल..
खाऊ, खेळणी.. मज्जा ना..!"
तिच्या या निष्पाप स्पष्टीकरणापुढे बोलणार तरी काय..
आणि वेगळे सांगायला नको की तिने तो फ्रॉक इतका वापरला की सगळे म्हणायचे, आता तरी बास कर.. पोतेरे झालंय त्याचं, रंग फिका पडला, तुला छोटा होत आहे.. त्यानंतर किती तरी नवीन ड्रेस आणले...
पण बाईंना, त्याची पडलेली भुरळ, काही केल्या कमी होत नव्हती..
पुढे तर बसत नव्हता,तर मग कपाटात जपून ठेवला होता..
हे सार सांगत मी तिला विचारले, "काय गं तुला आठवतो का तुझा तो फ्रॉक ?",
तर, काय फुलला तिचा चेहरा..
"हो गं मावशी, आठवतो ना.. त्यावरुन आईचा, काकूचा, कित्ती ओरडा खाल्ला होता, मी आणि काकांनी सुद्धा, आणि का?, तर फक्त काळा रंग म्हणून..
पण खरं सांगू... मला तर त्याचा रंग दिसलाच कुठे होता..!
दिसले होते, ते फक्त खिसे ..खूप सारे खिसे...
खेळायला जाताना, त्यात भरलेला खाऊ, मित्र-मैत्रिणींसोबत वाटून खाताना काय धमाल यायची..
इतर खिशात वाळूतले शंख, शिंपले, चोर-पोलिस खेळाचे कागद, किती काय..काय भरायचे मी..
खेळताना खाऊमध्ये धूळ, एखादा खडा जायचा, पण त्याने फार फरक नाही पडायचा..
काही वेगळीच मजा होती गं त्या सगळ्यात.. मावशी, सारखे वाटते उगाच मोठे झाले ग.."
"सोनू आजही असा फ्रॉक मिळाला तर..? खिसे असलेला..." माझा बाळबोध प्रश्न..
"अगं, आता त्यात भरणार काय? रोजची धावपळ, चुकलेले हिशोब, राहिलेल्या गोष्टी, डेड लाईन, टार्गेट, की उद्याची चिंता..?"
“अगं वेडे, हे सगळ मिळून जे तयार होईल तो त्या फ्रॉकचा रंग.. काळा..!
आणि त्याचा एकेक खिसा म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ..
शिवाय सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र असे चोर खिसेही शोधायचे..
मला सांग, तेंव्हा तू खिशात, आईने केलेले सगळेच पदार्थ भरायचीस का?
हाताला येतील त्या साऱ्या गोष्टी कोंबायची का ?”
माझ्या बोलण्यातून तिला काहीतरी समजत, उमजत होते.. तिच्या प्रश्नांची उत्तरे तिलाच सापडत असल्याने, नकारार्थी मान हलवत म्हणाली..
“अजिबात नाही, त्यात मी फक्त माझ्या आवडीचा खेळ, गमतीच्या गोष्टी, चटकदार खाऊ भरायचे?"
तोच धागा अधिक गडद करत मी अलगद सुचवले, "अगं माझी राणी, मग आता काल, आज, उद्या मधले वाट्याला येईल ते सगळं मनाच्या कोवळ्या खिशात कोंबते आहे..
तेंव्हा जसा खिशातल्या खाऊमध्ये, चुकून खडा आला, तरी फार फरक पडत नव्हता, थोड्याशा धुळीने लज्जत बिघडत नव्हती..
तसे नको असणारे खडे अलगद काढायला शिक, वा त्याकडे कानाडोळा कर..
जर तेंव्हा माझी बाळी फक्त आवडीच्या गोष्टीच बघायची..
मग आता का, सगळी दुःख, चुका, वैताग, भांडण, चिंता या आणि याच कवटाळते आहे..
सोनू, मनाला खिसे आहेत, म्हणून उगाच सगळं जमा करु नकोस गं...
ते जितके भक्कम दिसतात ना, तितकेच अलवार असतात..
प्रसंगी पर्वताचा भार वाहतील, नि साध्या पिसाच्या वजनाने उसवतील..
हक्काने सांगते जरा ठरवून, वेचून फक्त तुझा असेल, असा खजिना त्यात भर..
जे आज दुखर आहे, त्याला अंमळ दूरच कर..जे घडून गेलं, बदलणार नाही, ते विसरायला शिक, किमान प्रयत्न तरी कर..
उद्यासाठी ठरवून छान निवड.. आणि पुढे जाऊन त्यातही प्रश्न आले, तर जे वाट्याला आले त्याला छान म्हण.. पटतंय का मी म्हणते ते..?”
“अग मावशी, नुसत पटतंय असं नाही तर, हे सारे माझं मलाही कळत गं.. पण प्रश्न होता, की वळत नव्हत, कितीही ठरवले, तरी करता येत नव्हते..
पण तू मला फ्रॉकची आठवण करुन दिली ना, ती काही आता डोळ्यासमोरुन जात नाही, त्याने बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या..
आता मी पक्क ठरवल आहे, अगदी एकेक गोष्टी निवडून भरणार मी माझ्या मनाचे खिसे.. आनंद, मजा-मस्ती, हौस-मौज, प्रेम, मैत्री, नवे अनुभव, नवे वाचन..
किमान प्रयत्न नक्की करणार..
पळते आता, खूप उशीर झाला बघ, चांगला अंधार व्हायला लागला..पुष्कळ कामे राहिली आहेत..
पण ऐक ना, एकदा मिठीत घे ना, मला ना लहानपणीची सोनू व्हायचे आहे, त्यासाठी तुझा आश्वासक स्पर्श हवा आहे, बळ देईल ग तुझी जादूची झप्पी, जे ठरवले ते करायला..”
लेकाराने हाक दिल्यावर मायेला बांध न फुटला तर नवलच..
मी पुढे होत तिला कुशीत घेतले, काही सेकंद दोघींचे डोळे पाझरले..
लहान असताना मोठ्या विश्वासाने माझ्या कुशीत निवांत निजणारी माझी ही भाची, आता संसाराची सारी ओझी धीराने वाहते, त्यामुळे पटकन डोळे टिपत.. येईन, येईन मी परत अशीच कधीतरी असे म्हणत निघाली सुद्धा..
तिला पाठमोरी काहीसे नाचत जाताना बघून, लहानपणीची त्या काळ्या फ्रॉकमध्ये बागडणारी तिची छबी झळकली..
जी जाता जाता मनाच्या खिशातल्या नको असलेल्या गोष्टी टाकत होती, खिसे रिकामे होत होते..
जे यापुढे ती अगदी निवडून आनंद, मजामस्ती, यश यांनीच भरले जातील,असा विश्वास तिच्या चालीत झळकत होता..
मगाशी तिच्या काळजीने अस्वस्थ झालेले, माझे मनही आता शांत होत होते..
उगाच वाटले, एकदा मलाही माझे खिसे तपासून बघायला हवे..!

मस्त👌👌 छान कल्पना आहे आपल्या मर्जीप्रमाणे खिसे भरण्याची...
ReplyDeleteमनापासून आभार💝🎉
Deleteखूप छान लिहिलं आहेस वॄशाली!
ReplyDeleteमनापासून आभार💝🎉
Deleteखूप छान कल्पना आहे.
ReplyDeleteमनापासून आभार💝🎉
Deleteमन उल्हसित करणारे लेखन .
ReplyDeleteआभार🫰🏻🫶🏻
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteमनापासून आभार💝🎉
ReplyDeleteमनाला खिसे आहेत, म्हणून उगाच सगळं जमा करु नकोस🫶
ReplyDeleteकिती छान सांगितली आहेस कन्सेप्ट..सगळ्याच सोनू ना लागू ... 😘
खूपच मस्त लिहिली आहेस गोष्ट .. मनाला अगदी भावली ...
कदाचित हेच ऐकायचे होते मलाही माझ्या सध्याच्या धावपळ , पळापळ मोड मध्ये ❣️😇
एक जादूचा खिसा तुझ्या गोष्टींसाठी ठेवलेला आहे मनात जो रिकामा नाही करायचा ... तो मोठा मोठा होऊ शकतो स्वतःच्या मर्जीने 💜
किती सुंदर 🌹🫰🏻🫶🏻
Delete