Saturday, February 15, 2025

इंट्रा स्कूल

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन

स्पर्धा म्हणजे सहभाग, चढाओढ, चुरस, जिंकण्याची जिद्द, हार पचवण्याची खिलाडू वृत्ती या अगदी सहज लक्षात येणार गोष्टी..


पण अधिक सजगपणे याकडे पाहिले तर स्वतःला शोधण्याची संधी..


या स्पर्धेची ओळख आपल्याला अगदी पाळण्यात होते..


हसून दाखव, बाबा म्हण, चालून दाखव, यातूनच मूल स्वतःला शोधत राहते..


नव्या गोष्टी शिकत जाते, सरावाने त्यात पारंगत बनते..


याची पुढची पायरी ठरते ती शाळा, इथे स्वतः सोबत मित्रांसोबत स्पर्धा असते..


त्यामुळे अर्थातच त्यात कधी जीत तर कधी हार होणार हे ओघाने येते..


पण त्यातूनच खरे जीवन शिक्षण घडते, अशा स्पर्धा प्रत्येकाला अधिक सक्षम, क्रियाशील, सर्जनशील बनवतात..


त्यामुळे निखळ आनंद, प्रोत्साहन, नावीन्य, कृतिशील स्पर्धा असायला हव्या..


अशा उत्तम नियोजनपूर्वक, वयानुरूप, विविध कला समाविष्ट असणारा शालांतर्गत स्पर्धा सप्ताह, 

मी गेली पाच वर्ष आमच्या सिटी प्राईड शाळा निगडी येथे अनुभवत आहे..


त्याविषयी हा लेखन प्रपंच 

(थोडक्यात मांडणी अवघड आहे)

इंट्रा स्कूल कॉम्पिटीशन नावाने ओळखला जाणारा हा आठवडा, माध्यमिक विभागासाठी प्रथम आणि प्राथमिक विभागात द्वितीय सत्रात साजरा होतो..


स्पर्धा


प्रत्येक इयत्तेसाठी गायन, वादन, नृत्य, हस्तकला, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा अशा दरवर्षी वेगवेगळ्या  पाच वैयक्तिक..


आणि पूर्ण वर्गासाठी समूह गायन किंवा क्लास कर्निव्हल असा भरगच्च संधीचा पेटारा मुलांसाठी सज्ज असतो..


याचा मुख्य उद्देश वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या तरी एका स्पर्धेत सहभाग नोंदवावा, विविध विषयावर आधारित या स्पर्धांमधून मुलांना स्वतःमधील गुण शोधण्याची संधी मिळावी..


सोबतच गटाने काम करणे, माझा वर्ग, मिळून सादरीकरण यातून समूह भावना तयार होण्यास मदत मिळावी..

 

निवड प्रक्रिया 


यासाठी गेल्यावर्षी पर्यंत छापील पत्रकाद्वारे या स्पर्धांची सविस्तर माहिती पालकांपर्यंत दिली जायची, त्यातून ते आपल्या मुलांशी चर्चा करून एका स्पर्धेत सहभाग नोंदवायचे, यावर्षी पासून गुगल फॉर्मच्या मदतीने मुलांनी स्पर्धेची निवड ठरवली..


उद्घाटन सोहळा 


आठवडाभर चालणारा हा उपक्रम असल्याने त्याची सुरुवातही तशीच उत्साहात, दणक्यात व्हायला हवी म्हणूनच दरवर्षी याचे नावीन्यपूर्ण नियोजन केले जाते..


सोबतच दररोज त्यादिवशीच्या स्पर्धा, त्याचे स्थळ, वेळ ही सविस्तर माहिती परिपाठामध्ये (असेम्ब्ली) दिली जाते, शिवाय शिक्षक खोली, सूचना फलक यावर लेखी नियोजन उपलब्ध असते, आता कालानुरूप त्याच्या पीडीएफ गटावर देखील पाठवल्या जातात..


प्रत्यक्ष स्पर्धा


प्राथमिक विभाग म्हणजे पहिली ते पाचवी म्हणजे पाच वर्ग गुणिले त्यांच्या प्रत्येकी पाच म्हणजे २५ आणि वर्गाच्या पाच म्हणजे सगळ्या मिळून एकूण ३० स्पर्धा सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात संपन्न होतात..


सकाळी साडेआठ ते तीन या वेळात या ३० स्पर्धांचे आयोजन हा एक वेगळाच धामधुमीचा विषय असतो..


स्पर्धेच्या स्वरूपानुसार छोटे किंवा मोठे सभागृह, त्या इयत्तेचे वर्ग, शाळेतील इतर जागा जसे बेसमेंट, कॉरिडॉर इत्यादी विविध ठिकाणी एका वेळी साधारण चार ते पाच स्पर्धा समांतरपणे सुरू असतात..







स्पर्धा समिती


पूर्ण आठवडा चालणाऱ्या या उपक्रमासाठी शिक्षकांचा एक गट- समिती, इंट्रा स्कूल कमिटी या साऱ्याचे आयोजन नियोजन करते..


पाचही वर्ष या गटाचा सदस्य म्हणून माझे खूप छान अनुभव शिक्षण झाले..


मुलांनी आपल्या आवडीची स्पर्धा निवडल्यानंतर त्यानुसार याद्या तयार होतात, प्रत्येक स्पर्धेसाठी योग्य जागा, वेळ ठरते..


स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षक (त्या स्पर्धेत सहभागी नसणारे विद्यार्थी), पालकांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन, परिक्षणासाठीचे निकष, परिक्षक, त्यांचा सत्कार, चहापान ही व्यवस्था होते..


त्यानंतर प्रत्येक स्पर्धेचा निकाल, बक्षीस पात्र चषक, प्रशस्तिपत्रकांचे  लेखन इत्यादी अनेक कामे असतात..


अशा खूप साऱ्या गोष्टी, जबाबदाऱ्या या स्पर्धांच्या आधी आणि नंतर ही कमिटी समर्थपणे सांभाळते, सोबत शाळेतील नित्य कामे, वैयक्तिक कौटुंबिक कर्तव्ये यालाही योग्य न्याय देत असते..


या समितीच्या प्रमुख शीतल सावंत या उत्तमपणे, आपल्या शिलेदारांसह गेली अनेक वर्षे ही जबाबदारी एक हाती सांभाळत आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक, अभिनंदन आणि पुढेही असेच काम करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..


परिक्षक


स्पर्धा म्हणली की त्याचे परीक्षण करण्यासाठी योग्य परिक्षक हवे..


हे निवडताना त्या विषयाची आवड, प्राविण्य, अनुभव याचा विचार करून तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले जाते..


याशिवाय विषयाशी संबंधित पालकांचीही यासाठी निवड केली जाते..


यानिमित्ताने इतर शाळा संस्था या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती शाळेत भेट देतात आपले अनुभव मुलांना सांगतात, त्यांना प्रोत्साहित करतात..


अनेकदा अटीतटीची स्पर्धा, त्यातून मोजके क्रमांक निवडायचे यासाठी परीक्षकांची परिक्षा असते..


हे सारे अनुभव सर्वांनाच अधिक समृद्ध करतात..


बक्षीस समारंभ


समारोपाकडे येताना ज्या उत्साहाने सुरुवात झाली तितक्याच जोशात दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतो..


कोणीतरी जिंकते कोणालातरी हार पचवावी लागते या साऱ्यातून उद्याच्या धकाधकीच्या जीवन स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे नकळत अनुभव शिक्षण होत असते..


या स्पर्धेच्या नियोजन गटात सहभागी होऊन स्वतःला अनेक प्रकारे नव्याने प्रशिक्षित करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते..


अशा निखळ, निकोप स्पर्धा प्रत्येक शाळेमध्ये असल्या पाहिजेत असे मनापासून सुचवते आणि थांबते..


2 comments:

  1. खरंच निकोप स्पर्धेने निखळ आनंद मिळतो.

    ReplyDelete

suggestions most wlcome