Saturday, November 23, 2024

स्नेहसंमेलन


किती ते गोड नाव, ज्या नावाची सुरुवात स्नेह म्हणजे आपुलकी, माया, प्रेम याने होते, आणि संमेलन म्हणजे अतिशय नियोजनपूर्वक एकत्र येणे..


इतका सुंदर विचार, फक्त एक दिवसाचा आनंद वा सोहळा कसा असेल..?


बरं हे नाव, साऱ्या जगाला आकर्षित करणाऱ्या, माझ्या प्रिय आसिंधू सिंधू संस्कृती, म्हणजे अखंड हिंदुस्थानच्या पुरातन शिक्षण संस्कृतीशी एकरूप असे आहे..


शिक्षणात अविभाज्य असणाऱ्या या उपक्रमात मला अतिशय सूक्ष्म नियोजन करून, स्नेह वाढविण्याच्या उद्देशाने एकत्र यायचे हा विचार सापडतो..


हे काही इतके सहज सोपे नाही, त्यामुळे त्याला अजून एक तितक्याच अर्थपूर्ण शब्दाची जोड दिली, तो म्हणजे वार्षिक..


ज्यातून स्नेह वृद्धिंगत होईल अशी प्रक्रिया शैक्षणिक वर्षात किमान एकदा तरी व्हायला हवी..


आमच्यावर राज्य करायच्या कपटाने आलेले ब्रिटिश, ज्यांनी घाला घातला ते शिक्षण व्यवस्थेवर, कारण ही शिक्षण व्यवस्थाच तर या विश्वाला दिशादर्शक होती..


त्यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनाचे रूपांतर केले, अन्युअल गॅदरिंग, ज्यामुळे वर्षातून एकदा जमायचे ठरले, पण त्याचा मूळ उद्देश हरवला, स्नेह विसरला, एकत्र या पण त्याला नियोजन नसले तरी चालेल, शिस्त नसली तरी चालेल, आचार आणि विचार दोन्ही खुंटीला टांगले..


हे मांडत आहे, कारण सध्या हीच दुर्दशा या इंग्रजळालेल्या शाळांच्या अन्युअल गॅदरिंग मध्ये बघायला मिळते..


ज्यात शिक्षक - शिक्षकांमध्ये कोण अधिक उत्तम याची स्पर्धा जुंपते, हिंदी चित्रपटाने त्या ठराविक काळात कुप्रसिद्ध केलेल्या अर्थहीन, अनेकदा भाषेत नकोच असणारे शब्द विपुलतेने असलेल्या गाण्यांवर विद्यार्थी मंडळी थिरकतात..


रंगमंचावर पाय ठेवतानाही ठरलेल्या अनेक गोष्टीत बदल, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या नादात केले जातात..


खूप काही चुकीचे घडताना दिसत असते..


हे सारे बघणाऱ्या प्रत्येकाला जाणवते, पण तरीही मनाच्या कोपऱ्यात असणारे माऊली प्रेम, यातूनही काहीतरी शिकायला मिळाले असेल, असे वाटणारी बापाची माया त्यावेळी कौतुक करते..


आता असे वाटेल, नेमके सांगायचे तरी काय..


सांगायचे इतकेच, की नोव्हेंबर महिना संपत आला आहे, आता सगळ्या शाळांमध्ये वर्षातून नव्हे, दोन वर्षातून एकदा येणाऱ्या, या स्नेहसंमेलन उपक्रमाचे वेध लागतील..


तयारीचे शिंग फुंकले जाईल, अनुभवी मंडळी कंबर कसतील आणि अनेक उद्दिष्टे मनी स्मरून त्यांच्या पूर्तीस कटिबद्ध होतील..


त्यांना कळकळीचे आवाहन..


स्नेहसंमेलन ही एक प्रक्रिया आहे, ज्यात एक उत्तम विचार समोर ठेवून, अनेक योग्यच आचार सोबत घ्यायला हवे.. 


किमान पंधरा दिवस ते कमाल महिनाभर या उपक्रमाव्दारे, अनौपाचारिक अध्ययन अध्यापन चालू असते..


यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही एकमेकांकडून खूप काही शिकत असतात..


प्रत्येकाला स्वतःमधले गुण नव्याने उमगतात, तर कधी त्रुटी लक्षात येऊन त्यावर मात करण्याची संधी मिळते..


रंगमंच हे दृश्य स्वरूप असले, तरी आधी आणि नंतर अनेक गोष्टी घडतात, त्यात शाळेतील प्रत्येकाचे हातभार लागतात..


या साऱ्यातून एकमेकांविषयी तयार होतो, तो स्नेह मिळवायला हवा, आणि त्याचे संमेलन घडायला हवे..

त्यासाठी या प्रक्रियेत आधी आपल्या कल्पनांना आकार देणाऱ्या विद्यार्थ्यांशी गप्पा रंगायला हव्या, त्यांना नेमके काय करायला आवडेल याची खात्री करून घ्यायला लागेल..


जसे आपल्या आईला मुलांविषयी बारीक सारीक चांगले वाईट गोष्टींची माहिती असते, अगदी तशीच माहिती वर्गशिक्षकांना जमवावी लागेल..


त्यातून नाट्य, नृत्य, वादन, गायन, सूत्रसंचालन, लेखन, संगीत अशा विविध जबाबदाऱ्या चिमुकल्यांना देता येतील..


बाबा म्हणजे भक्कम आधार, अर्थकारणाची भिस्त अशी जबाबदारी घेईल संस्था, उत्तम गोष्टी घडताना पैसा योग्यप्रकारे उपलब्ध होईल पण त्याचा अपव्यय होणार नाही हे सांभाळले जाईल..

मुलांचे गुण ओळखून तशी संधी देताना, शाळा ही नुसती इमारत नाही..


हे विद्यालय (विद्या +आलाय) म्हणजे श्री गणेश, देवी सरस्वती यांचे विश्रामाचे स्थान आहे, हे जबाबदारीने पेलावे लागेल..


निवडलेली गाणी ही शब्द, अर्थ, गर्भित अर्थ या साऱ्यांनी मुलांना नवीन क्षितिजे दाखविणारी असतील, त्यांच्या कोवळ्या मनाला जपतील, त्यांच्या निरागस भावनांना जोजावतील, अशाच गाण्यांचा आग्रह धरावा लागेल..


सध्या मनाला बिघडवणारे आंतरजाल, भ्रमणध्वनी, समाज माध्यमे यांनी अस्वस्थ केलेली रिल, अश्लील गाणी, मांडणी याचे कितीही आकर्षण वाटले तरी त्यापासून दूर रहावे लागेल..


थोडक्यात काय, तर स्नेहसंमेलन हा एक दिवसाचा झगमगाटाचा सावळा गोंधळ नाही..


स्नेहसंमेलन साऱ्या विद्यालयाला अंतर्बाह्य बदलवून टाकणारी प्रक्रिया आहे..


मला स्वतःला माझ्या शालेय प्रवासात अनुभवलेली, एक न् एक स्नेहसंमेलन तेही त्यात मी नव्याने काय शिकले, घडले या सह आठवतात..


आणि तितकीच मी शिक्षिका झाल्यावर, स्वतः बसवलेली देखील स्मरतात..


दोन्हीत कमालीची मजा, आनंद आणि सगळ्यात महत्त्वाची जडण घडण प्रक्रिया होती हे नक्की..


समारोप करताना,


चिऊ काऊची नको, राजा राणीची नको..

गोष्ट सांग आई,मला रामाची, 

वेळ झाली, आता माझ्या झोपेची..


या अंगाईच्या चालीवर म्हणावेसे वाटते..


रीलची गाणी, गोष्ट नको, कुणाशी स्पर्धा नको..

संधी हवी एक घडण्याची, वेळ झाल स्नेहसंमेलनाची..


येणाऱ्या स्नेहसंमेलनात शिक्षक, विद्यार्थी, संस्था, व्यवस्था सर्वार्थाने उत्तम बी घडण्याची संधी प्रत्येकाला मिळो याच सदिच्छा व्यक्त करून आजचे पुराण थांबवते..

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


मी अनुभवलेली ..




शिक्षिका म्हणून बसवलेली काही..
















1 comment:

suggestions most wlcome