सध्याची आधुनिक शिक्षण पद्धती अशाच काहीशा साचेबद्धतेत अडकली आहे..
या चौकटीला तोडून, मुलांना मुक्तपणे स्वानुभवातून शिकण्याचा आनंद देण्यासाठी, निसर्ग शाळा धडपडते..
यामध्ये सहभागी होण्याची संधी या दिवाळीच्या सुट्टीत मिळाली..
खरं म्हणजे सुट्टी संपण्याचे शेवटचे तीन दिवस इथल्या शिबिरात जायचे होते, त्यामुळे सुरुवातीला हो-नाही चालले होते..
पण सुट्टी घालवायची नाही मिळवायची असते, ही प्रबोधिनीची सवय मला तिथे घेऊन गेली..
तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका निसर्गरम्य गावात ही निसर्ग शाळा आहे..
याचा परिसर भरपूर मोठा असला तरी काँक्रीटचे बांधकाम नाही म्हणावे, इतके नगण्य आहे..
साधारण दोन-तीन खोल्यांची वास्तू असेल..
सुमारे पन्नास बालगोपाळ आणि दहा मोठे, एवढे सगळे राहणार कुठे..? हा प्रश्न बसमधून उतरताना मनात आला..
तेवढ्यात जवळपास पंधरा आधुनिक पद्धतीचे तंबू दिसले..
आजूबाजूला असणारे डोंगर, बऱ्यापैकी घनदाट झाडी, दूरवर पाहिल्यास नजरेस दिसणारा फक्त मोकळा परिसर आणि त्याच्या मधोमध ही राहण्याची व्यवस्था..
ही कल्पनाच एका वेळी रम्य तर दुसऱ्या क्षणी काहीशी घाबरवते..
पण ही कल्पना नसून याचा पण एक भाग असणार आहोत याने या शिबिराची सुरुवात झाली..
शिबिराचे आयोजन नियोजन हे पूर्णतः झालेले होते, माझी भूमिका फक्त मदतनीस म्हणून होती..
थोडक्यात आपणही शिबिराचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, फक्त त्याबरोबर मुलांसोबत त्यांची एक ताई म्हणून राहायचे आहे..
अडीच दिवस दोन रात्री इतक्या कमी कालावधीच्या या शिबिरात निसर्गाची ओळख, झाडझुडूपांची माहिती, निरीक्षण, संघ बांधणी खेळ, धाडसी खेळ (रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर ड्राफ्टींग, रॅप्लिंग), शास्त्रीय संगीताची ओळख, बाल चित्रपट, चुलीवर स्वयंपाक, आकाश निरीक्षण, प्रथमोपचार कृतीसह माहिती, किल्ला बनवणे असे खूप काही मुलांनी येता जाता दंगा करत हसत खेळत अनुभवले, शिकले..
गेल्या पंधरा वर्षात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना, इतका सहज आणि मोकळा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला..
कुठेही मुलांच्या मागे लागणे नाही, त्यांना सततच्या सूचना नाही..
त्यांना वाटणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी उगाच मागे लागणे नाही किंवा कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती नाही..
आयोजक मुलांशी छान संवाद साधत, काही वेळेला तो विषय त्यावेळी सोडून देऊन, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देऊन, प्रत्येक गोष्ट करून बघण्याचा अनुभवण्याचा विचार त्यांच्यामध्ये नकळत रुजवत होते..
अधून मधून घराची आठवण येते म्हणून हिरमुसली होणारी मुले, काही वेळातच पुन्हा फुलपाखरासारखी बागडताना दिसले..
एरवी दहा मिनिटात कोणत्याही गोष्टीला कंटाळणारी, वर्गांमध्ये पाच मिनिटं ही स्वस्थ न बसणारी हे बालचमू अडीच दिवसात अजिबात दमले किंवा वैतागले नाही..
घरी आवडीची भाजी खाताना, नवीन काहीतरी हवे, म्हणून गाणं गाणाऱ्या या वानरसेनेने, ग्रामीण परिसरात मिळणाऱ्या रुचकर पण साध्या चवीच्या जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला..
या जेवणामध्ये मुलांना विविध भाज्या, कडधान्ये माहिती होतील, पूर्ण आहार म्हणजे काय हे समजेल याची विशेष दखल घेतली होती..
सकाळ संध्याकाळच्या न्याहारीमध्ये मुलांच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य होते, पण सोबत आरोग्याचा विचार समोर ठेवून दूध, सरबत याची जोड दिली होती..
तंबू मध्ये राहायचे ही कल्पना विस्मयीत करणारी असली तरी, प्रत्यक्षात मनात थोडीशी भीती असल्याने पहिली पूर्ण रात्र मुलांनी एकमेकांना चिडवण्यात घाबरवण्यात आणि दंगा करण्यात घालवली..
दुसऱ्या रात्री मात्र एकूणच परिसराला सरावलेली ही मंडळी, घराप्रमाणे निवांत निजली..
चुलीवरच्या स्वयंपाकात चूल पेटवण्यापासून ते पदार्थ शिजला का हे त्यांनी एकमेकांच्या मदतीने गटकार्य करत अनुभवले, यातील स्पर्धेचा ताई दादांनी दिलेला निर्णय किती खर आहे हे पाहण्यासाठी एकमेकांचे पदार्थ चाखूनही पाहिले..
भल्या पहाटे न उठवता जागी होऊन ही मंडळी मनसोक्त खेळ खेळली यासाठी त्यांना कोणत्याही ताई, दादांची मदत लागली नाही..
शिबीराचे सर्वात शेवटचे सत्र अधिक चित्त थरारक होते, कारण त्यामध्ये मुलांनी सापांविषयी फक्त माहितीच घेतली नाही, तर प्रत्यक्ष विषारी बिनविषारी साप बघितले, काहींना हातही लावला..
एकमेकांशी पूर्णतः अनोळखी असणाऱ्या या साऱ्यांची शिबीर संपेपर्यंत घट्ट मैत्री झाली..
इतक्या वेळ ज्या शिबीराबद्दल सांगत आहे, त्याचे नाव निसर्ग शाळेचे हुप्प्या शिबीर..
सह्याद्रीच्या परिसरात हुप्प्या जातीची वानरे दिसतात..
ती जशी मनमुराद निसर्गात हुंदडत असतात, तसाच अनुभव बालगोपळांनी घ्यावा म्हणून हेमंतदादा, संजयदादा, यशदीपदादा आणि त्यांचे सहकारी हे गेले अनेक वर्ष,आपले सगळे व्याप सांभाळून या शिबिरांचे आयोजन करत आहेत..
शाळेत प्रत्येक विषयाबरोबर ओढून ताणून बसवलेल्या प्रकल्प, उपक्रमांमध्ये शिक्षण बाजूला राहून, नुसते दाखवण्यासाठीच्या गोष्टीची यादी तयार होते..
पण गदिमा म्हणतात ना,
बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु,
झाडे, वेली, पशुपाखरे, यांशी दोस्ती करू
असे सहज शिक्षण मिळते, ते अशा स्वानुभवांमधूनच..
मुलांसोबत या साऱ्याचा आनंद जसा मी मिळवला, तसाच तो आपण सर्वांनी जरूर घ्यावा म्हणून केलेला हा लेखन प्रपंच..
संपर्कासाठी.. फेसबुक पेज लिंक देत आहे..
https://www.facebook.com/Nisargshala?mibextid=ZbWKwL



काय मस्त लिहिलंय हो, छानचं 🙏. तुमच्यासारखी तज्ज्ञ मंडळी सोबत असतात म्हणुन हे होऊ शकते. धन्यवाद 🙏
ReplyDeleteकाहीही तुमचे खूप कष्ट आहेत यामागे
Delete