Tuesday, May 04, 2021

विश्वास



श्लोकची भिरभिर नजर उषाताईंना शोधत होती... 

आजच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची होती...

आज त्याला राज्यस्तरीय सर्वश्रेष्ठ साहित्यिक पुरस्काराने गौरवण्यात येणार होते...

कार्यक्रम सुरु झाला... सुरेल ईशस्तवन... प्रस्तावना... 

मान्यवरांचा परिचय... स्वागत असे एकेक उपचार पूर्ण होत...,

कार्यक्रम प्रमुख टप्प्यावर आला आणि श्लोकला उषाताई दुसऱ्या रांगेत दिसल्या... 

त्यांना बघून त्याला आभाळ ठेंगणे झाले... 

आता तो कार्यक्रमात समरस झाला...

त्याच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले... 

त्याचा साहित्य क्षेत्रातला प्रवासयोगदान एका छोट्याश्या चित्रफितीव्दारे दाखवण्यात आले..  

ते बघताना उषाताईंनी, हळूच टिपलेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नाही...

अतिशय लहान वयात इतके भरीव योगदान देणारा युवा साहित्यिक,
 
मा. श्री. श्लोक...

असे म्हणत ढोलताशांच्या गजरात, जेष्ठ लेखकाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला...


निवेदकाने त्याला मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली...

त्याने उषाताईंना मंचावर बोलावले.., 

आपला पुरस्कार त्यांना समर्पित करुन नमस्कार केला..  

आणि तो बोलू लागला,

"रसिक वाचक, माझे मायबाप आज तुम्ही माझा जो गौरव केला, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आजन्म ऋणी राहील, पण या सन्मानाच्या खऱ्या मानकरी आहेत या.

या माझ्या शिक्षिका उषाताई आपटे... 

या नसत्या तर मी साहित्यच काय, पण कुठल्याही क्षेत्रात काहीच करु शकलो नसतो...

आजही तो दिवस मला स्पष्ट आठवतो... 

तेव्हा मी तिसरीत होतो... 

आईबरोबर शाळेच्या एका जिन्यावर बसलो होतो... 

आई रडत होतीमधूनच मला ओरडत होती,बडबडत होती... 

काय करत होती, तीचे तिलाच माहित... 

मी मात्र, पण माझं चुकल काय..? 

या आवेशात, तिच्याकडे शून्य नजरेने बघत होतो...

इतक्यात उषाताई आल्या... 

त्या आम्हाला गणित शिकवायच्या... 

जवळ येऊन त्यांनी, अतिशय आपुलकीने आईला काय झालं विचारलं...

आईने रडतच श्लोक अर्थात मी मराठीत नापास झालोय...

त्यासाठी मुख्याध्यापकांनी बोलवून कसे आणि काय काय सुनावले याचे रसभरीत वर्णन केले...

मी बघते असे म्हणत, उषाताईंनी आईला घरी जाण्यास सांगितले...

दोन दिवसांनी त्या आमच्या घरी आल्या... 

आणि आईला आनंदाने म्हणाल्या, 

"तुमच्या लेकाची अजिबात चिंता करु नका...  

या सगळ्यात त्याची खरचं काही चूक नाही... 

त्याने पेपर चांगलाच सोडवला होता, फक्त खराब..  

खरं तर खूप खराब अक्षरामुळे मराठीच्या बाईंनी तपासण्याचा कंटाळा केला इतकंच..."

"पण... पण मग, अक्षर चांगल काढावं ना याने" आमच्या आईची शेरेबाजी...

"तुमच म्हणणं चूक नाही, पण हा काही दोष नाही...  

त्याचे विचार मांडणी बघितली, तर मला थक्क व्हायला झालं... 

वयापेक्षा खूप जास्त परिपक्व आहे याची भाषा... 

मानसशास्त्र असं म्हणत की सतत, जलद आणि एतरांपेक्षा वेगळे विचार अक्षरावर परिणाम करतात...

तसेच काही असेल कदाचित..."

"मग काय करायला हवं..?" आईचा प्रश्न.

"अक्षर थोडं सुधारायचे. ते मी करुन घेईल, पण तुम्ही त्याच्यामागे लागू नका. कुणाच्या सांगण्यावरुन त्याला बोलू नका. अक्षर कसही येऊ दे, पण त्याला मुक्तपणे लिहू द्या.

तो अभ्यासात कदाचित फार काही करणार नाही, पण त्याचे लेखन बघून मी नक्की सांगते, तो साहित्यात नक्की काहीतरी करुन दाखवणार."

जसं उषाताईंनी आईला समजावलं, तसाच विश्वास मलाही दिला...
मुख्य म्हणजे, मला लिहितं ठेवलं... 


रडतखडत शाळा पूर्ण झाली, कारण अक्षराबरोबरच गणितशास्त्रसमाजशास्त्र हेही होतेच छळायला..  

पण उषाताईंनी मला सगळीकडे मदत केली...

शाळेप्रमाणे पदवीशिक्षण पण घेतले... 

या सगळ्या प्रवासात लिखाण बहरत होतेफुलत होते... 

घर आणि उषाताईंच्या प्रोत्साहनामुळे प्रकाशितही होत होते...

हळूहळू रसिक वाचकवर्ग वाढत होता..  

इतर साहित्यिकांची दाद मिळत गेली... 

एक ना अनेक पुरस्कार मिळाले..  

आणि आज हा राज्यस्तरीय सर्वश्रेष्ठ साहित्यक म्हणून गौरव... 

याचा आंनद निश्चितच आहे, पण योग्यवेळी मला हा विश्वास उषाताईंनी दिला नसता तर...?

भाषा शिक्षक नसूनही, भाषेच नेमकं शास्त्र ज्यांना अचूक समजलं... 
 
आणि अक्षरांच्या वळणात मला न अडकवता.. 

विचारमांडणीचे विशाल आकाश ज्यांनी मला दाखवले... 

त्या माझ्या शिक्षिका, मार्गदर्शिका, गुरु सर्व काही असणाऱ्या उषाताईंना मी माझा पुरस्कार समर्पित करतो..  

आणि माझे मनोगत थांबवतो..."

सभागृहात शांतता पसरली होती... 

उषाताईंचे आनंदाश्रू थांबतच नव्हते... 

तरी त्यांना बांध घालून त्या श्लोकजवळ गेल्या...

आज रसिक वाचकांसाठी सर्वश्रेष्ठ लेखक असणाऱ्या त्या भारदस्त व्यक्तिमत्त्वात त्यांना तिसरीतला चिमुरडा दिसत होता... 

त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरून मायेचा.. शाबासकीचा, आशीर्वादाचा हात फिरवला... 

निवेदक यांत्रिकपणे माईक घेऊन आला..., 

उषाताई बोलू लागल्या..,

"रसिक हो, गुरु ही तर खूप मोठी उपाधी आहे, मला नाही वाटत की मी त्यास पात्र आहे, 

शिक्षिका म्हणून बत्तीस वर्षे काम केले...

माझ्यासाठी ते फक्त उत्पन्नाचे साधन नव्हते...

तर एक व्रत होते... जबाबदारी होती... संधी होती... 

उत्तम भावी पिढी निर्माण करण्याची... 

विवेकानंदांनी सांगितले आहेच, शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीपासूनच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण..!

विषय शिकवताना चूक झाली तर कदाचित ती सुधारता येईल... 

पण विद्यार्थ्याना त्यांच्या गुणांची ओळख करुन नाही देता आली, त्याला प्रोत्साहन नाही देता आले तर मी स्वतःला शिक्षक का म्हणायचे..?

श्लोक गुणी होताच, त्याच्यात लेखक होताच मी फक्त त्याला प्रेरणा देत आले इतकंच... 

त्याने हा पुरस्कार मला देऊन माझा जो सन्मान केला, त्याचा मी मनापासून स्वीकार करते ते फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्यासारख्या सर्व मनाने, कृतीने शिक्षणाची पताका हाती घेऊन अविरत सेवा करणाऱ्या शिक्षकांसाठी... 

आणि पुन्हा श्लोककडे तो सुपूर्त करते, एक जबाबदारी म्हणून.. 

त्याने हाती घेतलेली साहित्यसेवा प्रामाणिकपणे आणि अखंड चालू ठेवण्यासाठी..."

शब्द थांबले, श्लोकने पुन्हा पुरस्कार स्वीकारला...

सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमत होते... 

उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या...

"मुलांची योग्य क्षमता ओळखणारे, असेच शिक्षक नव्हे,

गुरु सर्वांना लाभो, आणि प्रत्येक क्षेत्र भरभराटीला येवो," 

अशी सदिच्छा व्यक्त करत निवेदकाने कार्यक्रमाची सांगता केली...

*************************************

2 comments:

suggestions most wlcome