Wednesday, February 11, 2026

वृत्तीघडण


आज दास नवमी, आजची लेखन सेवा.. रामदासांच्या चरणी 🙏🏻🙏🏻

ज्यांचा राष्ट्रसंत म्हणून गौरव झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून जे सर्वज्ञात आहेत.. 

सावधान हे शब्द ऐकताच बोहल्यावरून पाय उतार केला, पण संसार कसा करावा, हे ज्यांनी मांडले अशा थोर व्यक्ती विषयी लिहिण्याची माझी नक्कीच पात्रता नाही..

पण त्यांच्या दासबोध ग्रंथातून निवडक वचनांची संकलित १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे ही लहानपणी शाळेत असताना सक्तीने पाठ केली..

पुढे जाऊन त्यातील लयबद्धता, एकत्रित म्हणण्याची गंमत यामुळे अधिक आवडू लागली..

जेंव्हा त्यामागील अर्थ उमजू लागला, तेंव्हा नकळत आपली कृतीही अशीच असायला हवी, असे वाटून तसा प्रयत्न होऊ लागला..

मग या प्रयत्नांची सवय होऊन, ती वृत्ती आणि मग उत्तम वागण्याची तत्त्वे बनली..

आज हे सांगण्याचे कारण म्हणजे बहुतांश शाळा या, फक्त पुस्तकी अभ्यासक्रमामागे धावताना दिसतात..

आपल्या संस्कृतीची पाळेमुळे कुठे आहेत, हे अचूक हेरून त्यावर घाव घालणारे इंग्रज १९४७ ला भारतातून निघून गेले..

पण त्यांनी शिक्षणाची केलेली वाताहात आजही तशीच आहे..

आजची मुले भोग विलासी, स्वतःमधे  रमणारी, अंधानुकरण करणारी बनली आहेत, हे म्हणताना शिक्षक, पालक म्हणून आपण सजग आहोत का..?

उत्तम फळे देणारा कल्पवृक्ष हवा, तर तसे बीज आपण पेरत आहोत का..?

जे बीज वाढायला, तशी कृती आपल्या आई, वडील, शिक्षक यांच्या कृतीत त्यांना बघायला मिळते आहे का..?

असे अनेक का जेंव्हा उभे राहतात, तेंव्हा मी अशी का नाही बनले, हा उलटा प्रवास केला की आठवते..

घर, शाळा दोन्ही ठिकाणी असे श्लोक, स्तोत्र यांचे नित्य पठण व्हायचे, त्यातूनच एक विचारधारा तयार होत गेली.. 

तशीच कृती आईबाबा सहज करतात, त्याचे अनन्वित फायदे आणि आशीर्वाद असतात, हे अनुभवातून समजल्याने, एक चांगला माणूस होण्यासाठी नित्य धडपड चालू असते..

मुद्दाम चालू असते असे म्हटले, कारण कलियुगात सूर आणि असूर एकाच देहात राहणार हे कटुसत्य आहे..

आणि नरदेहाचे षडरिपू यामुळे अनावधानाने चूक होऊच शकते..

पण होऊ नये हा प्रयत्न असतो, आणि त्यासाठी सद्वैव आशीर्वाद देणारी ही समर्थांची उत्तम पुरुष लक्षणे, तुम्ही वाचावी, समजून घ्यावीत..

जमल्यास त्यानुसार मार्गक्रम करावा असे सुचवते..

शाळा मराठी माझी.. शाळा मराठी..

 या सध्या सगळ्यांना मोहित करणाऱ्या गीताचे शब्द थोडे अधिक अर्थपूर्ण करत..

शाळा सद् विचारी माझी.. शाळा सद् विचारी ..

असे अभिमानाने म्हणत, ज्ञानाची भूक लागावी हा विचार देणाऱ्या माझ्या ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, आणि ही वचने शाब्दिक नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीत आणता येतात हे दाखवणारे माझे आई बाबा, अनेक शिक्षक यांना मनापासून साष्टांग प्रणाम करते..

असे शिक्षण सर्वांना लाभो, ही प्रार्थना करते..


मी शिकलेली १८ श्लोकी उत्तम पुरुष लक्षणे..


आपण यथेच्छ जेवणे, उरले ते अन्न वाटणे |

परंतु वाया दवडणे, हा धर्म नोहे || १ || 


तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचि ज्ञान जनास सांगावे |

तरतेने बुडो नेदावे, बुडतयासि || २ ||


उत्तम गुण स्वये घ्यावे, तेची बहुतास सांगावे |

वर्तल्यावीण बोलावे, ते शब्द मिथ्या || ३||


स्नानसंध्या देवार्चन,एकाग्र करावे जपध्यान |

हरिकथा निरूपण, केले पाहिजे || ४||


शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे |

उणे पडो नेदावे, कोणी येकांसी ||५ ||


आडले जा कसले जाणावे, यथानुशक्ती कामास यावे |

मृदूवचने बोलत जावे, कोणी येकांसी || ६||


दुसऱ्याच्या दुःख दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे |

प्राणीमात्रास मिळवून घ्यावे, बऱ्या शब्दे || ७||


बहुतांंचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे |

आपल्या परीस व्हावे, पारखे जन ||८ ||


दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारचि वर्तावे |

लोकांस परिक्षीत जावे, नाना प्रकारे|| ९||


 नेमकेच बोलावे, तत्काळचि प्रतिवचन द्यावे |

कदापि रागास न यावे, क्षमारूपे || १०||


 आळस अवघाची दवडावा, यत्न उदंडची करावा |

शब्द मत्सर न करावा कोणी येकांचा || ११||


उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा |

सावधपणे करीत जावा, संसार आपला || १२||


मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तिसी सादर व्हावे |

मरून कीर्तीस उरावे, येणे प्रकारे || १३||


ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष |

जयाच्या भजनी जगदीश, तृप्त होय || १४||


 उत्तम गुणे शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला |

तोचि एक जाणावा खरा, भू-मंडळी || १५||


 पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते |

तरी मग कर्कश बोलावे, ते काय निमित्ते || १६||


आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांस सुखी करावे |

परंतु कष्टी करावे, ही राक्षसी क्रिया || १७||


जो उत्तम गुणी शोभला, तोचि महापुरुष भला |

कित्येक लोग तयाला, शोधीत फिरती || १८||


याचे अनुभव आधारीत, गोष्टीरूप अर्थ विश्लेषण करायला जरूर आवडेल, पण ते अर्थात समोरासमोर..


समर्थ रामदास स्वामींच्या वचनांची शिदोरी जशी मला लाभली, तशी सर्वांना लाभो हीच श्री राम चरणी प्रार्थना करते आणि थांबते..

1 comment:

suggestions most wlcome