Sunday, September 29, 2024

नाव हीच ओळख


 

दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रविवार..

नावात काय..? 

शेक्सपियरच्या या प्रश्नाचे चोख उत्तर, आज  सापडले, तेही त्याच्या लेखणीने समृध्द झालेल्या एका वेगळ्याच रंगमंचावर..

रंगमंच म्हणले, सगळ्यात आधी मला दिसते ते म्हणजे नाटक, मग त्याची शेपूट धरून येतात, आवडत्या नाटकाच्या न जुळणाऱ्या तारखा, वेळा, तिकिटाच्या रकमा.. खूप काही..

हे कमी म्हणून की काय, लहान मुलांसोबत मनसोक्त बागडणाऱ्या माझे दुसरे दुःख की मुलांचे निखळ मनोरंजन व्हावे, अशी १२ महिने..७ दिवस.. चोवीस तास याच्या गणितात नसणारी बालनाट्ये..

मग कसे बरे तयार होणार उद्याचे दर्दी प्रेक्षक..? प्रश्न माझा मलाच..

पण.. पण.. पण... 

या साऱ्याला पुरती टांग दिली, ती आजच्या कहानी घर नावाच्या नाट्य संस्था आणि नाटक १० बाय २० सादरीकरण पध्यातीने..

आणि इथेच तर सापडले ना, नावात काय..? या प्रश्नाचे उत्तर..

की

नावातच आहे ना सगळं..

या नावात आहे की, ही नाटक प्रेमी मंडळी, कहानी म्हणजेच गोष्ट सादर करतात..🤔😮

गडबड नको समजून घेण्यात, नाटक नाही, गोष्ट आणि ती ही साधारण १५ ते २० ओळींची..

तेही फक्त आणि फक्त लहान मुलांची, आणि त्याचे सादरीकरण करण्याची पद्धत म्हणजे नाटक १० बाय २०..

मुलांचे निखळ मनोरंजन व्हावे, अशी इच्छा असणारी १२ महिने..७ दिवस.. चोवीस तास म्हणाल तिथे येणारे हे गुणी कलाकार आहेत..

आजपर्यंत मोठ्या मोठ्या संहिता आणि त्यावरची नाटके खूप अनुभवली असतील पण हे काहीतरी नवे आहे की नाही..?

आणि म्हणूनच त्याचे नाव कहानी घर.. 

जिथे गोष्टी रहातात, घर जे सुरक्षित असते, जिथे आपलेपणा असतो, जे आपल्याला आपले अस्तित्त्व शोधायला मदत करते, अजून खूप काही असणारे ते घर..

अजून नाव पूर्ण कुठे झाले..😇

राहिले ते, १० बाय २०0 एवढीच जागा, यात काय बरे म्हणायचे..?

अहो यात असे सांगायचे आहे की हे घर, फार काही मोठे, प्रशस्त, राजवाडा वजा बंगला असे नाही..

 या नाटक वेड्या(चांगल्या अर्थी.. उगाच नंतर गदारोळ नको) मंडळींना हे गोष्टीचे नाटक सादर करायला १०×२० इतकी जागा हवी असते..

अजूनही संपले नाही बरं..

आधी म्हणले तसे, गोष्ट जरी लहान मुलांची असली तरी, नव्वदीच्या आजी आजोबांनी पुन्हा आपल्या बालपणात घेऊन जाण्याची ताकद सादरीकरणात आहे..

वय, अनुभव, परिपक्वता याच्या शिदोरीवर प्रत्येकाला त्यातून किती, आणि काय गवसलेस, हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे..

त्यामुळे संधी मिळाली तर, कहानी घर १०×२० यांच्या सादरीकरणाचा नक्की अनुभव घ्या..

नव्हे.., मी तर हट्टाने सांगेन, फार कमी मानधनावर ही मंडळी खूप धडपड करत आहेत..

तुम्ही त्यांना, तुमच्या घराच्या (वाढदिवस, मुंज, संगीत, साठीशांत..खूप काही) सोसायटीच्या, शाळेच्या, संस्थेच्या कार्यक्रमांना हा १०×२० रंगमंच नक्की उपलब्ध करून द्या..

आज मी स्वतः दोन भन्नाट अनुभव घेतले..

एका गोष्टीचे नाटक आणि दुसरे मूकनाट्य..



पण त्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात..

वाचणार ना तोही..

तुमच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद मला लिहायला टॉनिक देतो, त्यामुळे त्यावेळी हात आखडता घेऊ नका..

प्रतिक्षेत.. तुमची अभिगंधशाली..


2 comments:

  1. भन्नाट..
    आणि पुढची उत्सुकता वाढवणार लेख..

    ReplyDelete
  2. छान वेगळाच प्रयोग. शुभेच्छा

    ReplyDelete

suggestions most wlcome