मी आणि गाणी..
सध्या फेसबुक, इंस्टा यांच्या रिलं प्रकाराने सर्वांना वेड लावले आहे, मलाही कधीतरी आवडतात बघायला..
असेच परवा एक बघण्यात आले, ज्यात एक मानसशास्त्रीय विचार मांडला होता..
की माणसे उदास, दुःखी, त्रस्त असताना, तशीच गाणी ऐकतात आणि अजून प्रश्नात गुरफटत जातात..
त्यातले वाक्य, ' तुमचे दुःख तुम्ही लहान बाळाप्रमाणे सांभाळता, त्याला खाऊ पिऊ घालून वाढवत रहाता' ..
आधी पटले, पण नंतर विचार केला तर जाणवले की मीही आनंदात आनंदी आणि प्रश्नात शांत, कधीतरी उदास गाणीच निवडते, पण त्यामुळे अजून दुःखी होत नाही किंवा प्रश्नात अडकत नाही..
मग मी अपवाद आहे त्याला, की त्या म्हणण्याला पक्का शास्त्रीय आधारच नाही..
त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी, मी माझी पद्धत तपासली..
आणि मला काहीतरी वेगळे सापडले..
अर्थात इथे स्वानुभव इतकाच आधार आहे, आणि तो नेहमी ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो..
मला समजले की
मी गाणी ही चाल, संगीत याहीपेक्षा अर्थ, गर्भित अर्थ (वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा), भावार्थ (शब्द, अर्थ आणि आपल्या भावना यांची एकत्रित सांगड) याने जास्त ऐकत असते, अनुभवत असते, त्याच्याशी एकरुप होत असते..
त्यामुळे शब्द, चाल, संगीत उदास असेल पण त्यांची बांधणी नेहमीच निराशा, दुःख देणारी नसतात..
त्याही पलीकडे विचार केला तर, आपण त्यातून काय घेतो, यावरुन ती कशी आहेत हे ठरते..
उदाहरण देऊन स्पष्ट न केल्यास, काहीतरी अपूर्णता वाटते म्हणून एका गाण्याची मांडणी करते..
बघा पटते का..?
गाणे माझ्या अत्यंत जवळचे, शिवाय माय मराठीचे शिरोमणी, गदिमा आणि बाबूजी (सुधीर फडके) यांनी अजरामर केलेले आहे..
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे
मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
या वस्त्रांते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे
आता माझा हे गाणे ऐकताना नकळत होणारा प्रवास..
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे
वस्त्र ही आपण प्राथमिक गरज मानतो, की जी प्रत्येकाची पूर्ण झालीच पाहिजे..
मग तसे मानवी आयुष्य जे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे, त्याचे उत्तम बांधणी
ही एक धागा सुखाचा आणि शंभर दुःखाचे अशाच गुणोत्तराची असते..
किंवा तशीच असली पाहिजे..
यातला जरतारी हा शब्द, सुखाला सोनं, रत्नजडीत याची उपमा देत आहे..
हे समजायला पूर्वी जेंव्हा वस्त्र बनवताना, खरोखर सोन्याचा धागा बनवून वापरला जायचा, अशी जीर्ण वस्त्र जाळण्यास ते सोनं मिळायचे हे माहीत असायला हवे..
मी बघितले नसले तरी ऐकले आहे, आजीच्या आजीला, तिच्या आजीच्या साडीतून इतकं ग्रॅम सोनं मिळालं होत वगैरे..
दुसरं म्हणजे ग्रॅम हे अत्यंत कमी परिमाण असले तरी, सोनं मोजताना नक्कीच कमी नाही..
त्याचे वजन (धागे) वाढवत गेलो तर, त्याचे दिसणे आणि ज्या शरीराने ते परिधान करायचे त्याची ते पेलण्याची, सांभाळण्याची ताकद याचा विचार असणारच, किंवा बनवणारा करणारच ना..?
आणि असे उच्चवस्त्र कोणीही, अगदी राजा असला तरी, रोज आणि दिवसाचे सगळे प्रहर घालू शकेल का..?
याचा विचार केला, तर आपले आयुष्य असेच तर आहे, रोज मी किलोभर सोनं असणारी साडी (आवडीचे कपडे) घालून चोवीस तास वावरु शकणार आहे का..?
नाही ना..!
अगदी तसेच सतत प्रचंड आनंद, सुख असणार नाही किंवा सहन होणार नाही..
ते वस्त्र अतिशय तलम, शरीराला छान वाटणारे, हलके, मऊसूत होण्यासाठी शंभर साधे धागे आणि एकच जरीचे असे असल्यास ते उत्तम बनेल, टिकाऊ असेल आणि तरीही आकर्षकही असेल..
तसेच दुःख जास्त असली तरी आपण नेहमीच त्यात हरवून जात नाही, तर त्यातून नवे मार्ग शोधतो, स्वतःच्या शक्तीचा, गुणाचा वापर करुन त्यावर मात करतो, स्वतःला शोधत, आजमावत रहातो..
पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
आता हा सुख दुःखाचा जरतारी कपडा पांघरला, म्हणजेच असे जीवनात सगळे अनुभव घेतलेस, तरी ते तुझ्यासोबत येणार नाहीत..
जसा रिक्त आलास, तसाच जाणार आहेस, मग कशात काय कमी, काय जास्त याचा हिशोब करुन काहीच उपयोग नाही..
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे
मुकी अंगडी बालपणाची
रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
मानवाने कपडे म्हणजेच सुख-दुःख वाट्याला यावे किंवा न यावे, हे आपणच ठरवू शकतो, अशी वेडी समजूत करुन घेतली आहे..
गदिमांनी जीवनास नाटकाची उपमा दिली आहे, आणि त्याचे तीन अंक म्हणजे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, ते पूर्ण करणारा मानव एक पात्र आहे,
बालपण हे न कळते परावलंबी असल्याने त्यास मुके..
तारुण्यात धाडस, प्रेम, शौर्य, महत्वाकांक्षा एक न अनेक पदर असल्याने त्यास रंगीत..
आणि वार्धक्य अनुभवांनी समृद्ध असल्याने शालीप्रमाणे उबदार असले तरी त्यानंतर अनंताचा प्रवास करण्यासाठी निसर्गतः शारीरिक, भावनिक, आणि अनेकदा मानसिकही जीर्ण होत जाणारे असे सुरेख शब्दबद्ध केले आहे..
या वस्त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन
ही वस्त्रे कोण विणतो हे सांगायचे झाले, तर आपण त्यास सगुण वा निर्गुण देवत्व मानतो..
ती शक्ती इतकी सर्जनशील आहे की, कोणाचेही आयुष्य, त्याचे दिसणे, वागणे दुसऱ्यासारखे नाही..
एवढेच कशाला त्याची निसर्गातली कोणतीच निर्मिती एकसारखी नाही, काही ना काही फरक आहेच..
म्हणूनच सगळ्यांना जे मिळायला हवे, ते शंभर दुःख त्यास एक सुख असे गुणोत्तर, प्रत्येकाचे गणित वेगळे मांडणारा तो अजब विणकर आहे..
प्रत्येकासाठी वेगळे वस्त्र विणताना कुणाचे अधिक भरजरी, कुणाचे त्यामानाने कमी हे ओझे स्वतःला नको म्हणून, कर्मबंध रुपी धागे आपल्याकडूनच मिळतील अशी व्यवस्थाही करतो आणि ती एकाच जन्मासाठी नाही असेही सुचवतो..
चांगले कर्म अधिक जरीचे धागे, चुकीचे कर्म दुःखाच्या धाग्यात वाढ..
आणि हे असले तरी..,
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे
त्या शक्तीला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकतच नाही, ही आपली मर्यादा आहे..
आणि ती मर्यादा ओलांडायची असेल तर, सुख असो वा दुःख, ते आपण फक्त परिधान करतो आहे..
त्याच्या निर्मात्याने ते खास आपल्यासाठी बनवले आहे..
त्याचा तो क्षण, प्रसंग, परिस्थिती पुरता स्वीकार करुन, त्या अज्ञात शक्तीला अनुभवण्याचा प्रयत्न करायला नको का..?
असे चाल, संगीत, गायकी, शब्द, अर्थ, भावार्थ सगळेच गाणे एकरुप होऊन ऐकताना होते..
आणि संपता संपता मनात स्वीकार भावना येत जाऊन, उदासीनता आपोआप गळून पडते आणि स्वच्छ नजरेने आहे त्यात समाधान, मजा शोधण्याची प्रेरणा मिळते..
तेही अगदी नकळत, सहज..
नाही का..?
तुमचा अनुभव, असा प्रवास सांगायला विसरु नका..



गाण्यातला प्रवास आपला होतो की आपल्या प्रवासावर गाणे तयार होते... हे प्रत्येकवेळी वेगवेगळे असू शकते पण तुझ्या ह्या लेखन प्रवासात मला तो जरतारीचा एक धागा नक्की मिळाला👌😘💕
ReplyDeleteखूप सुंदर शब्दांकन !! खरंच प्रत्येकाचं आयुष्य वेगळ असत पणं या सगळ्यांच्या आयुष्याला नात्यांचा धागा असतो ना त्यातच सार माणूसपण सामावलेल असत. अशी जाणीव तुझ्या लेखनातून होते ..
ReplyDelete