Wednesday, October 02, 2024

हिरवा = समृध्दी

🌳🌱🌿🐍🌴🌵🌱🍀💚🍏🍐🌲


या देवी सर्व भुतेषु हरित रंगेन संस्थिता |

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||

देवी आज तू हरित म्हणजेच हिरवा रंग धारण करुन ये.

हिरवा रंग आहे  समृद्धीचा, भरभराटीचा, नवं चैतन्याचा..



या रंगाने जेव्हा धरती माता सजते, तेव्हा तीचे साजिरे रुप मनाला उल्हसित करते. आनंदाने डोलणारी कोवळी पिके उद्याचा दिवस भरपूर धान्य घेऊन येण्याचे स्वप्न दाखवतात. वृक्ष वेली प्राणवायूची लयलूट करतात..

का कोण जाणे हे सगळे माहिती असूनही आम्ही या रंगावर अस्त्रे चालवतो. सिमेंटचे जंगल  सोय म्हणत, काळ्या रस्त्यांचे जाळे विणतो. हे सगळे करताना या साऱ्याचा समतोल राखण्याचे भानच हरवत आहोत. यामुळे आमुचे भविष्य धोक्यात येत आहे..

हे माते, आपल्या लेकराला माफ करुन या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी हा रंग धारण करुन ये. तुझ्या या रुपाची काळजी घेण्याची बुद्धी आम्हाला दे.. !

या रंगाची उपासना आमच्याकडून सदैव व्हावी यासाठी प्रेरणा दे..



या देवी सर्व भुतेषु धान्य रुपेण संस्थिता |

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||

तू अन्नधान्य रुपात वास्तव्यास ये..अन्नधान्य म्हणजे तुझे अन्नपूर्णा..

तुझे हे रुप तर चराचरात भरुन राहिले आहे, मग का बरं पुन्हा याचे आवाहन....

माते मला तुझ्या कृपेने पोटभर नाहीतर त्याहूनही खूप जास्त अन्न धान्य आज मिळत आहे,पण या भूतलावर अनेक प्राणीमात्र अर्धपोटी आहेत त्यांच्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्यासाठी मला बळ देण्यासाठी ये..

तुझ्या या रुपाचा अवमान अनेकदा होताना दिसतो. अन्न वाया जाते, त्यात भेसळ केली जाते, आवड-नावड सांगितली जाते, या गोष्टी थांबवण्यासाठी ये..

पाककर्ता सुखी भव !

या उक्तीचा आज विसर पडताना दिसत आहे. जेवण बनविणाऱ्याचे कष्ट, प्रेम यांची जाणीव पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी ये.

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म |

याचे सदैव भान मला राहावे हा आशीर्वाद देण्यासाठी ये..

🌳🌲🌱🌿🐍🐸🌵💚🍏🍐🌲🌳

प्रतिसाद, प्रतिक्रिया, सूचना याच पुढील लेखनासाठी प्रेरणा..

त्यामुळे त्याच्या प्रतिक्षेत  तुमचीच, अभिगंधशाली..


1 comment:

  1. chan vichar. ardh poti rahnarya pranyasathi kay upay karata yetil he pan suchav.

    ReplyDelete

suggestions most wlcome