Tuesday, May 04, 2021

गाऱ्हाणं

 गाऱ्हाणं..?

ऑनलाईन शाळेचं..!

एरवी देव बाप्पासमोर गाऱ्हाणं मांडतात.  आज... तुम्हा सजग वाचकां पुढे...

हो सध्या सगळं बदलून गेलंय. मुक्तपणे विहरणाऱ्या सर्वांनाच एका अनामिक भीतीच्या नाजूक धाग्याने घट्ट जखडून ठेवलंय...

नाजूक आणि त्यात धागा, कधीही सहज तोडता येऊ शकतो असा...

अनेकांनी त्याला कारण-अकारण तोडून बघून झालंय... 

परिणाम झाले असतील किंवा नसतीलही...  

पण माझ्यासाठी हा विषयच तितकासा महत्त्वाचाच नाहीये...

मला आज कौतुक करायचे आहे, ते चिमुकल्या बालगोपाळांचे...
 
बालगोपाळ म्हणताना, अगदी वय वर्षे १५ पर्यतचे सगळेच, कारण त्यांना अजूनही प्रत्येक गोष्ट वडील मंडळींच्या सांगण्यानुसार करावी लागते. वयानुसार रडारड, दंगा, हट्ट, वाद हेही झाले असतील, पण तरी या सगळ्यांनी परिस्थितीचा जो सहज स्वीकार केला आहे, त्याला नक्कीच सलाम...

एरवी यांच्या बागडण्याने, आरडाओरडा बघण्यानेही मनाची मरगळ कुठच्या कुठे पळून जाते. याचा नाही म्हणायला दहा वर्षाचा अनुभव असणारी मी... एक शिक्षिका... 

सद्य परिस्थितीचा मलाही मनापासून त्रास होतो, ताण येतो, वाईटही वाटतं ... पण तरीही किंवा म्हणूनच माझा ऑनलाईन शाळा या संकल्पनेला विरोध नाही...

यात कोणताही आर्थिक संबंध न जोडता एक वेगळाच दृष्टिकोन मला सांगायचा आहे...

यात माझी एक शिक्षक म्हणून पन्नास टक्के आणि एक आई म्हणून पन्नास टक्के अशी अगदी समतोल भूमिका आहे...

सगळ्यात लहान म्हणजे वय वर्ष ३ ते ६ या वयोगटासोबत काम केलेली मी... 

मला विचाराल, तर शाळा काय असते...? तर...

घर आणि समाज याला जोडणारी घट्ट, मजबूत साखळी असते...

पुस्तकी शिक्षण हा इथला उपविषय आहे... 

मुख्य विषय सुरक्षित, प्रेम, स्वातंत्र्य, आदर, लाड, अधिकार यांनी समृद्ध असलेल्या वातावरणातून म्हणजेच घरातून बाहेर पडून, अनेकदा याच्या संपूर्ण विरुद्ध वातावरण असणाऱ्या समाज नामक गोष्टीशी जुळवून घ्यायला नकळत शिकणे...

मुद्दाम शिकणे असा शब्द वापरला, कारण याचा कोणताच अभ्यासक्रम... सो कॉल्ड सिलॅबस नाही...

 शिक्षक हे शिकवत नाहीत, पण तरीही मूल हे सगळं शिकत असतं...

घर, कुटुंब फार तर नातेवाईक , मित्र परिवार यांच्यात रमणाऱ्या आपल्या मुलाने पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकले तो दिवस आठवा...

मूळातच नावीन्याची ओढ असल्याने, ते उत्सुकतेने सगळीकडे बघत होते, पण जशी आई-बाबा यांच्या हाताची पकड सैल झाली आणि बाई - ताई - टीचर नामक संपूर्ण अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात त्याची रवानगी झाली होती, तेंव्हा तांडव काय असतं हे नक्कीच अनुभवलं असेल. यातही आकांडतांडव आणि मूक विरोध असे प्रकार असतात बरं का...

(याला खरं तर अपवाद नाही किंवा नसला पाहिजे... जी मुले अशी व्यक्त झाली नसतील, त्यांना हा अनुभव आधी पाळणाघर किंवा घरातील वातावरणातच मिळाला असेल.)

तो सगळा गोंधळ एका वर्गासाठी एकावेळी किमान २५-३० मुलांचा असतो आणि ते सांभाळणारी ती शिक्षिका... एक फार तर दोघी... मदतीला एखादया मावशी...

पण त्यातही आपल्याला आपल्या मुलाचा सूर वेगळा ओळखू नाही आला तर नवलच...

इथे पालक म्हणून आपणच हरलो होतो...

बालशिक्षण सांगत, की सर्वोत्तम आणि तेही उपजत राजकारण, कोणाला येत असेल तर ते लहान मुलांना...  

परिस्थिती आपल्या मनासारखी होण्यासाठी नेमक्या वेळी नेमकं काय करायला हवं, ते त्यांना न शिकवता उपजत समजत...

अगदी आई, बाबा, आजी असे व्यक्तीपरत्वे, त्यांचे स्वमत मांडण्याचे, समजवण्याचे, हट्टाचे, रडण्याचेही प्रकार बदलत असतात, तेही अगदी वय एक महिन्यापासूनच...

त्यामुळे पहिल्यांदा शाळेत  येताना ते या बाबतीत तरबेज होते, असतात...  

परिणामी पालक म्हणून आपण काही क्षण कमजोर पडलो होतो....  

नाही गेला/गेली शाळेत तर काय होईल, असाही विचार येऊन गेला असेल...

आणि त्यावेळी शिक्षिका, मुलांना बघू की त्यांच्या आईबाबांना यात अडकली असेल...

पण हा काळ काही दिवसांचा आणि दिवस म्हणताना एका दिवसात काही मिनिटांचा होता, असतो...

अजिबात वाढवून सांगणार नाही, अगदी पहिल्या दिवशी.... डोक्यावरुन पाणी १५ ते २० मिनिटात सगळी मुले शांत होतात. 

अशावेळी शिक्षक नेमकं काय करतात... 

खरं तर विशेष काहीच नाही, खेळणी... गाणी... गोष्टी असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर ठेवतात...  

निवडीचे स्वातंत्र्य देतात. कधी कधी तर स्वतःच  त्यांच्यासारखे रडतात, ओरडतात ... गंमत वाटली असेल पण अनुभव सांगते आहे...

इथे पहिल्यांदा ते मूल स्व मत बनवत की घर, ओळखीच्या व्यक्ती यांच्या शिवायही मी एकटा अनोळखी लोकांत राहू शकतो...(शिक्षक असतील, समवयीन मुले असतील.)

हा विश्वास त्याला समाजाशी जोडायला शिकवतो तेही अभ्यासक्रमात नसताना.

मग पुढे मिळून खेळणे,  ठराविक नियमात वागणे यातही मुले स्वतःला अगदी चपखल बसवतात. यात सगळे सारखे नसतात...  

काही रामासारखी आज्ञाधारक तर काही कृष्णासारखे खोडील तर काही लाजरी बुजरीही असतात, पण त्यांना त्यांच्या कलेने पुढे जाण्याचे स्वातंत्र्य असते किंबहुना ते स्वतःहून ते घेत असतात...

ते स्वातंत्र्य त्यांच्या वाढीच्या, प्रगतीच्या आड येऊ नये, म्हणून असते ती अभ्यासक्रमाची चौकट. 

वयानुसार प्रत्येक विषयाच्या किमान गोष्टी यायला हव्या याची एक शैक्षणिक मांडणी. त्यातली क्रमवारी, गुण हे त्यांची आवड किंवा अभिरुची ठरवत असते....

पण हे सगळं करताना मूळात त्या आवड, अभिरुचीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करायला, ज्या समाजात त्यांना जायचे आहे त्याची ओळख, परीक्षा होते ती शाळेत...
 
हार-जीत, मैत्री, प्रोत्साहन, राजकारण, स्पर्धा,  शिस्त, दंगा, नेतृत्व... एक ना अनेक विषय मुले स्वतःचे स्वतः शिकत असतात....

विषय सुरु झाला सद्यस्थितीचा, बंदिस्त वातावरणाचा, ऑनलाईन शिक्षणाचा आणि हे काय असं वाटेल कदाचित पण मुख्य भूमिकाच स्पष्ट नसेल तर नेमकं मांडता येत नाही म्हणून ही हरिदासाची कथा...

थोडक्यात मुलांनी शाळेत का जायचं..? 

तर समाजशील होण्यासाठी हे माझं ठाम मत आहे... अगदी प्रत्येक परिस्थितीत.. 

घरी बसून शिकता येणार नाही का ? 

नक्कीच येईल, पण त्या शिक्षणात समाजात एकरुप होण्याची ताकद नसेल, तर ते निरुपयोगी होईल...

आता ऑनलाईन शाळा याकडे बघताना, हे माध्यम मुलांना समाजशील बनवते आहे का..? 

हाच मला पडलेला पहिला प्रश्न...

म्हणूनच पुरेसा अनुभव घेण्याआधी, यावर काहीही बोलणे टाळले...

अगदी सुरुवातीला शाळा याचे दोन्ही घटक म्हणजे, मुले आणि शिक्षक दोघेही या गोष्टीला अनोळखी होते...

अगदी तसेच जसं शाळेत पहिला दिवस...

इथे मुलांसोबत पालक आणि महत्वाचे म्हणजे शिक्षकही तांडव करण्याच्या भूमिकेत...

का.... कशाला.... उपयोग होईल का.... गरज आहे... ?

नुसतेच प्रश्न... शंका आणि गोंधळ...

पण परिस्थितीनुसार बदल, अनुकूलन ही निसर्गशक्ती असल्याने आता सगळेच जण याला सरावले आहेत...

मग होत आहेत का मुले समाजशील, समाजाभिमुख ...

मला अनुभव म्हणून विचाराल तर नक्कीच...

आधी शिक्षक म्हणून सांगते... 

सध्याही लहानच वयोगट हाताळत आहे...

शिक्षक वर्गात आल्यावर सर्वात आधी मुलांना काय करावंसं वाटत, तर स्वतःचे काहीतरी सांगायचे असते, दाखवायचे असते ... 

आजही ऑनलाईनमध्ये सुरुवातीला पाच मिनिटं तेच चालू असते...

फक्त सरावलेले हे चिमुरडे, आधी विचारतात मी दाखवू का? सांगू का? काही अबोल, बुजरी असतात पण तीच त्यांची ओळख, ताकद असते... 

इथे ते आपले म्हणणे विचारुन मांडायला शिकत आहेत...

शिकवत असताना फार मध्ये मध्ये न करता ऐकत असतात, कधी कधी तर इतकी शांतता असते की माझा आवाज येतोय ना...? 

हे विचारुन खात्री करावी लागते. अशावेळी मात्र  विषय त्यांच्या आवडीचा, नवा किंवाआकर्षक असावा लागतो, जसे की गाणी, गोष्टी... 

त्यावेळी त्यांच्यामध्ये माध्यम अडथळा नाही, तर सोय आहे याची समज आपल्यालाच खूप काही शिकवून जाते... 

मग अशाच गोष्टी करुन बघण्याचा उत्साह वाढतो...

थे ते लहान असूनही, अशा कृतीतून आम्हा शिक्षकांचे कौतुक करत असतात... 

अनेकदा तुम्ही छान दिसत आहात, इथं पासून ते छान शिकवलं, आवाज छान अशा वेगवेगळ्या काँम्प्लिमेंट देतात तेंव्हा त्यांच्यातला निरागसपणा आताही तितकाच टिकून आहे याची खात्री वाटते...

मूळातच नेतृत्व गुण असणारे मूल, स्वतःच मीटिंग सुरु करुन शिक्षक येईपर्यंत आपल्या गुणांना मनसोक्त संधी देत असते...  

ही संख्या एकापेक्षा जास्त असेल तर त्यांची चढाओढ अगदी बघण्यासारखी असते... 
 
सुरुवातीला हे अनुभवता यायचे कारण मुलांना शिक्षक आलेले कळायचेही नाही, पण आता त्यांना पिन म्हणजे मेन स्क्रीनवर आणण्याचे पर्याय माहीत झाले आहेत.. .
 
एखादा अति उत्साही असलाच तर त्याची काळजी असणारा दुसरा/ दुसरी त्याला टीचर आल्या हे आठवण करुन देतात...  

खरं तर आता त्या फार काहीच करु शकणार नाहीत हे माहीत असूनही मूळातच काही नियम पाळायचे, दुसऱ्याची काळजी हे सामाजिक गुण त्यांना तसे करायला लावतात...

एरवी एखादा विषय चालू असताना, मधेच काहीतरी वेगळं आठवलं म्हणून सांगायला आवडणारी मुले आजही अनेकदा अनम्यूट करुन सांगतातच... 

तेंव्हा त्यांच थोडं ऐकून घेऊन, हे तू नंतर सांग ( नवा पर्याय  मेसेज पाठव ) असे म्हणल्यावर नाराज न होता, जेंव्हा ते स्वतःला आवर घालतात तेंव्हा नेहमी आपल्याला बोलायला मिळतेच असे नाही याचा नकळत धडा गिरवत आहेत...

या पिढीचा जन्मच मुळी तंत्रज्ञान युगातला. त्यामुळे त्याकडे असणारी त्यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही...  

इतके दिवस मिळणार नाही हेच ऐकत असलेलं एक खेळणं (मुलांसाठी) जेंव्हा त्यांना अगदी सहज मिळालं आहे, तेंव्हा ते त्यांना सर्व प्रकारे खेळून बघायचे आहे... 

मग ते वेगवेगळी बटणं दाबून बघतात, न घाबरता सगळे पर्याय करुन बघू पहातात आणि हे करुन थांबत नाहीत, तर नव्या नव्या गोष्टी मित्रांना, अनेकदा आम्हा शिक्षकांना पण शिकवतात तेही ऑनलाईनच. तेंव्हा त्यांचं प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटतो... 

स्वानुभवातून शिक्षण, यासाठी अजून वेगळं काही करायची गरजच का..?

आधी सारखं वाचन, लेखन, पाठांतर होत नसेलही कदाचित...

पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, त्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे... 

आणि बऱ्यापैकी ते जसे शाळेत असतात तसेच फक्त एका पडद्या आड सरावले आहेत...

या सगळ्यात कधी जमलंच तर नक्की बघा, की ही परिस्थिती तात्पुरती आहे, हे त्यांच्या आणि आम्हा शिक्षकांच्या बोलण्यात रोज किमान एकदा तरी येत असत...

पुन्हा सगळं आधी सारखं होणार हा विश्वास दोघांच्याही डोळ्यात भरून राहिला आहे आणि त्याच जोरावर हे सगळं गणित बऱ्यापैकी स्थिरावल आहे...

यात सुचवावीशी वाटणारी एकच गोष्ट ते म्हणजे, पालक म्हणून तुमची भूमिका एक सहाय्यक म्हणून नक्कीच असू द्या. अडेल तिथे जरुर सांगा, तांत्रिक मदतही नक्की करा पण शंभर टक्के शिक्षक व्हायला जाल तर मुलांसोबत असलेलं पालकत्वाच नातं हरवून बसाल. कारण शिक्षक एकावेळी ४० ते ५० मुलांचे पालक असतात... 

त्यांच्या निरीक्षण आणि त्यावर कृती या मुलांनुसार बदलणाऱ्या गोष्टी असतात... 

ती भूमिका एकावरच घेताना, तुमचा हिटलर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही...

आता एक आई म्हणून... तेही अडत्या वयाच्या मुलाची... नववीत शिकणारा माझा मुलगा...

ऑनलाईन शाळा हा पर्याय स्वीकारताना, त्यासोबत सहजच स्वार होऊ पहाणारा तंत्रज्ञानाचा राक्षस...  खुणावणारे गेम, अनावश्यक पण सहज उपलब्ध होणारी माहिती.... 

एक ना अनेक धोके, पण तरी मला हा पर्याय गरजेचा नाही... असे कधीच वाटले नाही, वाटणार नाही...

सकाळी सात पूर्वी घर सोडून बाहेर पडणारा, नंतर शाळा, क्लास, मैदान मध्ये जेवण-नाश्ता असं लीलया सांभाळत रात्री आठला पुन्हा परतणारा तो... 

आता २४ तास एका कैदेत, हवं तर सुरक्षित कैदेत म्हणा... पण अडकलाच आहे...

तेंव्हा टीव्ही, मोबाईल, गेम या ऐवजी, ऑनलाईन शिक्षणला नक्कीच प्राधान्य द्यावेसे वाटते...

त्यानिमित्ताने का होईना... उठणं, आवरणे या दिनक्रमांना चालना मिळते...

मी- माझी शाळा- क्लास- शिक्षक- मित्र यात, त्याच्या मी ची भूक थोडीफार तरी भाकते...

शाळेशिवाय होणाऱ्या मित्रांसोबतच्या मीटिंग, त्यांना तोच विरंगुळा देतात... 

मी जे घरात अडकलो आहे, तेच इतरांचेही आहे हे तपासून बघण्याची संधी मिळते... 

थोडक्यात सारखं सारखं मी काय करु हे रोज नव्याने ठरवावे लागत नाही... 

काळानुसार बदलण्याचे नकळत धडेही गिरवले जातात...

खरंच अभ्यास होतो का ? तर तो एरवी शाळेत जातानाही किती आणि कसा करायचा याच्या किल्ल्या त्याच्यात हातात होत्या... 

त्यावर नाही म्हणायला, शाळेच्या नियमांची चौकट होती पण गरजेनुसार त्यातून कसं निसटून जायचे यात सगळीच मुले हुशार असतात, नसली तर मित्र त्यांना मदत करतात...  

या गोष्टीही त्यांना समाजात कोणते नियम पाळायचे आणि कोणते कधीतरी टाळायचे याचे नकळत शिक्षण देत घेत असतातच...

अभ्यासक्रमातला काही भाग निसटला तरी चालेल, पण माझं काहीही चालू नाही, मी पूर्ण निष्क्रिय, रिकामा आहे हा समज होणे जास्त धोकादायक वाटते...

एरवीही आपण बाहेरचे, फास्ट फूड खाणे किंवा इतर चैनीच्या गोष्टी करणे... गरजेचे नाही हे माहीत असूनही कधीतरी या सगळ्या गोष्टी करत असतोच तेही,अनेकदा आर्थिक गणित काटाकाटी बसवून... 

मग तसंच मी तरी ऑनलाईन शाळेकडे बघते...

शेवटाकडे येताना ऑनलाईन शाळा हा काही काळापुरताचा पर्याय आहे, की  ही शिक्षणात येऊ पाहणारी नवी वाट हे आज नक्की सांगता येणार नाही...

या ऑनलाईनने उपलब्ध करुन दिलेले तंत्रज्ञान वापर, दूरवर असणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांशी संवाद, संवादाचा नवा रंगमंच अशा काही गोष्टी उद्याच्या शिक्षणात नक्कीच रहातील पण म्हणून हेच उद्याचे चित्र नक्की नसेल असे कुठेतरी वाटते...

पण विज्ञान-तंत्रज्ञान शाप की वरदान, हा फक्त निबंध लिहून बक्षीस मिळवण्याचा विषय नसून, प्रत्यक्ष नित्य नियमाने जगण्याचा विषय आहे हे यातून नक्कीच शिकायला हवं...  

या साऱ्याचा रिमोट पालकांनी स्वतःच्या नाही, तर मुलांच्या हातात जाणीवपूर्वक सोपवण्याची गरज आहे... 

मी माझं मत मांडलं...

आवडलं, पटलं तर बघा. उगाच विरोधाला विरोध न करता, या साऱ्याकडे एका वेगळ्या बाजूने बघा इतकंच गाऱ्हाणं मांडून थांबते...

आणि लवकरात लवकर हे सारं संपून, सगळं पूर्ववत होऊ दे, हीच प्रार्थना गणपती बाप्पाकडे करते...

***********

6 comments:

  1. अनुभवांची शिदोरी आणि नियोजनाची दिशा देणारा लेख.

    ReplyDelete

suggestions most wlcome