सौम्या एक छोटुकली.
घरात शेंडेफळ त्यामुळे सगळ्यांची लाडकी.
आज स्वारी भलतीच खुशीत होती.
शाळेत नुसती धमाल आली होती. काहीच अभ्यास झाला नव्हता.
आजचा पूर्ण दिवस राखी पौर्णिमेची तयारी करण्यासाठी गेला होता.
ताईंनी छान राखीचे चित्र शिकवून मस्त राखी आणि भेटकार्ड बनवून घेतले होते.
कधी एकदा राखी पौर्णिमा येते, आणि दादाला राखी बांधते असे तिला झाले होते.
स्वतः बनवलेली राखी, भेटकार्ड घरात, शेजारी सगळ्यांना दाखवून, मिरवून झाले होते.
दादाचे कॉलेज मुंबईला असल्यामुळे, तो तिकडेच राहायचा, आणि फक्त रविवारी घरी यायचा.
तसा तो राखीपौर्णिमेला येणार होता, पण अचानक संध्याकाळी त्याचा फोन आला.
बाईसाहेब एकदम फुगून बसल्या. नंतर रडायला लागल्या ते बघून आई म्हणाली,
आई :- काय झालं ताईबाईंना ? दिवसभर इतक्या आनंदाने नाचत होत्या आणि आता का रडू येतंय?
सौम्या :- रडू तर येणारच ना, मी इतकी छान राखी बनवली. भेटकार्ड बनवलं आणि दादा काय तर म्हणे तर प्रोजेक्ट सबमिशन आहे म्हणून येणारच नाही. आता मी कुणाला बांधू राखी ?
आई :- अगं बाई..असं आहे का? बरोबरच आहे तुझं. दादाने अस का बरं केलं? चल आत्ता फोन करु आणि सांगू त्याला उदयाच्या उदया घरी ये.
सौम्या :- काही नको. मला माहितीये प्रोजेक्ट वेळेवर नाही केला की खूप रागावतात. मी बघते ना शाळेत. पण त्याच्या टीचरनी तरी असे का करायचे ?
आई :- हो ना अगदी खरं पण काय करणार? आपण एक काम करु या. राखी आणि भेटकार्डाचा फोटो दादाला व्हाट्स अँप करु या आणि व्हिडिओ कॉल पण करु या.
सौम्या :- हम्म दुसरा करणार तरी काय?
आई :- आपल्याला अजून गंमत करता येईल पण त्यासाठी तू आधी सांग, तू दादाला राखी का बरं बांधते?
सौम्या :- कारण तो माझा भाऊ आहे. मला खूप आवडतो. मला खाऊ, खेळणी देतो. माझ्या बरोबर खेळतो. मला फिरायला नेतो. माझे लाड करतो आणि माझी काळजी घेतो.
आई :- बापरे किती ते दादाच कौतुक. आता सांग असेच तुझे लाड अजून कोण कोण करतात? तुझी काळजी कोण घेतात? अजून कोण कोण आवडतात तुला?
तू त्यांनाही राखी बांधूच शकतेस.
(जरा विचार करुन )
सौम्या :- मस्त आहे आयडिया. आपल्या सोसायटीचे वॉचमन काका पण माझी काळजी घेतात. मला खाऊ देतात आणि ते इथे एकटेच असतात. मी त्यांना बांधेन राखी.
आई :- हो चालेल आणि आपल्या घरी काम करायला येणाऱ्या मावशी, दूधवाले काका, शाळेत सोडणारे रिक्षावाले काका हे सगळे पण तुझी काळजी घेतात. तुझे लाड करतात. त्यांना पण बांधता येईल.
सौम्या :- अगं असे तर आपला टॉमी पण आपल्या सगळ्यांची, घराची काळजी घेतो. त्याला पण बांधू राखी?
आई :- हो बांध की.. इतकच कशाला आपल्या बागेतल्या झाडांना पण बांध, कारण तेही आपल्याला छान फुले-फळे देतात. पण फक्त राखी नाही बांधून नाही हं चालणार तर त्या सगळ्यांचे ऐकायचे. त्यांच्याशी नीट बोलायचे आणि तूही त्या सगळ्यांची काळजी घ्यायची.
सौम्या :- मी तर नेहमीच छान वागते आणि सगळ्यांच ऐकते. पण मला आता खूप राख्या बनवायच्या आहेत. त्यामुळे गप्पा पुरे आणि काम चालू करते. तू मला राख्या बनवायला भरपूर सामान दे ना.
आई :- हो ताईबाई, चला देते. रडू पळाले वाटतं ?
सौम्या :- हो धूम्म पळाले, पण दादाला मी आल्यावर बघणारच आहे. दोन दोन गिफ्ट घेणार आहे. आणि राखी पौर्णिमेला तू सांगितल्याप्रमाणे करणार आहे.
बरं का बालमित्रांनो, सौम्याने वॉचमन काका, दूधवाले काका, रिक्षावाले काका, टॉमी भूब्या, मनीमाऊ, शाळेतल्या मावशी, बागेतली झाडे सगळ्यांसाठी राख्या बनवल्या आहेत.
ती आता सगळ्यांनाच राख्या बांधणार आहे आणि छान भेटकार्डही देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या सगळ्यांचे ऐकणार आहे. त्यांची काळजीही घेणार आहे. अशाप्रकारे सौम्या मजेत आणि दणक्यात रक्षाबंधन साजरे करणार आहे.
तिने ही गंमत तिच्या मित्र-मैत्रिणींनाही सांगितली आहे. त्यांनाही ही कल्पना खूप आवडली आहे. त्यांनीही तसेच करायचे ठरवले आहे.
मग काय तुम्हीपण करणार ना...?
आणि हो, मला सांगायला विसरु नका म्हणजे झालं..!
.................................................
ही गोष्ट बघण्यासाठी ...


मनःपूर्वक आभार 💐
ReplyDeleteआपले वेगवेगळ्या प्रकारे रक्षण करणाऱ्या प्रत्येकाला राखी... झाडाला पण👌👌👌 कृतज्ञता विचार-संस्कार किती छान रुजेल याने 👍 युगंधरलाही खूप आवडली गोष्ट..thank you very much for writing this ❣️
ReplyDelete