दिवाळीच्या पाच - सहा दिवसांचे गणित दरवर्षी वेगळे असते, हे साऱ्याच सणाना लागू होते..
तिथीनुसार चालणारे आपले मास यात लय वृद्धी याची गंमतच वेगळी आहे..
काहीवेळा दोन दिवस (नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन, पाडवा - भाऊबीज) एकत्र येतात, तर काहीवेळा सगळे दिवस स्वतंत्र येतात..
आणि त्यातही गंमत म्हणजे मधेच एक मोकळा दिवस येतो, त्याला म्हणतात, भाकड दिवस..
भाकड म्हणजे निरर्थक , निरुपयोगी , निष्फळ..
त्यावरूनच आल्या, त्या भाकड कथा..
भाकड या शब्दातच इतकी मजा आहे, की अर्थ न कळून सुद्धा लहानपणी, एखादा तरी भाकड दिवस यावा असे वाटायचे..
दिवाळी आहे मग पहाटे उठणे, घाईने आवरणे, सडा रांगोळी या सगळ्याला या भाकड दिवशी सुटी मिळायची, शिवाय दिवाळीचे दिवस वाढायचे..
एकमेकांकडे जायला, दंगा मस्ती करायला हा जास्तीचा दिवस मिळायचा..
त्यामुळे आता मोठे झाल्यावरही असा मोकळा, जास्तीचा दिवस हवा याचे आकर्षण आहेच..
आज उगाच त्याच्या नावाचा, अर्थाचा नव्याने विचार करायला लागल्यावर, काही वेगळीच गणिते मनाने मांडली..
निरर्थक , निरुपयोगी , निष्फळ, मोकळा, उनाड असणारा हा दिवस भर दिवाळीत हवा असतो..
म्हणजेच खूप आनंदात, सुखात ही आपल्याला विश्रांती हवी असते..
त्यातही थोडी निरर्थकता, निरुपयोगी , निष्फळता हवी असते..
तर मग एरवी देखील तात्पुरती, कोणतेही, कुणाचेही नुकसान न करणारी निष्क्रियता, विश्रांती, याचा त्रास का बरं करायचा..
रोजच्या धावपळीत, ऊर फुटेपर्यंत धावताना, सतत कार्यरत रहाणे, सगळं उत्तम, योग्य असणे यालाही थोडया भाकडपणाची सूट नको का द्यायला..
आपणच अधून मधून स्वतःला माफ करून, लुटुपुटुची का होईना, थोडी निरर्थकता, निरुपयोगीता, निष्फळता शोधायला हवी ना..
तरच पुन्हा नव्या जोमाने धावता येईल..
कदाचित हे सगळं नव्याने समजून घ्यायलाच , यावर्षी २०२४ च्या दिवाळीत आज बुधवार भाकड दिवस आला..
सर्वांना या मस्त, निवांत, मोकळ्या, काहीशा फसव्या दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
म्हणणे पटले असेल, तर स्वतःहून स्वतःचे भाकड दिवस शोधायला विसरू नका..
आणि हो सापडले, मिळवले की, मला सांगायला विसरू नका..
मस्त ग सखी ..... प्रत्येक वेळेला कॅलेंडर असा भाकड दिवस देईलच असे नाही कधी कधी आहे त्या दिवसाला भाकड करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे.... शिकते आहे अजून असे कामाच्या दिवसाला भाकड दिवसात रूपांतरित करायला... मार्गदर्शन अपेक्षित 😀
ReplyDeleteमाझी आठवण काढ, की मी येतेच मिळून करू भाकड दिवस..
Deleteविश्रांती, ही उत्साहाच्या विरुद्ध भावना आहे आणि दोन्ही मिळून आपल्याला संतुलित करतात..
छानच
ReplyDelete