Saturday, May 28, 2022

आईपण


 

आई, तुला काही सांगायचं आहे...

आई यावर प्रत्येक भाषेत, साहित्यप्रकारात आणि बहुतांश सिधहस्त लेखक कवींनी इतके लिहून ठेवले आहे, की त्यापुढे मी काय जाणार...

पण तरी मला आज काहीतरी वेगळेच सांगायचे आहे, कारण तुझी लेक असणे, हे माझे पूर्वसंचित आहे......

मनातलं सांगण्यासाठी आजचा दिवस खास, तुझा जन्मदिवस...

वाढदिवस मुद्दाम म्हणले नाही, कारण प्रत्येक जण शारीरिक, मानसिक, वैचारिक इतकच नाहीतर आत्मिक रोज वाढतच असतो, हे तू शब्दातून नाही तर कृतीतून माझ्यात रुजवलं आहेस...

कोणाचाही जन्मदिवस साजरा करणे म्हणजे आनंद, मजा आणि आठवणीच्या खजिन्यात भर...

त्यात तो आईचा म्हणल्यावर तर, अजूनच भारी हवा ना...!

कळायला लागल्यापासून, हा दिवस तुला विशेष लक्षात रहावा म्हणून धडपड असायची...

जेंव्हा स्वतः कमवत नव्हते, तेंव्हा बाबांकडून आर्थिक मदत आणि जास्तीत जास्त स्वतःची कला वापरण्याकडे कल होता...

नंतर आर्थिक सक्षम झाल्यावर, त्यात वेगवेगळ्या गोष्टीची भर पडत गेली...

पण अध्यात्मिक अभ्यास आणि इतर अनेक कारणांमळे तुझा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलत गेला...

आणि हेच माझ्यासाठी दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे...

कशातच अडकायचे नाही, विरक्त होत जायचे हा तुझा प्रवास आणि तुला काहीतरी खास भेट देऊन चकित करायचे माझी धडपड यात अनेकदा तूच जिंकतेस...

संसारात राहून निर्मोही होण्याची तुझी साधना मला नेहमीच प्रेरणा देते, पण तरी पुन्हा नव्याने तुला मोहात पाडण्याची धडपड करावीशी वाटतेच कारण कदाचित मी अजून त्या टप्प्यावर आले नाही...

मग यावर्षी मी ठरवले की, नुसती मेजवानी, भेटवस्तू इतकं तांत्रिक न होता, शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न करायचा...

मुद्दाम जुने चाऱ्हाट लावले, कारण त्याशिवाय आज का अचानक असा प्रश्न पडणार नाही...

तर तुझा जन्मदिवस साजरा करण्यामागे तुला खुश करण्यापेक्षा मला माझ्या भाग्याचा आनंद व्यक्त करायचा असतो...

तू आमच्यासाठी रोजच अन्नपूर्णा असतेस, पण ते कौशल्य मीही आत्मसात केले आहे, हे दाखवायला मेजवानीचा घाट असतो...

भेटवस्तू, ही फक्त वस्तू नाही तर  त्यातूनही काही ना काही सांगायचे असते...

जसे यावेळी आणलेली दुलई...!


(एक खंत की ही मी माझ्या हाताने बनवलेली नाही.)

(इंग्रजीत म्हणे त्याला क्वील्ट म्हणतात, म्हणो बापडे त्यात ना माझ्या भाषेचा गोडवा आहे ना ते भाव, आणि उच्चारताना बोबडी वळते ते तर अजूनच वेगळे)

दुलई, जिच्यात ती ऊब सामावली आहे, जी मी वेळोवेळी तुझ्यासोबत असताना, तसेच तुझ्या विचारात, संस्कारात, आणि कृतीत अनुभवली आहे...

ही दुलई, गोधडीसारखी तुकडे तुकडे जोडून बनवलेली आहे, त्याचे कापड जरी नवीन असेल तरी त्यांचे सांगणे तेच आहे...

प्रत्येक तुकडा प्रतीक आहे, तुझ्या माझ्यातल्या एकेका क्षणाचा, अनुभवांचा, प्रवासाचा...

त्याचे रंगही सांगतात बघ खूप काही...

गडद छटा म्हणजे तुझे रागावणे, अबोला धरणे, कधीतरीच पण शिक्षाही करणे...

तर आकर्षित - उल्हासित करणाऱ्या छटा म्हणजे तुझे प्रेम, माया काळजी, माझ्याविषयी असलेला विश्वास, माझ्या क्षमतांची जाणीव...

या तुकड्यांना जोडणारा एकेक धागा म्हणजे, आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी ओढ...

जरी तू आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती असलो, तरी नऊ महिने तुझ्यात असण्याचे भाग्य मला मिळाले आहे...

बाळाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर करण्यासाठी नाळ कापण्याचा, पहिला शारीरिक आघात आई आनंदाने मिरवते, म्हणूनच समान पातळीवरचे वडीलांचे नाते कांकणभर कमी रहाते...

दुलईचा प्रत्येक धागा ती नाळ आहे, जीने मला स्वत्त्व दिले, पण पांगळे केले नाही...

तो एक विश्वास आहे, जो मला कोणत्याही क्षणी एकटं वाटू देत नाही...

मला जेंव्हाही तुझी सोबत हवी असते, तू असतेच... 

कधी प्रत्यक्ष, कधी संस्कार, तर कधी विचार, कधी स्वप्न, कधी जिद्द, कधी प्रेरणा तर कधी विरक्ती बनून...

अजूनही खूप लिहिता येईल, पण सगळ्याच भावना शब्दांनी फिक्या करु नये असं म्हणतात...

मग असं करतेस...!

ती दुलई घट्ट कवटाळून घे स्वतःभोवती, आणि बघ काय जाणवते...


वयाच्या प्रत्येक टप्प्यावरची मी आतुर आहे तुला मिठी मारायला, ते सारे जुने नव्याने अनुभवायला, राहिलं असेल काही तर, आज पूर्ण करायला...

आणि अजून एक हट्ट...

ही दुलई म्हणजे, एक मागणी आहे...

मला तुझी आणि बाबांची, आई होण्याची संधी हवी आहे...

संदीप खरेच्या एका गाण्यात हे अचूक शब्दबध्द आहे, (त्यात थोडेसे बदल करते)

घट्ट मिटा डोळे, तुम्हा कुशीमध्ये घेते

पांघरायाला मऊ मऊ, पांघरूण देते

झाले मी मोठी सांग, छळेल तुम्हां कोण

आईबाबा व्हा, माझी मुले गुणी दोन

पाहू नका असे आता, नाते शोधू नवे

मायाप्रेम, काळजीचे मज आईपण हवे


आईपण...

आई होणे सोप्पे नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे, पण त्यातही तुझ्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल ही खात्री आहे...

शब्दात व्यक्त केलेले सारे, तुला दुलईच्या स्पर्शात रोज नव्याने अनुभवायला मिळो हीच परमेश्वराला प्रार्थना करते आणि खूप लांबलेले माझे सांगणे थांबवते...

तुझा जन्मदिवस तुझ्यासाठी दीर्घायू, आरोग्य, स्वास्थ्य आणि आत्मिक आनंद घेऊन येत राहो याच शुभेच्छा...

तुझी लेक...२८ मे २०२२ 

 

9 comments:

  1. कित्ती गोड लिहिलं आहेस ... शेवटापर्यंत पोहोचता पोहोचता डोळे कधी वाहू लागले कळले नाही...
    खरंच स्वतःच गृहीत धरतो आपण आईला .. स्वतःहून जास्तच म्हणून काही सांगायला जात नाही ...
    गोधडीच्या उबेविषयीही किती सुंदर उलगडून दाखवले आहेस ... खूप भावले हे पत्र आणि भेट
    अश्या गोड मुलीच्या गोड गोड आईला वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा ..
    येणारी वर्षे आरोग्य आणि आनंद भरभरून घेऊन येवोत .... ❤️

    आणि एक खूप special thanks काकूंना सांग माझ्यातर्फे ... माझ्या गोड मैत्रिणीसाठी ...
    तू त्यांच्या तपश्चर्येचे यथार्थ उत्तर आहेस ... तुझ्या प्रत्येक निस्पृह विचारात , कृतीत आईच्या संस्कारांचा गौरव आहे ..❣️

    ReplyDelete
    Replies
    1. किती ग कौतुक
      बरं नाही
      बाकी सर्वाचे शुभ चिंतन सदैव सोबत असते म्हणून तर लिहायला सुचत, जमत 😍😘

      Delete
  2. एकदम अप्रतिम पणे भावना अणि विचार मांडले आहे... धन्य ती माऊली अणि तिला जीवा पलीकडे जपणारी लेक

    ReplyDelete
    Replies
    1. आई बाबा तर मस्तच आहेत,

      पण अशा पालकत्वाचा भक्कम आधार तूझ्यासारखे अनेक जण देतात म्हणून आम्ही लहान मंडळी सगळ्या समस्या, यश याला समर्थपणे हाताळतो..

      दुःख तुम्ही विसरायला लावता
      आणि
      आनंदात हरवू ही देत नाही

      तुम्ही सगळे सदैव असेच सोबत रहा हीच ईश्र्वरला प्रार्थना

      Delete
  3. किती छान कल्पना मांडली आहे, खरंच प्रेमाचे धागे आहेत माय लेक नातं सगळ्यात वेगळं 👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी सहज वाटल तेच लिहिण्याचा प्रयत्न केला
      पण प्रतिसाद प्रेरणा देत रहातो त्यामुळे असेच प्रतिसाद देत रहा

      Delete
  4. खूप छान. भावनांचे बंध आणि माय लेकीचे नाते याची सुंदर गुंफण करणारा लेख.

    ReplyDelete

suggestions most wlcome