Monday, May 29, 2023

वाढदिवस

 


२८ मे हा दिवस माझ्यासाठी अत्यंत अमूल्य आहे, कारण या दिवसाने माझ्या भाग्य रेषेत समृद्ध आणि सुंदर जडण घडण शिकवणारा वरदहस्त लिहीला आहे..


जडण घडणीचे पाहिले स्थान असते, ते म्हणजे मातेचे उदर, यासाठीची अभिमन्यूची गोष्ट तर सर्वज्ञात, पण तो आताचा विषय नाही..


जेंव्हा आपण भ्रूण म्हणून मातेच्या उदरात वाढत असतो, तेंव्हा कळत नकळत आपल्यावर संस्कार होत असतात..


आपले माता पिता कोण, कसे हे आपले आहेत हे पूर्वसंचित असते..


माझे पूर्व संचित नक्कीच अगणित असणार म्हणूनच, मला सर्वोत्तम आई बाबा मिळाले..


वटपौर्णिमा साजरी करताना मला जितके जन्म मिळतील, त्या साऱ्या जन्मात मला हेच आई बाबा लाभू दे, अशी प्रार्थना मी प्रथम करते त्यानंतर मग, हीच भावंडं, हीच शाळा,  हाच नवरा, हाच मुलगा..अशी न संपणारी यादी..


आईबाबा हेच माझे पाहिले व्हॅलेंटाईन आहेत आणि असतील, कारण त्यांच्यामुळे मला बाकी सगळे मिळाले आहे, त्यांनी जन्म दिलाच नसता तर इतर काहीही कसे मिळाले असते..?


तर अशा या माझ्या आई बाबांपैकी,


आईचा जन्मदिवस म्हणजे २८ मे..


माझ्यासाठी भाग्याचा दिवस, ती जन्मली म्हणून मला आई म्हणून मला लाभली..


मग मला त्या दिवसाचे कौतुक असणारच ना..


मला समजायला लागल्यापासून या दिवसाची मला नेहमीच ओढ वाटायची, तिच्यासाठी काहीतरी भारी करायचा माझा नेहमीच हट्ट असायचा, असतो आणि नेहमीच असेल..


तिनेच दिलेल्या विचारांमुळे सुरुवातीला आर्थिक गोंधळ न घालता, मी स्वतः केलेले भेटकार्ड, एखादा स्वतः बनवलेला पदार्थ करण्यावर भर माझा असायचा.. 


कधी कधी बाबांची आर्थिक मदत घेऊन, तिला चकीत करण्याचे वेडे प्रयत्नही केले होते..


पण तिची लहान वयापासून असलेली पराकोटीची समाधानी वृत्ती, वस्तू, भेट यात कधीच चकित झाली नाही..


चकित झाली नसली, तरी तसे तीने त्याक्षणी तरी दाखवले नाही, ती आमच्या आनंदात तितकीच आनंदी व्हायची..


आणि माझ्या या बाळबोध प्रयत्नांचे कौतुक करायची, सर्वांना अभिमानाने सांगायची, आजही सांगते..


आईने स्वानुभवातून फार लवकर  सांसारिक विरक्ती स्वीकारली आहे, तेही संसारात राहून..


म्हणजे ती सर्व गोष्टी जसे की खाणे, फिरणे, खरेदी करणे, करमणूक इत्यादी आनंदाने, उत्साहाने करत असते, पण त्या गोष्टीत अडकत नाही..


यामुळे गेली अनेक वर्षे तिचा वाढदिवस साजरा करणे, मला तरी अवघड जात आहे..


तशी ती नाही कशालाही म्हणत नाही, आमच्या नियोजनात मनापासून सहभागी असते, पण त्याचे लगेच ओम कृष्णार्पण नमास्तु म्हणून समर्पण करुन देते..


अशातच ४ मार्च २०२३ बाबांच्या शरीराने निघून जाण्याने, आमच्या कौटुंबिक शक्तीमध्ये एक पोकळी निर्माण केली आहे, जी कधीच भरुन निघणार नाही..


कारण कितीही म्हणले की बाबा विचार, आशीर्वाद म्हणून आहेत, तरी शरीराच्या चैतन्याची, उत्साहाची सर त्याला असू शकणार नाही..


बाबांना शरीराने जाणे, हळूहळू आम्ही स्वीकारत असलो, त्यांना आमच्या विचारात कृतीत शोधत असलो, तरी त्यांच्या अस्तित्वाचा आजूबाजूला भास होतच रहातो..


त्यांच्या जाण्याला अजून तीन महिनेही पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे कोणत्याही सेलिब्रेशनसाठी आम्ही कोणीच अजून तयार नव्हतो..


पण तरीही २८ मे २०२३ आईचा वाढदिवस ही मला संधी वाटते होती..


एक म्हणजे तिला आशीर्वाद मागण्याची, की तुझे सत्व मला दे, तुझ्यातले सर्व उत्तम गुण अनुवंश, परंपरा, अनुकरण, निरीक्षण या साऱ्यातून माझ्यात येऊ दे..


आणि दुसरे म्हणजे आता वयाच्या या टप्प्यावर आपले नाते आपण अधूनमधून अदलाबदली करु या..


तू मला प्रेम, आधार, बळ म्हणून सदैव आईच्या रुपात हवीच आहे.. 


तरीही कधीतरी अनुभव म्हणून मला तुझी आई होऊ दे, तुझी काळजी घेऊ दे, तुझ्यासाठी चांगल्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी मला करु दे..


हा विचार करुन २७ मे २०२३ 


मी तिला विचारले, "आई उद्या मी, गंधार, अभिजीत तुझे आशीर्वाद घ्यायला संध्याकाळी येणारच आहोत, मला माहिती आहे, तुला सध्यातरी काहीही करण्याची इच्छा नाही, पण तरीही मला काहीतरी करावेसे वाटत आहे, काय करु..?"


ती म्हणाली, "तुला माहिती असेल, पुढच्या प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीसाठी वर्षभर त्यांच्या अत्यंत आवडीचे काहीतरी सोडून देतात..


तुझ्या बाबांनी प्रत्येक गोष्ट खूप आनंदाने, उत्साहाने साजरी केली होती, प्रवास, समारंभ, मैत्री, आपल्या सगळ्यांचे वाढदिवस, त्यांचे समाज कार्य एक ना अनेक सारे नेहमी साजरे करण्याची आवड होती. 


इतकेच नाही तर दुःखसुद्धा, आत्ताचे बघ ना, त्यांचे आजारपण आणि पुढच्या प्रवासाची तयारी सुद्धा कुणालाही फार त्रास न देता, त्रागा न करता अवघ्या अडीच महिन्यात सगळी गणिते बदलून ठेवली..


त्यामुळे मला त्यांची ही आवडती गोष्ट, सेलिब्रेशन नेहमीसाठी सोडून द्यायचे आहे.."


एकूणच बाबा आजारी असल्यापासून, मी कशालाही लगेच हो - नाही म्हणायचे नाही, असे ठरवून नव्याने शिकत आहे..


त्यामुळे मला निशब्द करणारी, तिची मागणी ऐकून, त्याक्षणी मी तिला "बरं.." इतकचं म्हणून घरी परतले..


दिवसेंदिवस आईची संसारात वाढत चाललेली ही विरक्ती, मला प्रचंड घाबरवून सोडते, परिणामी आधी मी खूप रडले, पण शांत झाल्यावर वाटले..


एक म्हणजे हा आपला स्वार्थीपणा आहे, उद्या आपण आपला दिनक्रम, संसार, नोकरी यात अडकलो की आईची हीच विरक्ती, तिची शक्ती असणार आहे, मग त्याला आपण साथ द्यायला हवी ना..!


दुसरे हे मला कधी जमेल, आईला नेमके कशामुळे जमते..?


खूप विचार केल्यावर लक्षात आले, यासाठी आईकडे अध्यात्माच्या अभ्यासाची, सदैव केलेल्या सत्कर्माची शिदोरी आहे, गुरुंचे आशीर्वाद आहे, नाम साधनेची ताकद आणि गजानन महाराजांचे कृपाछत्र आहे..!


माझ्यात या सगळ्या गोष्टी अजून तितक्या प्रमाणात नाहीत म्हणून, असे विचार, ना मला सुचतात, ना पूर्ण करता येतात..


पण किमान आईच्या इच्छेला साथ देण्याइतकी कृतज्ञता तरी माझ्यात असायला हवी ना..?


मग काय करु या बरे.. पुन्हा विचार..


पुन्हा माझाच स्वार्थ.. 


मी आईकडे जाऊन सांगितले, "उद्या नुसतेच येऊ, पण आम्ही आलो की, तू आम्हाला तुझ्या या अध्यात्म अभ्यासाची थोडी शिदोरी दे, मार्गदर्शन कर, फक्त सांगताना गोष्टीरूप सांग कारण तुझे अवघड अवघड शब्द आम्हाला अनेकदा कळतच नाहीत."


आईची पहिली प्रतिक्रिया, "ते सगळे मी माझ्या स्वान्त सुखाय करत असते, मला मार्गदर्शन वगैरे नाही जमणार.."


मी, " नाही इतकी स्वार्थी नको होऊ नकोस, मला अनेकदा या गप्पा, हे विचार माझ्या समस्यांवर उत्तरे शोधायला मदत करतात.."


आई, " बरं मग तू कोणते तरी प्रश्न विचार, मी त्यावर बोलेन.." 


पुन्हा घरी येऊन, तिला काय बरं प्रश्न  विचारु यावर, डोकेफोड करत माझा स्वयंपाक करत होते..



त्याचवेळी (२७ मे संध्याकाळ) आईने मला नाम साधनेचा सुधामुर्ती यांनी मांडलेला, शास्त्रीय प्रमाण असलेला एक व्हिडिओ व्हॉटस् ॲपला पाठवला, जो मी २७ मे संध्याकाळी यांत्रिकपणे पाहिला होता..


तरी २८ मे सकाळीसुद्धा त्यातले विचार सारखे मनात घोळत होते, ज्यातून मला दोन प्रश्न पडले, ते घेऊन मी लगेच धावत आईकडे गेले आणि म्हणले, "हे बघ, हे दोन प्रश्न आहेत, यावर बोल संध्याकाळी.."


हो चालेल म्हणत, आईने मला मिश्र पिठापासून तयार केलेला, एकदम चविष्ट आणि पौष्टिक फुंदके नावाचा खाऊ खायला दिला.. 


असे चविष्ट अणि पौष्टिक पदार्थ बनवणे आईची खासियत आहे..


आई स्वतःचे आणि आमचेही शारीरिक स्वास्थ पहिल्यापासूनच खूप सांभाळते, कारण आपण आजारी पडलो तर इतरांना आपले सगळे करावे लागते, जे तिला नको असते, .. 


त्यात बाबांच्या आजारपणापासून अजूनच भर पडली, कारण त्यांनी स्वतःकडे केलेले दुर्लक्ष खूपच यातनामय होते.. 


त्यामुळे जे दुःख आहे, ते तसेच रहाणार असे म्हणत दिनक्रमात शक्य तितकी तटस्थ होत, आई शरीर, मन सांभाळण्यासाठी आवश्यक आहार विहार स्वतःहून सांभाळत असते, आणि वेळोवेळी आम्हालाही सांगते..


त्यामुळे नाश्ताला तो पौष्टिक खाऊ तीने बनवला होता, मला तर तो माझ्या देवाने दिलेला प्रसाद वाटला..


नंतर दुपारी ताई, नभापण आल्या, आमच्या मस्त गप्पा सुरु होत्या..


इतक्यात माझे खूप जवळचे कॉलेजचे मित्र, जे मंगळवारी भेटणार होते, त्यांनी आज संध्याकाळी येऊ का असा मेसेज केला..


मी त्यांना फोन करुन आजचे नियोजन सांगितले, आणि तुम्हाला सहभागी व्हायला आवडणार असेल तर, तिला एकदा विचारते असे म्हणले..


त्यांना असेही पूर्वीपासूनच आईबाबा दोघांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे नेहमीच आवडायचे, त्यामुळे ते आम्हाला चालेल म्हणले..


आईला विचारले तर तीही हो येऊ दे की म्हणाली..


माझे मित्र आल्यावर आधी बराच वेळ वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या, त्यात आईचा सहभाग पूर्णपणे शांत, स्वस्थ आणि पुन्हा निरपेक्ष, विरक्त होता..


मग आम्ही मिळून तो व्हिडिओ बघितला..


ज्याचा सारांश शास्त्रीय आधारे होता की, रोज फक्त पाच मिनिट निश्चित एक मंत्र, एक स्थान, एक वेळ नाम साधना केली, तर सहा महिन्यात त्याचे सामर्थ्य जाणवेल, आणि सातत्य ठेवले तर सात वर्षात सर्व शारीरिक, मानसिक व्याधीतून मुक्तता होईल.. 


त्यावर माझे प्रश्न - 

१) मला हे मान्य नाही, कारण मी असे करणाऱ्या अनेकांना अजूनही प्रश्नात बघितले आहे, असे का..?


२) मला वाटते समस्या सुटत नाहीत, त्यांना सामोरे जायची ताकद मिळते, हो ना..?


मला पुन्हा तो ऐकताना मी किती घाईत प्रश्न काढले हे जाणवले..


कारण कै. आप्पा पेंडसे यांचे उपसानेतून व्याधीमुक्ती हे अनुभवावर आधारित पुस्तक याच विचारांवर भाष्य करते..


कारण ज्यांचे प्रश्न सुटले नाही, त्यांनी सात वर्षे सातत्य ठेवले का..? एकच मंत्र, एक वेळ, एक जागा सांभाळले का..? हे मला कुठे माहित आहे.. 


पण आईने त्याही पुढचे अनेक विचार मांडले..


१) तुला जे लढण्याचे बळ मिळते, हे वाटते पूर्णतः बरोबरच आहे. 


पण त्यासोबतच


२) पूर्ण व्याधीमुक्ती होते, तेही व्याधीची तीव्रता किती, यावर अनेकदा कालावधी कमी जास्त होतो, हे आईने स्वानुभव सांगत मांडले..


जसे की, कैलास मानसरोवर सहलीत सुरु झालेले पायाचे दुखणे तीने याच साधनेच्या प्रयोगातून, काही महिन्यात बरे केले, ज्याला औषधाची विशेष जोड नव्हती..


संधिवात सुरु झाला, त्यालाही असाच मंत्र साधनेचा आधार दिला, असे एक ना अनेक अनुभव तीने सांगितले..


३) मग थोडा अजून पुढचा विचार मांडला, तो म्हणजे..


सर्व व्याधी या शरीराच्या आहेत, पण आपण म्हणजे शरीर नाही, आत्मा आहे, आणि तो निर्मळ आहे, त्याला दोषच नाहीत..


असा विचार टोकाला नेता आला की, व्याधी असतात, पण त्याने शरीराला होणारी वेदना हळूहळू कमी होत जाते, व अशी वेळ येते की वेदनेचा विसर पडतो..


आई हे सांगत होती आणि मला एकदम अभिजितच्या (माझा नवरा) अपघाताचे दिवस आठवले.. 


त्याला दवाखान्यातून घरी आल्यावर वेदनाशामक औषधे घेण्याचे दुष्परिणाम दिसायला लागले, त्यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक औषधे घ्यायला सुरुवात केली, ज्याचे परिणाम थोड्या संथ गतीने होतात..


त्याचा पाय प्रचंड दुखायचा, मग उपाय म्हणून, आम्ही दोघे दोन दोन तास येतील ती, सगळी स्तोत्र म्हणायचो, थकलो की मोबाईलवर लावायचो, मग अशी वेळ यायची की त्याला वेदनांचा विसर पडायचा व झोप लागायची..


यानंतर त्या दिवशीचा शेवटचा विचार आईने सांगितला, जो मला सर्वात जास्त महत्वाचा आहे वाटले, कारण तीने मंत्रशक्तीचे दाखवलेले ते एव्हरेस्ट शिखर होते..


ते म्हणजे..


- तुम्ही जेंव्हा पाच मिनिटे साधना करता, तेंव्हा चुकून शेजारी आग लागली तरी कळणार नाही इतके तल्लीन होता का..? (अर्थात नाही)


- रोजची ही साधना झाल्यावर ती साधना हे तूच केले आहेस, असे म्हणत ते भगवंताला अर्पण करता का..? (हे जमायला हवे)


साधनेस सत्कृतीची जोड देता का..?


- कोणतेही कारण न शोधता, मागणी न करता, फक्त सश्रद्ध भावनेने अशी साधना करू शकता का..?


- मोक्ष तर सोपा नाहीच, पण पुढचा जन्म कोणताही असो, मुखात तुझे नाम आणि नेहमी सत्कृती असे मागणे  परमेश्वराला मागता  का..?


जर हे सगळे का अजून शिल्लक आहेत तर,  तरी ती परिपूर्ण साधना होत नाही..


मग पूर्ण व्याधीमुक्ती कशी मिळेल..


आणि जेंव्हा हा कालावधी पाच मिनिटांपेक्षा हळूहळू जास्त होऊ लागेल, तेंव्हा प्रवास आधी तटस्थ आणि नंतर विरक्त होण्याकडे होईल..


एका दिवसात हा सारा अध्यात्म खाऊ पचणे, शक्य नाही म्हणून आधी मी तो जसाच्या तसा शब्दात उतरवून ठेवला आहे..


त्यालाही दोन दिवस लागले..


जितक्या वेळी मी त्याचे परत परत मंथन करेन, आईच्या ज्ञान खजिन्यातून मला थोडे थोडे सत्व मला मिळत राहील हे नक्की..


या साऱ्या नंतर मी, अभिजीत, गंधार, माझे मित्र बाहेर जेवायला गेलो, आईला विचारले ती नाही यावर एकदम ठाम, शांत, स्वस्थ  आणि प्रसन्न होती..


पु.ल. देशपांडे म्हणतात तसे, राजाला वाढदिवसाची भेट आम्ही सामान्य काय देणार..? उलटे आम्हालाच मिठाई मिळणार..


अगदी तसेच वाढदिवस आईचा होता पण वाढ तेही मनाची भावनांची मी अनुभवली..


आईचा हा अध्यात्म प्रवास उत्तरोत्तर असाच सुखकर होत राहो आणि त्याच्या छायेत माझी वाढ होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..



4 comments:

  1. एकदा वाचला .. पुन्हा वाचला .. आणि पुन्हा वाचला
    आणि खूपदा वाचणार आहे ... तरीही थोडासाच आकळणार आहे हे माहित आहे...
    मी आईला एकदाच पाहिले.. पण जेव्हा जेव्हा तुला भेटते (प्रत्यक्ष भेट क्वचितच असली तरी लिखाणातून किंवा तुझी आठवण येते तेव्हाही vibes मधून अचंबित करणाऱ्या ऊर्जा जाणवतात मला ... आणि आजच्या तुझ्या लिखाणातून त्याच्या स्रोताचे दर्शन होते आहे जे कित्ती आनंददायी आहे ..
    किती मनमोकळे पणाने तुझ्या मनातली आंदोलनेही लिहिली आहेस ... खूप मनापासून भावला आजचा तुझा लेख ...
    प्रिय आईला उत्तम आयुरारोग्याच्या मनोकामना आणि खूप खूप प्रेम ... ❣

    ReplyDelete
    Replies
    1. किती गोड प्रतिसाद देत असतेस ग

      आईला भेटणे आणि तिच्यासोबत अशा चर्चा करणे यात प्रत्येकाला खरचं खूप काही मिळू शकते.

      असे खूप जण असतात की जे आपल्या देशाच्या अध्यात्म परंपरेला मानतात व श्रध्देने त्याचा अभ्यास करुन इतरांना मार्गदर्शनही करतात..

      ♥️💜💖💞

      Delete
  2. निःशब्द.... आईला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. सोबतच आईने घेतलेला निर्णय सर्वसामान्य माणसाला झेपणारा नाही त्यासाठी तसे असामान्यत्व अंगी असले पाहिजे ...असे असामान्यत्व पेलण्याची शक्ती नक्कीच काकूंना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.. खूप छान शब्द बद्ध केल्यास भावना

    ReplyDelete
    Replies
    1. आईची शक्ती अनुभवायला तिच्यासोबत रहायला ये..
      तुला खूप काही मिळेल..
      सर्व सामान्य मी आहे, मला तिची विरक्ती स्वीकारायला आणि तिची सोबत करायला खरच खूप शक्ती हवी आहे..
      त्यासाठी तुझ्यासारख्या खूप मैत्रिणी, मित्र, गंधार, अभिजीत असतात, सतत माझ्या अवतीभोवती..

      Delete

suggestions most wlcome