Thursday, October 05, 2023

सन्मित्र



बाहेर दिवसभराच्या उकाड्यानंतर हलक्याशा पावसाची सुरेल रिमझिम सुरु झालेली..


आणि ती घरात प्रचंड उद्विग्न, अनेक शंका-कुशंकांनी व्यापलेली, नित्यक्रमाला कंटाळून गेलेली..


बाहेरचा नादमयी पाऊस निनादत होता आणि ती मात्र स्वतःच्या त्रासात हरवली होती..


त्यात पाऊस आणि ती म्हणजे छत्तीसचा आकडा..



तापलेल्या धरेवर कोसळणाऱ्या जलधारांनी मोहवून टाकणारा सुवास सर्वत्र पसरु लागला..


तशी तिची पावले अचानक घराबाहेर पडली, त्या पावलांना संरक्षणाचे कोणतेही आच्छादन नको होते..



सुरुवातीला नेहमीच्या परिचित मार्गावरुन जाताना, अनेकांना तीचे बिना चप्पल, छत्री शिवाय तेही एकटेच पावसात जाणे खटकले..


पण कुणी काही विचारले नाही, ती तर अजूनही स्वतः मधेच हरवलेली होती..


ना तिला रस्ता जाणवत होता, ना वाहने, ना आजूबाजूची माणसे, ना त्यांच्या विचित्र नजरा..

 

थोड्या वेळाने ती निर्जन, पण भीती नसलेल्या, वस्तीपासून काहीशा दूर असणाऱ्या भागात पोहचली..


ही तिची आवडती जागा, तेही एकटीने अनुभवण्याची, आनंद, दुःख, त्रागा सगळ्यात मूक सोबत करणारी..


आज प्रथमच तिच्यासोबत तिथे पाऊस होता.. 


तिला कधीही न आवडणारा पाऊस आज असा सोबती कसा झाला कोण जाणे..?


त्यातही आज तो फक्त सोबत नाही तर तिच्या अंतःकरणापर्यंत पोहचलेला..


ती नखशिखांत ओलीचिंब झाली होती..


जलबिंदूंचा तिच्या रंध्रारंध्राला होणारा स्पर्श, तिला अंतर्बाह्य बदलवून टाकत होता..


जे जलबिंदू खोलवर मुरले, त्यांनी तिच्या सुखाला,आनंदाला, यशाला शतगुणीत केले..


तर जे निथळले, त्यांनी सोबत तिचे प्रश्न, चिंता, काळजी, शंका, त्रागा सारे वाहून नेले..


काहीवेळाने पूर्वीच्या साऱ्याला कंटाळून गेलेल्या तिचा, जणू पुनर्जन्मच झाला..


ती चक्क लहान मुलाप्रमाणे नाचू लागली, गाऊ लागली..



बराच वेळ ती त्या रिमझिमत्या पाऊस सख्याला अनुभवत राहिली..


नंतर मग पाऊस थांबला.. की त्याच्या घरी परतला..?


माहित नाही, पण..


जाताना, तिला 'भेटू पुन्हा असेच कधीतरी' हे सांगायला नक्कीच विसरला नसणार..


हे तिच्यातला बदल सांगत होता..


परतीच्या वाटेवर ती सगळ्यांशी बोलली, खूप हसली..


कसे कोण जाणे, पण ना कुणी तिला भिजण्याचे कारण विचारले ना अनवाणी असण्याचे..


प्रत्येकाची नजर फक्त तिच्यात झालेला बदल टिपण्यात गुंगली होती..


कारणे माहित नसली तरी सगळ्यांना तो बदल सुखावणारा आणि हवाहवासा होता, हे मात्र नक्की..


आणि इतक्या दिवस नावडता असणारा पाऊस, आता तिचा  सन्मित्र झाला होता..



2 comments:

  1. मस्तच ग... त्या पावसा सोबत तिने काय गप्पा मारल्या आणि त्यात तिचे कोणते दुःख, चिंता वाहून गेले याचे विचार करण्याचे स्वातंत्र्य वाचणाऱ्या प्रत्येकाला आहे यामुळे कथा जास्त आवडली 👌✨

    ReplyDelete
  2. छान अभिव्यक्ती! पाऊस ध्यान, आत्मभान रूपाने तिला भेटला. तिच्यात भिनला, आणि मुरलेल्या विविध विषांना (toxins) धुवून घेऊन गेला. इति गंगार्पण मस्तु

    ReplyDelete

suggestions most wlcome