आनंद तरंग
या हृदयीचे त्या
हृदयी
नकळत सारे कळले,
आनंदाची होता उधळण
मन माझे फुलले...
नकळत सारे कळले,
आनंदाची होता उधळण
मन माझे फुलले...
गेली दहा वर्ष लहान मुलांमध्ये
आनंदाने बागडताना, रोज नव्याने फुलण्याची, बहरण्याची, वाढण्याची संधी मिळत गेली आणि अधिकाधिक अर्थपूर्ण अनुभव गाठीशी जमत
गेले.
आज १४ नोव्हेंबर २०१९ बुधवार
बालदिनाची सुरुवात सकाळी खेळगटाच्या पालक, मुले, आम्ही दोघीताई
यांनी दुर्गाटेकडी बागेत मनसोक्त खेळ, गाणी, गोष्टी यांनी
सजलेल्या कार्यक्रमाने केली.
त्यानंतर मी, साक्षीताई आणि माझ्या सहा पालक मैत्रिणी अशा आम्ही आठ जणी मिळून
पिंपरी येथील झेप मुलांचे प्रशिक्षण केंद्र येथे मुलांसाठी पपेट शो करण्याचा आनंद
घेऊन आलो.
आम्हा सगळ्यांना पपेट शो करण्याचा
हा काही पहिला अनुभव नव्हता, पण ज्या मुलांची भाषाच वेगळी, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी अशांसाठीचा हा अनुभव थोडा वेगळा होता.
मनात काहीशी शंका, भीती होती की
आपल्याला हे जमेल ना..? त्यांच्याशी संवाद साधता येईल ना?
पण खरं तर एरवी पेक्षा अतिशय कमी
वेळात आमची पूर्वतयारी झाली. सारी मुलेही आमच्याशी गप्पा मारण्यासाठी, नवीन काय दाखवत आहोत हे बघण्यासाठी खूपच तयारीत आणि आनंदात होती.
ते बघून आपण हे करू शकू हा विश्वास मिळाला. सुरुवातीला शाळेला कासवे निघाली हे गाणे घेऊन मुलांना शोसाठी थोडे
उत्सुक बनवले.
आता समोर दिसणाऱ्या पडद्यामागून, तुम्हाला भेटायला गंमत जंमत येणार आहे असे म्हणत, मी आहे जादू वाला हे गाणे घेतले. गाण्यातील एकेक पात्र जसे बाहेर
येत होते, तसे मुलांना होणारा आनंद, गंमत हि ते टाळ्या वाजवून, ओरडून व्यक्त करत होते. काहीजण जवळ येऊन त्या पपेटला हात लावून बघत होते. स्वतः हातात पपेट
घालून बघत होते. एकूणच त्यांना ते सारे आवडत आहे याची ती पोचपावती होती.
त्यानंतर पुन्हा एकदा अस्वलाच्या
डोक्यात उवा उवा हे गाणे घेतले. मुलांनी खूप मनापासून ऐकले, जमेल तसे म्हणले. मग चला आपण सगळे जाऊ फिरायला हे दुसरे गीत पपेटद्वारे सादर झाले.
त्यातीलही प्राणी-पक्षी यांची पडद्यामागून होणारी एन्ट्री मुले मनापासून अनुभवत
होती. त्यास दाद देत होती.
शेवटचे गाणे शंकरजी का डमरु नाचे हे
घेणार असल्यामुळे, गणपतीबाप्पा
माहिती आहे का ? त्याचे गाणे तुम्हाला येते का ? असे विचारल्यावर त्यांच्यामधील एका चिमुरड्याने गणपती बाप्पांची
पंप छान हे गाणे पूर्ण पाठ आणि अतिशय गोड आवाजात आनंद घेत आणि देत म्हणले त्यासाठी
त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. बाळा असाच खूप मोठा हो... तुझे
आकाश तुला लवकरच सापडू दे...
शंकर जी का डमरू बाजे या गाण्याने
पपेट शो समारोप झाला. त्यानंतर आम्हा सगळ्यांना त्या मुलांनी केलेल्या अतिशय सुंदर
अशा कापडी फुलांची भेट देऊन संस्थेने आमच्या उपस्थितीचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
ही सारी मुले आणि त्यांच्यामध्ये
आनंदाने रममाण असणारे त्यांचे शिक्षक यांच्यासोबत घेतलेला आजचा हा अनुभव खूप काही
देऊन गेला. आपल्याकडे सगळं काही असताना
आपण दिवसभरात किती तक्रारी करत असतो याची जाणीव झाली.
तर अनेक प्रकारच्या कमतरता, प्रश्न असूनही किती सहज, आनंदी राहता येते हे या मुलांनी नकळत समजावले. गाणी ऐकताना पपेट शो
बघताना, कदाचित त्यातले सगळे शब्द या
मुलांना समजत नसतील, पण त्यामागचे भाव
त्यांच्या चेहऱ्यावरती सहजपणे उमटताना बघून आपल्यातच काहीतरी कमी आहे हेच अस्वस्थ
करुन गेले.
रोज साधारण तीस मुलांच्या
वर्गाबरोबर काम करताना, याला येत नाही, त्याला हे जमत नाही अशा तक्रारी आम्ही करतच असतो, पण प्रत्येक मूल वेगळे आहे, त्याची गरज वेगळी आहे, आवड वेगळी आहे, त्याच्याशी वेगळा संवाद हवा, त्याला स्वतंत्रपणे व्यक्त व्हायची संधी हवी हे या मुलांनी अतिशय
प्रकर्षाने मनावर ठसवले.
असा हा बालदिनाचा अनुभव पुन्हा एकदा
लहान, निरागस, निष्पाप होण्यात कसा आहे हे नव्याने सांगितल्याबद्दल झेप संस्था व
त्यांचे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर मला सतत काहीतरी वेगळे
करावेसे वाटताना माझ्यासोबत भक्कमपणे उभे रहाणाऱ्या माझ्या साऱ्या मैत्रिणींचेही
मनापासून आभार.
मला समृद्ध करणाऱ्या, माणूसपण शिकवणाऱ्या संधी मिळत रहाण्यासाठी परमेश्वराजवळ एकच
प्रार्थना...
तू बुद्धी दे, तू शक्ती दे..
नवजीवना विश्वास दे..
जे सत्य, सुंदर, सर्वथा..
आजन्म त्याचा ध्यास दे....
नवजीवना विश्वास दे..
जे सत्य, सुंदर, सर्वथा..
आजन्म त्याचा ध्यास दे....












खूप छान अनुभव घेतलात ताई .आपण कोणततीही ऍक्टिव्हिटी अगदी मनापासून करता.👍👍
ReplyDeleteKhupch chhan.... encouraging
ReplyDelete