कोमळ वाचा दे रे राम। विमळ करणी दे रे राम।।धृ।।
विश्व कल्याणासाठी निघालेले रामदास स्वामी,
रामाला कोमल वाचा का बरे मागतात, ..?
त्यांची वाचा कोमल नव्हती..?
मला वाटते, ते सामाजिक कामाची पाया बांधणी मांडतात..
समाजात वावरताना, वाणी ही कोमलच असली पाहिजे..
उत्तम पुरुष लक्षणे सांगताना ते म्हणतात,
बोलण्यासारखे उत्तर येते,
तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्ते..
थोडक्यात जे योग्य असते, पटण्यासारखे असते, त्याला ओरडायची, वादाची गरजच नसते..
मग तरीही ही आर्त मागणी का..?
कारण दैनंदिन व्यवहार राग न येणे, स्वतःवर संपूर्ण संयम असणे, हे सहज शक्य नाही..
कदाचित रामदास स्वामींकडे तो संयमअसेल, पण नंतर त्यांचे कार्य पुढे चालवणाऱ्या शिष्यांकडे असेलच असे नाही..
आणि त्यांचे शिष्य तरी कोण..?
ते सर्व, जे राम मानतात, रामाला पूजतात, राम हे ज्यांचे दैवत आहे..
त्या साऱ्यांसाठी, स्वामी ही मागणी करतात..
तुमच्या, माझ्यासाठी करतात..
प्रसंग ओळखी दे रे राम। धूर्तकळा मज दे रे राम।।
वाणी कोमल असल्याने सर्व कामे सिद्धीस जातातच असे नाही, असा वाद कुणी केला तर अगदी योग्य आहे..
त्यासाठी स्वामी पुढे म्हणतात,
माझा वाणीवर ताबा रहाणार नाही, ओरडवेसे, भांडवेसे प्रसंग येतील, तेंव्हा त्याची ओळख तू मला दे..
प्रसंग ओळखून पुरतील का..?
नाही ना, तर त्यावेळी नेमके कसे वागावे याचे ज्ञान मला दे..
म्हणजेच धूर्तकळा..
प्रत्येक वेळी छान राहून नाही चालत,
संत तुकारामांनीही सांगितले आहे, की
भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी ||
याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज, त्यांचे राजकारण, समाजकारण..
रामदास स्वामी प्रसंगानुरुप कृती करण्याची क्षमता, स्वतःसाठीच नाही, तर रामरायाच्या भक्तांसाठी मागतात..
हितकारक दे रे राम। जन सुखकारक दे रे राम।।
कृती प्रसंगानुरूप असली तरी, ती स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करणारीच असली पाहिजे, हे सांगायला रामदास स्वामी विसरत नाही..
मला राग आला, त्रास झाला मग मी माझ्या मनाला येईल ते करेन, स्वतःची हानी करेन, इतरांचा छळ करेन, ही जर नैसर्गिक भावना असेल, तर त्यावर विजय मिळवण्याची शक्ती स्वामी मागतात..
नकारात्मक होणे, हे अनैसर्गिक नाही, फक्त ते तात्पुरते असते, त्यावर मात करता येते, याची जाणीव या शब्दातून होते..
यासाठी मला दोन उदाहरणे आठवतात..
पहिले टॉम आणि जेरी कार्टून मधला, टॉम जेरीच्या मनात येणाऱ्या दोन विचारांचा प्रतिनिधी एक योग्य दुसरा अयोग्य आणि त्यातल्या एकाची त्यावेळी त्यांनी केलेली निवड व त्यामुळे घडलेली गंमत..
दुसरे.. स्वदेश चित्रपटातील एका गाण्याच्या दोन ओळी
देख तजके पाप रावण, राम तेरे मन हैं..
असा राम रावणाचा झगडा आपल्या विचारात सारखाच होत असतो, माझे अनुयायी नेहमी रामाचीच निवड करोत, अशी आळवणी स्वामी करतात..
अंतर पारखी दे रे राम। बहुजन मैत्री दे रे राम।।
योग्य अयोग्यतेची निवड केली, तरी समाजात वावरताना सर्वांसोबत रहावे लागेल, त्यांना समजून घ्यावे लागेल..
सर्वांशी मैत्री करावी लागेल, त्यांच्यामधील चांगले माझ्यात येण्यासाठी, आणि जर काही चुकीचे असेल तर दूर करण्यासाठी त्यांना मदतही करण्याची बुद्धी तू मला दे..
मैत्र भाव हा फायद्यासाठी, स्वार्थासाठी न येता विश्व कल्याणासाठी असू दे..
विद्यावैभव दे रे राम। उदासीनता दे रे राम।।
समाजासाठी, बदलांसाठी जर कृती करायची तर आधी माझा व्यक्तिमत्त्व विकास झाला पाहिजे..
त्यासाठी विद्या वैभव दे..
आजच्या शिक्षणात माहितीचा प्रचंड आदान प्रदान होत असताना बघायला मिळते, परंतु ती माहिती प्रत्यक्षात उपयोजनात येणे म्हणजे त्याचे ज्ञानात रुपांतर होणे..
ज्ञानामुळे जनहित साधणे जमले, तर त्याची विद्या बनते, असे दान समर्थ रामरायास मागतात..
मागो नेणे दे रे राम। मज न कळे ते दे रे राम।।
समर्थांना वाटते की आपली मागणी कदाचित संपणारच नाही, आणि तरीही काहीतरी राहूनच जाईल..
ही मागणी स्वतःसाठी नाही, समाजहितासाठी आहे..
त्यामुळे कदाचित मला सगळेच समजेल असे नाही, त्यामुळे रामा तूच माझा माता पिता बनून मला न समजणारे, लक्षात न आलेले द्यायलाही विसरु नकोस..
तुझी आवडी दे रे राम। दास म्हणे मज दे रे राम।।
इतके सगळे मिळाल्यावर अर्थातच माझा मी सुखावेल, त्याचे अहंकारात रुपांतर होईल..
आणि ही मी ची बाधा साऱ्याचा नाशाला आमंत्रण देईल, म्हणूनच या सगळ्या सोबत तुझी आवड माझ्यात सतत असू दे..
जे माझ्यात आहे, ते सारे तू आहे, त्याचा कर्ता करविता तू आहेस, ही जाणीव मला नेहमी असू दे..
समर्थांची ही आर्तता एक प्रकारची ऊर्जा त्यासोबत आत्यंतिक स्वस्थता देते..
साऱ्यात असूनही, कशातच नसण्याचे अलित्पतपण देते..
पुढचे लवकरच..



खूप छान लिहिलंय
ReplyDeleteमनापासून आभार 💖
Delete